जाचकवाडी शिवारात पैशांच्या कारणातून दोघांनी केली एकाची हत्या अकोले पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल; घटनेने उडाली एकच खळबळ
नायक वृत्तसेवा, अकोले
पैशांच्या कारणातून संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील केळेवाडी अंकुश रानू लामखडे (वय 55, रा. केळेवाडी, ता. संगमनेर) यांची दोघा तरुणांनी जाचकवाडी (ता. अकोले) शिवारात हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.30) समोर आली आहे. याप्रकरणी अकोले पोलिसांत दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बारकू उर्फ भाऊसाहेब रखमा महाले आणि अशोक बाळशीराम फापाळे (दोघेही रा. जाचकवाडी) लामखडे यांच्या डोक्यात खोरे मारून त्यांना ठार करून एका टोमॅटोच्या शेतात नेऊन पुरले होते. हे दोघे आरोपी कांदे घेऊन ते विकण्याचा व्यवसाय करतात. कांदे खरेदीसाठी त्यांनी लामखडे यांच्याकडून हातउसनी रक्कम घेतली होती. वेळोवेळी पैसे मागूनही आरोपींनी पैसे न दिल्याने लामखडे यांनी तगादा लावल्याने दोघांनी त्यांची हत्या केल्याची बाब समोर येत आहे.
यातील एका आरोपीची अंकुश लामखडे यांच्याशी ओळख झाली होती. आरोपीने जाचकवाडी शिवारात काही ठिकाणी शेती देखील वाट्याने केली होती. तसेच तो अनेक शेतकर्यांचे कांदे विकत घेऊन तो माल तेथेच ठेऊन शेतकर्यांना कांद्याची रक्कम देत असे. काही दिवसांनंतर हे कांदे उचलून तो दुसर्या व्यापार्यांना देत असे. त्यासाठी याला काही पैसे गुंतवावे लागत होते. त्यामुळे त्याने काही रक्कम ही लामखडे यांच्याकडून हातउसनी घेतली होती. मात्र, दरम्यानच्या काळात कांद्याला बाजार सापडले किंवा त्याच्याकडे पैसे आले नाही. त्यामुळे तो लामखडे यांचे पैसे परत करू शकला नाही. दरम्यान अंकुश लामखडे यांनी आरोपींकडे वारंवार तगादा लावला होता. आज नाही उद्या देतो असे करून दिलेले वायदे टळत होते. परिणामी लामखडे यांनी मागणीचा जोर वाढविला होता. 29 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी ही दोघे जाचकवाडी शिवारात एकमेकांना भेटले होते. तेथे त्यांच्यात पैशांहून वाद झाला. मात्र, हा वाद टोकाला गेल्यामुळे दोघा आरोपींनी अंकुश लामखडे यांची हत्या केली, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.
दरम्यान, रात्र झाली तरी लामखडे हे घरी आले नाही त्यामुळे, त्यांचा कुटुंबातील लोकांनी शोध घेतला. मात्र, तरी देखील ते मिळाले नाही. म्हणून यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठत हरविल्याची दाखल केली. दुसर्या दिवशी सकाळी जाचकवाडी शिवारात काही व्यक्तींना एक गाडी आणि चपला शेताच्या कडेला पडलेल्या दिसून आल्या. तेथील घटनास्थळी दिसणारी माहिती ही जरा संशयास्पद असल्यामुळे काहींनी थेट पोलिसांशी संपर्क केला. पोलीस निरीक्षक सुनील पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटना ही अकोले हद्दीत असल्यामुळे पोलीस निरीक्षक घुगे यांनी तपासाला गती दिली. काही काळानंतर ज्या काही शंका होत्या. त्याचा गुन्ह्याच्या दृष्टीने तपास सुरू केला. तर, काही सबळ पुरावे हाती आल्यानंतर त्यांनी एक संशयित म्हणून एकाला ताब्यात घेतले. त्यानंतर दुसर्यालाही ताब्यात घेतले आणि घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी रात्री उशिरा नितीन अंकुश लामखडे यांनी अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन बारकू उर्फ भाऊसाहेब रखमा महाले आणि अशोक बाळशीराम फापाळे या दोघांवर गुरनं.562/2022 भादंवि कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे हे करत आहे.