संगमनेरातील तेल उत्पादकांची बदनामी थांबवा! व्यापारी असोसिएशन; सुनील घुले मात्र आरोपांवर ठाम..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरातील नावाजलेल्या तिघा खाद्यतेल उत्पादकांच्या पॅकींग तेलामध्ये भेसळ असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी घुलेवाडीतील भेळविक्रेते सुनील घुले सोमवापासून उपोषणाला बसले आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पुण्यातील एका खासगी प्रयोगशाळेतून या तिघाही उत्पादकांच्या खाद्यतेलाची तपासणी केली होती, त्याचा अहवाल नकारात्मक आल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र या प्रकरणात आता संगमनेर व्यापारी असोसिएशनच्यावतीने जाहीर खुलासा करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासनाने संबंधित उत्पादकांच्या तेलाचे नमुने घेवून त्याची तपासणी केल्याचे व ते प्रमाणित असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोप केले जात असलेले तिनही खाद्यतेल उत्पादक अतिशय प्रतिष्ठीत असून आजवर त्यांच्याकडून कधीही भेसळीसारख्या गोष्टी घडलेल्या नाहीत. तरीही काहीजण जाणीवपूर्वक या व्यापार्यांची बदनामी करीत असल्याचे सांगत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश कोठारी यांनी केले आहे.
घुलेवाडीत भेळीचा व्यवसाय करणार्या सुनील घुले यांनी शहरातील नामांकित तीन खाद्यतेल उत्पादकांकडून शेंगादाणा, सूर्यफूल व पामतेलाचे प्रत्येकी एक लिटरचे पॅकींग खरेदी करुन दोन महिन्यांपूर्वी ते पुण्यातील एका खासगी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याच्या तपासणीनंतर संबंधित प्रयोगशाळेने ‘त्या’ तेलात भेसळ असल्याचा निष्कर्ष काढल्याचा दावा करीत त्यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनासह तहसीलदार व शहर पोलिसांकडे तक्रारअर्ज दाखल केला होता. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही संबंधित खाद्यतेल उत्पादकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सुनील घुले यांनी सोमवारपासून (ता.1) प्रशासकीय भवनासमोर उपोषण सुरु केले आहे. एकीकडे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात तेलाचा व्यवसाय करणार्या तिघा व्यावसायिकांवर घुले यांनी गंभीर आरोप करीत कारवाईची मागणी केलेली असताना आता या व्यापार्यांच्या मदतीला संगमनेर व्यापारी असोसिएशन पुढे आली आहे.
याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश कोठारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यानुसार या तिघाही खाद्यतेल उत्पादकांवर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ‘भेसळ’ केल्याचा आरोप करुन काहीजण त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करीत असल्याचे म्हंटले आहे. या व्यापार्यांवर भेसळ केल्याचा आरोप झाल्यानंतर अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्याकडून विक्री केल्या जाणार्या विविध प्रकारच्या तेलाचे नमुने घेवून त्याची तपासणी केली असता ते मानकानुसार प्रमाणित असल्याचा निर्वाळा दिला व त्याबाबतचे प्रमाणपत्रही ‘त्या’ व्यापार्यांकडे असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून निदर्शनास आणून दिले आहे. सदरचा प्रकार म्हणजे शहरातील या तिनही व्यापार्यांच्या प्रतिष्ठेला आणि सचोटीला धक्का लावण्याचा व त्यांची बदनामी करण्याचा प्रकार आहे. यातून केवळ त्या तिघा व्यापार्यांच्याच नव्हेतर शहरातील समस्त व्यापार्यांच्या बदनामीचे पद्धतशीर षडयंत्र राबविले जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
संगमनेरच्या बाजारपेठेला खूप मोठा इतिहास आणि वारसा आहे. राज्याच्या उद्योग आणि व्यापार क्षेत्रात संगमनेरचा वेगळा लौकीक आहे. संबंधिताकडून आरोप करण्यात आलेले तिनही खाद्यतेल उत्पादक गेली अनेक वर्ष या व्यवसायात आहेत, मात्र या प्रदीर्घ कालावधीत त्यांच्यावर एकदाही ‘भेसळ’ केल्याचा आरोप झालेला नाही. दोन महिन्यांपूर्वी एका ग्राहकाने या तिघांकडून तेलाची खरेदी करुन खासगी प्रयोगशाळेतून त्याची तपासणी केली होती. याबाबतचे वृत्त काही माध्यमातून समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या तिघाही तेलउत्पादकांच्या खाद्यतेलाचे नमुने घेवून शासकीय प्रयोगशाळेतून त्याची तपासणी केली असता सदरचे खाद्यतेल प्रमाणित असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे, तसे प्रमाणपत्रही त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
मात्र त्यावर विश्वास न ठेवता काहीजण आपलाच अहवाल योग्य असल्याचे भासवून शहरात अतिशय प्रतिष्ठीत असलेल्या खाद्यतेल व्यापार्यांची पद्धतशीर बदनामी करीत असून त्यामागे त्यांचा वेगळा हेतू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संगमनेरकरांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही संगमनेर व्यापारी असोसिएशनद्वारा या तिनही खाद्यतेल उत्पादकांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून करण्यात आले आहे.
संगमनेरातील या तिघा व्यापार्यांकडून विक्री केल्या जाणार्या खाद्यतेलात भेसळ असल्याचा संशय असल्याने त्यांच्याकडून शेंगादाणा, सूर्यफूल व पामतेलाचे पॅकींग विकत घेवून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याच्या अहवालातून तिघाही व्यापार्यांकडील तेलामध्ये भेसळ असल्याचे उघड झाले आहे. मी केलेली कारवाईची मागणी व पुण्याच्या प्रयोगशाळेचा अहवाल जर अयोग्य असेल तर माझ्यासह ‘त्या’ प्रयोगशाळेवर गुन्हा दाखल करावा. जो पर्यंत शहरातील खाद्यतेलात भेसळ करणार्या कंपन्यांना ‘सील’ केले जात नाही, तोपर्यंत माझा लढा सुरुच राहील.
सुनील घुले
भेळ विक्रेते, घुलेवाडी