माऊली कोकाटेला चितपट करत हर्षवर्धन सदगीरची बाजी!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या पटांगणात झालेल्या माती कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला. अखेर पर्यंत चित्तथरारक झालेल्या २१७ कुस्ती स्पर्धांमधून अनेक नामवंत पैलवानांनी आपला खेळ दाखवला. यावेळी झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने माऊली कोकाटे याला चितपट करत मानाची गदा आणि ३ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.

यशोधन मैदानावर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्ताने भव्य कुस्ती स्पर्धा पार पडली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे, डॉ.जयश्री थोरात, बिग बॉस फेम सुरज चव्हाण,तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, रामहरी कातोरे, ॲड. सुहास आहेर, देवराम गुळवे,संजय चव्हाण,रमेश जेडगुले,जयंत बोऱ्हाडे,भाऊराव बोऱ्हाडे,सरपंच सीताराम गुळवे,नामदेव म्हस्कुले, नंदु बोऱ्हाडे,भाऊसाहेब शिरतार,सोमनाथ शिरतार, मच्छिंद्र म्हस्कुले,हौसीराम बोऱ्हाडे,तुळशीराम शिरतार सह अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

या कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून नामांकित मल्ल उपस्थित होते. विविध बक्षिसांच्या २१७ लढती झाल्या. दुपारी चार वाजता सुरू झालेल्या या लढती रात्री अकरा वाजता संपल्या. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान, अद्यावत एलईडी व्यवस्था, लाईट व्यवस्था, बैठक व्यवस्था, यांच्यासह सुमारे २५०० कुस्तीप्रेमींची उपस्थिती हे या कुस्ती स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या तिसऱ्या लढतीमध्ये शाहरुख खान याने विजय यावर मात केली. तर दोन लाख ५१ हजार रुपये दुसरे बक्षीस असलेल्या लढतीमध्ये समीर शेख याने बाळू अपराध याच्यावर मात केली. या सर्व लढली अत्यंत लक्षवेधी ठरल्या. यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अंतिम ३ लाख ११ हजार रुपयांची महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व माऊली कोकाटे यांची कुस्ती लावण्यात आली. श्वास रोखून जाणारी ही कुस्ती जवळजवळ आठ मिनिटे चालली. लवचिकता, ताकद आणि डावपेजांची आखणी यामुळे ही कुस्ती अत्यंत लक्षवेधी ठरली. अखेरच्या क्षणी अकोल्याचे सुपुत्र हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारत प्रथम बक्षीस व मानाची गदा पटकावली.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कुस्ती हा महाराष्ट्राचा खेळ आहे. खाशाबा जाधव यांची परंपरा लाभलेल्या या खेळाने अनेकांना मोठे यश मिळवून दिले आहे. ताकद आणि बुद्धीचा हा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. रामोशी समाज हा कायम प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिला आहे. मात्र सध्या काही लोक द्वेष निर्माण करून या समाजामध्ये फुट निर्माण करू पाहत आहे. तरुणांनी फूट पाडणारे लक्षात घेतले पाहिजे. हे लोक संगमनेरचा लौकिक कमी करण्याचा प्रयत्न करत असून तालुक्याला बदनाम करत आहेत.अशा लोकांना वेळीच रोखा.शिक्षण व समाजाचा विकास हे अत्यंत गरजेचे असून आगामी काळामध्ये संगमनेर मध्ये अत्याधुनिक कुस्ती तालीमसाठी प्रशिक्षण केंद्र करण्यात येईल असे ते म्हणाले.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यामध्ये तरुणांना सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. राज्यभरातून अनेक तरुण संगमनेर मध्ये करिअर निर्माण करण्यासाठी येत असून आपले महत्त्व ओळखा. भूलथापांना बळी पडू नका असे त्या म्हणाल्या. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महेश गोफने,मनोज चव्हाण,रमेश गफले,रोशन गोफने,सचिन बोऱ्हाडे,नितीन बोऱ्हाडे,सोमा माकरे,शरद बोऱ्हाडे,सुनील गुळवे,गणेश शिरतार, दिलीप शिरतार,राहुल म्हस्कुले,विकास बोऱ्हाडे,संतोष गुरुकुले, लक्ष्मण बोऱ्हाडे, बाळासाहेब म्हस्कुले,रोहिदास शिरतार,विशाल मंडले,गणेश गोफने,तानाजी शिरतार, समीर चव्हाण,विशाल गोफने यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी युवक व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात सत्काराला फाटा देऊन या सत्काराची रक्कम व त्यामध्ये काही योगदान टाकून ५१ हजार रुपये डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना देण्याचे उत्सव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले.

Visits: 58 Today: 2 Total: 1099204
