गेटबंद असताना प्रवेशाचा आग्रह षडयंत्र की सवंग प्रसिद्धी! जिल्ह्यात नाराजीचा सूर; सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदारसंघात ऐनवेळी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवणार्‍या शुभांगी पाटील यांनी शुक्रवारी केलेली स्टंटबाजी संगमनेरकरांच्या रोषाचे कारण ठरली आहे. माध्यमांशी बोलताना खुद्द पाटील यांनीच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी आपले संभाषण झाल्याचे सांगत त्यांचे ‘हेल्थ बुलेटीन’च सादर केले होते. त्यावरुन पाटील यांना त्यांच्या आजारपणाची व ते संगमनेरात नसल्याची पूर्ण कल्पना असल्याचे स्पष्ट असतानाही त्यांनी बंद असलेल्या त्यांच्या निवासस्थानात प्रवेशाचा प्रयत्न केला. हा प्रकार सुसंस्कृत राजकारणी अशी जनमानसात ओळख असलेल्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत प्रतिमेला गालबोट लावण्यासाठी रचलेले षडयंत्र होते की सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप अशी शंका आता निर्माण झाली आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेने संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यातूनही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

गेल्या चार दशकांपासून संगमनेरचे प्रतिनिधीत्त्व करणार्‍या बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत स्वभावामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. राजकारण केवळ निवडणुकांच्या कालावधीतच करण्याच्या त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे जिल्ह्यात त्यांना अजातशत्रू म्हणूनही ओळखले जाते. गेल्या महिन्यात विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पाय घसरल्याने त्यांच्या खांद्याचे हाड मोडले होते. त्यामुळे सुरुवातीला नागपूर येथे व नंतर मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी (ता.20) त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करताना घालण्यात आलेले टाके काढले जाणार होते, त्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्याच दिवशी (ता.20) महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या प्रचारार्थ संगमनेरात आल्या होत्या. यावेळी सय्यदबाबा चौक येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जावून माध्यमांशी संवाद साधल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेणार होत्या. प्रत्यक्षात मात्र सय्यदबाबा चौकात असतानाच त्यांना आलेल्या एका फोननंतर त्यांनी नियोजित कार्यक्रमात बदल करीत राष्ट्रवादी कार्यालयात जाण्यापूर्वी अचानक काँग्रेसचे दिग्गज नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन काहींनी थोरात व त्यांचे कुटुंबीय संगमनेरात नसल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी थेट थोरात यांच्या निवासस्थानी जावून तेथील सुरक्षारक्षकाला प्रवेशद्वार उघडण्यास सांगितले.

तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍याला प्रवेशद्वारासमोर कोण आहे याची कोणतीही कल्पना नसल्याचेही शुभांगी पाटील आणि त्यांच्यात झालेल्या संभाषणातून स्पष्टपणे समोर आले. यावेळी पाटील यांनी वारंवार प्रवेशद्वार उघडण्यास सांगत या घटनाक्रमाचे छायाचित्रण करुन घेतले. मात्र प्रत्येकवेळी आतील बाजूस असलेला कर्मचारी घरात कोणीही नसल्याचे व सगळेजण मुंबईत असल्याचे सांगत असल्याचेही यावेळी दिसून आले. मात्र तरीही पाटील यांच्या मनात काहीतरी वेगळेच असल्याप्रमाणे त्या यांना फोन करा.., त्यांना फोन करा.. असा त्रागा करीत तेथेच रेंगाळल्या व त्यांनी एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे अभिनय करुन प्रवेशद्वारावर वठवलेल्या भूमिकेचे छायाचित्रण त्यांच्या समर्थकांनी सोशल माध्यमात व्हायरल केले.

यातून महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीतील प्रमुख नेतृत्त्वाच्या निवासस्थानी येवूनही त्याला प्रवेश दिला जात नसल्याचे चित्र दाखवण्याचा व जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शांत, संयमी व अतिशय सुसंस्कृत राजकारणी अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे षडयंत्र असल्याची भावना थोरात यांना मानणार्‍या सर्वपक्षीय लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. या घटनाक्रमाबाबत अनेकांनी उघड नाराजीही व्यक्त केली असून असा प्रकार घडवून आणण्यामागे सवंग प्रसिद्धी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात देशातील बहुतेक सर्व राजकीय पक्षांचे अस्तित्त्व आहे. त्यांच्या पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांच्या सुख-दुखःच्या प्रसंगात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून बाळासाहेब थोरात यांनी नेहमीच हजेरीही लावली आहे. गेल्या काही महिन्यात संगमनेरचे भाजपा नेते राधावल्लभ कासट यांचे निधन असो, शिवसेनेचे (ठाकरे गट) ज्येष्ठ नेते अप्पा केसेकर यांच्यावरील शस्त्रक्रिया असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह अशोकराव सराफ यांचा अभीष्टचिंतन सोहळा असो थोरात यांनी राजकारण बाजूला ठेवून तेथे हजेरी लावल्याची शेकडो उदाहरणे आहेत. असे असताना त्यांच्याच दारात आलेल्या आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या एखाद्या उमेदवाराला ते घरात प्रवेश कसा नाकारतील? असा प्रश्न सध्या संगमनेरकरांना पडला आहे. त्यातून पाटील यांच्या या कृतीबाबत नाराजी आणि रोषही निर्माण झाला आहे.

प्रवेशद्वार नाट्यानंतर शुभांगी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना त्यांच्या मुखातून ‘सत्य’ बाहेर पडले. यावेळी त्यांनी आपण गुरुवारी (ता.19) रात्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधल्याची माहिती पत्रकारांना दिली, मात्र उशीर झालेला असल्याने आपले रात्री संभाषण झाले नाही. त्यानंतर शुक्रवारी (ता.20) सकाळीच थोरात यांचा फोन आला व त्यावरुन आपला संवाद झाल्याचे आणि थोरात यांनी काम सुरु ठेवण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाटील यांनीच थोरातांच्या खांद्याला असलेले टाके आज (शुक्रवार) काढले जाणार असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहितीही पत्रकारांना दिली. त्यातून शुभांगी पाटील यांना बाळासाहेब थोरात यांच्या आजारपणाबाबत, त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांबाबत पूर्णतः माहिती असतांनाही त्यांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याची भावना थोरात समर्थकांसह त्यांना मानणार्‍या जिल्ह्यातील मोठ्या वर्गाच्या मनात निर्माण झाल्याने रोष निर्माण झाला असून पाटील यांनी सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावण्यासाठी हे षडयंत्र रचले होते की थोरातांचे नाव घेवून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा हा खटाटोप होता यावरुन जिल्ह्यासह संपूर्ण नाशिक पदवीधर मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Visits: 23 Today: 2 Total: 115055

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *