आयशर टेम्पो धावत्या कारवर कोसळला! संगमनेर तालुक्यातील घटना; चौघांचा जागीच मृत्यू, मात्र महिला बचावली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर  असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर आज रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वरती कोसळल्याने कार मधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र एक महिला त्यातून आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी धावपळ करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची ही धावपळ व्यर्थ ठरली. अपघातग्रस्त वाहने पुण्याहून संगमनेरकडे येत होते. मृतांमध्ये अकोले तालुक्यातील प्रसिद्ध भेळ विक्रेते अभय विसाळ यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी मात्र आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. अपघातग्रस्त कारमधील सर्वजण अकोले तालुक्यातील रहिवाशी आहेत.
 याबाबत समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी गावाच्या शिवारात घडली. या घटनेत नाशिकच्या दिशेने निघालेल्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करीत असताना अचानक आयशर टेम्पो त्या कारवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात टोयोटा कंपनीच्या इटीयोस कारचा अक्षरशः चकनाचूर झाला. या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केले, त्यामुळे अस्मिता विसाळ या महिलेचा जीव वाचला. मात्र दुर्दैवाने एका दोन वर्षीय चिमुकल्या मुलीसह चार जणांचा या भीषण अपघातात बळी गेला.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चौघांमध्ये ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42 वर्ष), सुनील धारणकर (वय 65 वर्ष) व अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्ष, सर्व रा.अकोले, जि.अ.नगर) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे. संबंधित महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. या घटनेने संगमनेरसह अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *