संगमनेरची शिवसेना धावली वीज ग्राहकांच्या मदतीला! आधी आंदोलन, आता ग्राहक सुविधा; संपर्क प्रमुखांकडूनही कौतुकाची थाप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्राहकांच्या समस्या सोडवून त्यांना समाधानाने घरी पाठवण्याची जबाबदारी असलेले अधिकारी ‘भ्रष्टाचारात’ लृप्त झाल्याने त्यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शहर शिवसेनेने आज अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमातंर्गत शहर व परिसरातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यात आल्या. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे (ठाकरे गट) संपर्कप्रमुख, माजीमंत्री बबनराव घोलप यांनीही या ग्राहक मदत केंद्रास भेट देत स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांचे कौतुक केले. आज एकाच दिवसांत या मदत केंद्रात अनेक वीज ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा करुन मार्गही काढला गेला. त्यामुळे वीज कंपनीच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळलेल्या अनेक वीज ग्राहकांच्या चेहर्यावर आज समाधानाचे हास्यही पहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून वीज मंडळाच्या संगमनेर कार्यालयात काही अधिकार्यांच्या मनमानी आणि भ्रष्टाचारी वृत्तीमुळे अनागोंदी माजली आहे. त्याचा थेट फटका सामान्य आणि गरीबांना बसत असून कोणत्याही कामासाठी पैसे द्यावे लागत असल्याने वीजग्राहक अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. त्यातच भाग एकमध्ये मोडणार्या संगमनेर शहर विभागाला तर दलालांचा विळखाच बसल्याने येथे पैशाशिवाय काहीच चालत नसल्याचे चित्रही निर्माण झाले आहे. याबाबत दैनिक नायकने वृत्तमालेच्या माध्यमातून ही अनागोंदी समोर आणण्याचा प्रयत्नही केला होता.

त्याचवेळी शहर शिवसेनेने 22 डिसेंबररोजी हातात दांडू घेवून मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्ष आंदोलनापूर्वीच वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी आश्वासनांची लिखित पत्रावळी सोपवल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र त्याचवेळी ठरल्यादिनी ‘दंडूक्या’ ऐवजी हातात ‘लेखणी’ धरुन ग्राहकांच्या समस्या सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याप्रमाणे आज (ता.22) सकाळी बसस्थानकाजवळील दत्त मंदिरासमोर मांडव घालून वीज ग्राहकांच्या जीर्ण झालेल्या समस्या ऐकून त्याचा पाठपुरावा केला गेला. यावेळी बहुतेकांच्या मीटर खराब आहे, मीटरवरील आकडे दिसत नाहीत, नियमित रिडींग घेतले जात नाही, जास्तीचे बिल येते, अर्ज करुन काळ लोटला, पण नवीन कनेक्शन मिळत नाही अशा सामान्य तक्रारींचा अधिक भरणा होता.

याच दरम्यान शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त झालेले शिवसेनेचे (ठाकरे गट) संपर्कप्रमुख, माजीमंत्री बबनराव घोलप यांनीही थेट ‘ग्राहक मदत केंद्रात’ बसून वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने अडकलेल्या वीज ग्राहकांशी थेट संवाद साधतांना त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यातील बहुतेक अडचणींचा जागेवरच फैसला करण्यात आला, तर प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांबाबत शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी उपकार्यकारी अभियंत्यासह शहर विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याशी चर्चा करुन ते लवकर सोडवण्यास सांगण्यात आले.

आजचा हा अभिनव उपक्रम शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख अमर कतारी यांनी आयोजित केला होता. या उपक्रमात नागपूरचे (दक्षिण) संपर्कप्रमुख नरेश माळवे, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब हासे, महिला आघाडीप्रमुख शीतल हासे, आशा केदारी, संगिता गायकवाड, सुरेखा गुंजाळ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहरप्रमुख अमोल डूकरे, रंगनाथ फटांगरे, अमित फटांगरे, योगेश खेमनर, लक्ष्मण सोन्नर, सदाशिव हासे, रवींद्र गिरी, राजेंद्र सातपुते, अनिल निर्हाळी, दीपक वनम, विकास डमाळे, इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, गोविंद नागरे, आसिफ तांबोळी, एस.पी.रहाणे, सचिन साळवे, विजय सातपुते, दिलीप राऊत, अजिज मोमीण, सुदर्शन इटप, दीपक साळुंखे, सागर भागवत, सचिन जाधव, माधव फुलमाळी, शोएब शेख, अक्षय गाडे, फैजल सय्यद, अक्षय गुंजाळ, अक्षय बिल्लाडे, त्रीलोक कतारी, प्रशांत खजूरे, जयदेव यादव व अनिल खुळे आदी सहभागी झाले होते.

