नवजीवनला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार नाशिक विभागात द्वितीय; निसर्ग संवर्धनाचे पथदर्शी कार्य


नायक वृत्तसेवा, नगर
राज्यातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यामधे उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या व्यक्ती व संस्था यांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी महसूल व वन विभाग यांच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. नवजीवनला 2019 या वर्षीचा नाशिक विभागात द्वितीय क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तीस हजार रूपये, स्मृतीचिन्ह व प्रशिस्तपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नवजीवन प्रतिष्ठानच्यावतीने कमिन्स इंडिया फौंडेशन आणि नाबार्ड बँकेच्या आर्थिक सहकार्याने देवगाव (ता. जि. अहमदनगर) येथे वातावरणातील बदलावर आधारित एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा, गायरान क्षेत्र, वनक्षेत्र आणि शेतकर्‍यांच्या वैयक्तिक शेतामधे सुमारे वीस हजार दुर्मिळ व औषधी झाडे लावली. त्याद्वारे निसर्ग संवर्धनाचे पथदर्शी कार्य सुरू आहे. त्या कामासाठी संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे.

नवजीवनच्यावतीने अहमदनगर, बीड, हिंगोली, पुणे, ठाणे या जिल्ह्यांत ग्रामीण विकास व पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले जात असून भविष्य काळात नगर तालुक्यातील प्रत्येक गावातील शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालये येथे घनवन प्रकल्प, देवराई निर्माण व मियाँवॉकी फॉरेस्टची निर्मिती करुन याद्वारे निसर्ग संवर्धनाचे कार्य करण्याचा संस्थेने संकल्प केला आहे अशी माहिती संस्थेचे विश्वस्त संजय आढाव व राजेंद्र पवार यांनी दिली. या कार्यासाठी संगीता पवार, अमित गायकवाड, जयेश कांबळे व दत्तात्रय गायकवाड कार्यरत आहेत.

Visits: 10 Today: 1 Total: 116956

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *