चार दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या पदाधिकार्यांच्या नावाला ब्रेक! शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे पत्रक; संपर्क प्रमुखांवर टीका करणारे आमचे नाहीत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने खिळखिळ्या झालेल्या मूळ शिवसेनेतील स्थलांतर रोखण्यासाठी गेल्या शनिवारी नूतन पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र जाहीर झालेल्या नावांबाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काही तालुक्यांमध्ये नाराजीचा सूर आळवला गेला. तर, अकोल्यासारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यात चक्क स्वपक्षीयांनीच आपल्या संपर्कप्रमुखांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रकार घडवला. या सर्व प्रकारांची शिवसेनेच्या (ठाकरे गट) मध्यवर्ती कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून पक्षाचे सचिव तथा विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी पदावरुन हटविलेल्या शिवसैनिकांना मुंबईत पाचारण करुन नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शनिवारी जाहीर केलेल्या नूतन पदाधिकार्यांच्या नावाला ब्रेक लावला आहे. त्यासोबतच अकोल्यात संपर्कप्रमुखांच्या प्रतिमेला जोडे मारणारे शिवसैनिक नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या शनिवारी (ता.29) शिवसेनेने (ठाकरे गट) आपल्या परंपरेनुसार सामना दैनिकातून वृत्त प्रसिद्ध करीत शिर्डी लोकसभा
मतदारसंघातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकारणीत मोठे फेरबदल केले होते. त्यातून गेल्या 18 वर्षांपासून शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून काम पाहणार्या अकोल्याच्या मच्छिंद्र धुमाळ यांचीही गच्छंती करण्यात आल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले होते. त्यातूनच त्यांनी संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याचे आंदोलन करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याबाबत ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद मंडलिक, बाळासाहेब कुमकर, सुदेश मुर्तडक यांच्यासह धुमाळ यांच्या काही समर्थकांनी पत्रकार परिषद घेतली व आपली नाराजीही जाहीरपणे व्यक्त केली. हा जुन्या शिवसैनिकांवर अन्याय असून याबाबत मातोश्रीवर जावून न्याय मागणार असल्याचेही या पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आले व तसे न घडल्यास सामुहिक राजीनामे देण्याचीही घोषणा केली गेली.

नव्याने जाहीर केलेल्या निवडीत संगमनेर तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांचे भाजप नेते व विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांच्याशी असलेले संबंध अडसर ठरवून त्यांचीही पदावरुन गच्छंती करुन त्यांच्याजागी भाऊसाहेब हासे यांची वर्णी लावण्यात आली होती. त्यावरुन काही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही अकोल्याप्रमाणे संगमनेरात स्वपक्षाच्या विरोधात कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. मात्र अकोल्यातील विरोध तापल्याने त्याचे पडसाद अन्यत्र उमटण्याच्या शक्यतेने आणि त्यातच अडचणीत असलेल्या पक्षाच्या समस्या आणखी वाढण्याच्या भितीने शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने पदावरुन पायउतार केलेल्या केलेल्या पदाधिकार्यांना मुंबईत पाचारण केले. त्यांच्या विषयीच्या तक्रारींचीही यावेळी शहनिशा करण्यात आली. या चौकशीतून काही पदाधिकार्यांवर विरोधकांशी संधान बांधल्याच्या कथित आरोपांबाबत अधिक स्पष्टता समोर आली असून त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेने (ठाकरे गट) शनिवारी (ता.29) जाहीर केलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील नूतन पदाधिकार्यांच्या निवडीला स्थगीती दिली आहे.

याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात आज (ता.04) वृत्त प्रसिद्ध करण्यात आले असून शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शनिवार (ता.29) रोजी जाहीर केलेल्या नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आल्याचे म्हंटले आहे. तसेच, काही समाजकंटकांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्याबाबत अश्लाघ्य वर्तन केले आहे. त्यांचा शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काहीही संबंध नाही अशी माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पक्षाचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्याचे या वृत्तातून सांगण्यात आले आहे.

शिवसेनेने (ठाकरे गट) शनिवारी (ता.29) जाहीर केलेल्या नूतन पदाधिकार्यांमध्ये उत्तरेतील सहा तालुक्यांसाठी दोन स्वतंत्र जिल्हाप्रमुख म्हणून प्रमोद लबडे व रावसाहेब खेवरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), उपजिल्हा प्रमुख मुजीब शेख (संगमनेर व अकोले), शेखर दुभय्या (श्रीरामपूर शहर), देविदास सोनवणे (श्रीरामपूर तालुका), जिल्हा संघटक बाळासाहेब जाधव (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), आप्पा केसेकर (शिर्डी लोकसभा), तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे (संगमनेर), डॉ. मनोज मोरे (अकोले (पूर्व)), संतोष मुर्तडक (अकोले (पश्चिम)), शिवाजी ठाकरे (कोपरगाव), सचिन कोते (राहाता), राधाकृष्ण बोरकर (श्रीरामपूर (पश्चिम)), दादा कोकणे (श्रीरामपूर (पूर्व)).

शहरप्रमुख अमर कतारी (संगमनेर शहर), प्रसाद पवार (संगमनेर उपनगर), नितीन नाईकवाडी (अकोले), सनी वाघ (कोपरगाव), संजय शिंदे (शिर्डी), भागवत लांडगे (राहाता), अतुल शेटे (श्रीरामपूर). शहर समन्वयक कलविंदर दडीयाल (कोपरगाव), विधानसभा संघटक अस्लम शेख (कोपरगाव), शहर संघटक गणेश होले (राहाता) व सचिन बडदे (श्रीरामपूर) यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या होत्या.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांचे भाजप नेते व विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत स्नेहाचा संबंध असून त्यांच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तालुकाप्रमुखांची उपस्थिती असते अशी त्यांच्याविषयी तक्रार करण्यात आली होती. याबाबत खुद्द आहेर यांना शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पाचारण करण्यात आल्याची माहिती असून त्यांनीही वरीष्ठांना याबाबत खुलासा दिल्याचे समजते. त्यामुळेच चार दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या निवडींना आता स्थगिती देण्यात आल्याचीही चर्चा संगमनेर तालुक्यात सुरु आहे.

