स्थानिक गुन्हे शाखेची कट्टा तस्करांवर ‘सुपर स्ट्राइक’! चार कट्ट्यांसह बारा काडतूसे हस्तगत; तिघांच्या मुसक्या आवळल्या, दोघे पसार..
विशेष प्रतिनिधी, अहमदनगर
श्रीरामपूर तालुक्यातील दोन्हीही पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या चार दिवसांत घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातील वातावरण ढवळलेले असताना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस दलाची प्रतिमा उंचावणारी कामगिरी बजावली आहे. गुन्हे शाखेने आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापेमारी करीत कट्टे तस्करांविरोधात सुपर स्ट्राइक केली. या कारवाईत तिघा सराईत गुन्हेगारांसह चार गावठी कट्टे, बारा जिवंत काडतूसे व एक मोपेड असा 1 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. या कारवाईने जिल्हा पोलिस दलाचे मनोबल उंचावले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना याबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्याची खातरजमा विश्वासार्ह ठरल्याने त्यांनी आपल्या पथकाला आवश्यक त्या सूचना देत राहुरी फॅक्टरी नजीक जाऊन कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजेंद्र देवमन वाघ, संजय खंडागळे पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे, पोलीस नाईक भिमराज खर्से, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी व रविकिरण सोनटक्के यांनी राहुरी फॅक्टरी जवळील विठामाधव चित्रपटगृहाच्या परिसरात सापळा लावला व प्राप्त वर्णनानुसारच्या संशयित इसमांची प्रतिक्षा करण्यास सुरुवात केली.
काही वेळातच बावरलेल्या अवस्थेत मोपेडवर दोघेजण संशयितरित्या येत असल्याचे पोलीस पथकाच्या लक्षात आले. एका कर्मचाऱ्याने त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी आपली दुचाकी उभी केली. यावेळी आसपास दबा धरून बसलेल्या पोलिस पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी संशयितांच्या दिशेने धाव घेत त्या दोघांभवती कोंडाळे करीत त्यांच्या वाहनाची चावी काढून घेतली. त्यांना त्यांची ओळख विचारली असता मोपेड चालकाने आपले नाव किशोर बाळासाहेब खामकर (वय 32, रा.राजुरी, ता.राहाता) तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या इसमाची ओळख किशोर साईनाथ शिनगारे (वय 28, रा.गोमाळवाडी, ता.नेवासा) असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेण्यात आल्यावर पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून दोन गावठी कट्ट्यांसह सहा जिवंत काडतुसे आढळून आली.
त्या दोघांनाही तत्काळ ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सहाय्यक फौजदार वाघ यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. सदरची कारवाई सुरू असतानाच गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यात कट्ट्यांचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली. त्यासाठी औरंगाबादहून दोघे नगरकडे येत असल्याचेही त्यांना समजले. त्यानुसार राहुरीतील कामगिरी फत्ते करणाऱ्या पथकालाच त्यांनी नगरची मोहीम सोपविली. त्यांनी औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील शेंडी बायपास चौका नजीक आपले वाहन लपवून सापळा रचला. काही वेळातच औरंगाबादच्या दिशेने कळ्या रंगाच्या प्लेटिना दुचाकीवरुन दोघेजण येत असल्याचे पोलिसांनी पाहिले. ठरल्याप्रमाणे एकाने त्यांंना थांबण्यास सांगितले असता दुचाकी चालकाने वाहनाचा वेग कमी केला.
नेमके त्याचवेळी आसपास दबा धरून बसलेले अन्य कर्मचारी अचानक समोर आल्याने दुचाकी चालविणारा सराईत गुन्हेगार विवेक लक्ष्मण शिंदे (रा.घोगरगाव रोड, टाकळीभान, ता.श्रीरामपूर) हा दुचाकी घेऊन पुन्हा औरंगाबादच्या दिशेने पसार झाला. मात्र पोलिसांनी पाठीमागे बसलेल्या अभय अशोक काळे (वय 24 रा.शिरसगाव ता.नेवासा) याच्या मात्र मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे असा एकूण 51 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी कट्टे कोठून आणले होते याची विचारणा केली असता आरोपी काळे याने शिरसगाव येथील सागर रोहिदास मोहिते याचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याही ठिकाणांवर छापे घातले, मात्र तत्पूर्वीच तो पसार झाला होता. मोहिते हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर अंंमली पदार्थांच्या तस्करीसह मारहाण, बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी एकट्या नेवासा पोलीस ठाण्यात चार तर सोनई व अंबड (जि.नाशिक) पोलीस ठाण्यात एनडीपीएससह गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
जिल्ह्यात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवायात तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने व त्यातील एक सराईत असल्याने त्यांच्या चौकशीतून जिल्ह्यातील कट्टा रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वाळू तस्कर व भू माफियांकडे कट्ट्यांची संख्या वाढल्याची चर्चा सुरु झालेली असताना स्थानिक गुन्हे शाखेने आज जिल्ह्यातील कट्टा तस्करीवर ‘सुपर स्ट्राइक’ केल्याने बेकायदेशीररित्या कट्टे बाळगणाऱ्यांंसह त्याची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे जिल्हा पोलिसांची प्रतिमा उंचावली असून गेल्या चार दिवसात श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील घडामोडींमुळे गढूळ झालेले जिल्हा पोलिस दलातील वातावरण निवडले आहे या धाडसी कारवाईतून पोलिस दलाचे मनोबलही उंचावले आहे.
या कारवाईत पोलीस पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपाधिक्षक संदीप मिटके, नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. जिल्ह्यातील वाळू तस्करांसह काही अवैध व्यवसायिकांकडे गावठी कट्टे असल्याच्या चर्चा वाढल्या आहेत. सोमवारी गुंजाळे येथील गोळीबाराचे प्रकरणही बेकायदा गावठी कट्ट्यातूनच घडले आहे. यावरून जिल्ह्यात पुन्हा एकदा कट्ट्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येते. स्थानिक गुन्हे शाखेने आज सुरू केलेली सुपर स्ट्राइक कारवाई जिल्ह्यातील सर्व कट्टे नष्ट करूनच पूर्ण करावी अशी जिल्हावासीयांना अपेक्षा आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके धाडसी अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यातील कट्टा तस्करीचे समूळ उच्चाटन होईल असा आशावाद आहे.
Visits: 15 Today: 1 Total: 119041