अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार करणाऱ्याला बेड्या

नायक वृत्तसेवा, शेवगाव
लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश सोमनाथ गिरम (वय २५, रा. शहर टाकळी ता. शेवगाव) असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी आकाशने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून १ जून रोजी पळवून नेले. त्यानंतर आरोपी काम करीत असलेल्या भातकुडगाव येथील हॉटेल जगदंबा येथे आरोपी मुलीला घेऊन गेला. तेथे त्याने तिला चार दिवस ठेवले.

दरम्यान, पीडित मुलीची आई तक्रार देण्यासाठी शेवगाव पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे समजताच आरोपीने पीडितेला ४ जून रोजी दुपारी १ वाजता शेवगाव पोलीस स्टेशनच्या आवारात आणून सोडले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यासाठी पथक नेमले. तपासी पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत त्यास शहर टाकळी येथून ताब्यात घेतले. त्याला शेवगाव पोलिस स्टेशनला आणून अटक केली. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे यांनी पीडित मुलीस विश्वासात घेऊन तिचा जबाब घेतला असता, आरोपीने मागील दोन महिन्यांपासून हॉटेल जगदंबा येथे तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे सांगितले.तसेच, एक वर्षापूर्वी पीडितेच्या आई-वडिलांनी तिचे लग्न धुळे येथील एका मुलासोबत लावल्याचेही मुलीने जबाबात सांगितले.या जबाबावरुन या गुन्ह्यात वाढीव कलम समाविष्ठ करून पीडितेचे आई-वडील, सासु-सासरे, तसेच पतीलाही आरोपी बनवण्यात आले आहे. पीडितेची वैद्यकिय तपासणी करण्यात आली.

Visits: 81 Today: 2 Total: 1099137
