वीज कंपनीच्या ‘कसाब’ने दाबून ठेवले तब्बल पाचशे नवे मीटर! विखे साहेब तुमच्या जिल्ह्यात चाललंय तरी काय?; भ्रष्टाचारासाठी सामान्यांची पिळवणूक..


श्याम तिवारी, संगमनेर

सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या संगमनेरच्या वीज वितरण कंपनीतील अनागोंदी, मनमानी आणि भ्रष्टाचारी कारभारावर बुधवारी दैनिक नायकने जळजळीत प्रकाश टाकल्यानंतर संपूर्ण वीज कंपनीत हडकंप माजला आहे. या वृत्तानंतर भाग एकच्या उपकार्यकारी अधिकार्‍यासह त्याच्या हाताखाली काम करणार्‍या कनिष्ठ अभियंत्यांचे वेगवेगळे किस्से आता कानावर येवू लागले असून सदरचा वरीष्ठ अधिकारी जनतेसाठी नव्हेतर केवळ ठेकेदारांसाठीच वीज कंपनीत सेवा करीत असल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे. यावरही कहर म्हणजे शहरातील तब्बल तीन हजारांहून अधिक वीज ग्राहक मीटर बदलून देण्यासाठी त्राही करीत असताना या महाशयांनी गेल्या दोन महिन्यांपासून तब्बल पाचशेहून अधिक मीटर आपल्या बुडाखाली दाबून ठेवल्याचा संतापजनक प्रकारही आता उघड झाला असून केवळ गौण खनिजांच्या मागे हात धुवून लागलेल्या महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललंय तरी काय? असा सवाल विचारण्याची वेळ आता आली आहे. केवळ भ्रष्टाचारासाठी काम करणार्‍या या अधिकार्‍याला त्याच्याच कार्यालयात ‘कसाब’ नावाने ओळखले जाते हे विशेष.

बुधवारी (ता.30) दैनिक नायकने संगमनेरच्या वीज वितरण कंपनीतील भ्रष्टाचारात बरबटलेल्या अधिकार्‍यांच्या कारनाम्यांची पोलखोल करणारी वृत्तमाला सुरु केली. यातील पहिल्याच वृत्ताला संगमनेरकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. वीज कंपनीच्या गलिच्छ आणि भ्रष्टाचारी कारभाराने नागावलेल्या अनेक वीज ग्राहकांसह वितरण कंपनीत प्रामाणिकपणे सेवा बजावू इच्छिणार्‍या काही कर्मचार्‍यांनीही दैनिक नायकच्या कार्यालयात फोन करुन समाधान व्यक्त करण्यासोबतच अशा अधिकार्‍यांच्या काळ्या कामांची माहितीही देण्याचे काम केले. त्यातून वितरण कंपनीच्या संगमनेर उपविभागातील भाग एकच्या उपकार्यकारी अभियंत्याबाबत असंख्य तक्रारी असूनही आणि त्यांचा येथील कार्यकाळ पूर्ण होवूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे कटू सत्यही समोर आले आहे.

संगमनेरातील असंख्य वीज ग्राहकांचे मीटर व्यवस्थित काम करीत नसल्याने त्याचा भुर्दंड त्यांना सोसावा लागत आहे. याबाबत तक्रारी केल्यानंतर ‘तुमचे मीटर फॉल्टी आहे, नवीन मीटरसाठी अर्ज करा व पैसे भरा’ असे उत्तर प्रत्येक ग्राहकाला दिले जाते. यामागील इंगितही आता उघड झाले असून पूर्वी अस्तित्त्वात असलेले मात्र सद्यस्थितीत खराब झालेले मीटर कोणतेही शुल्क न घेता बदलून देण्याची संपूर्ण जबाबदारी वीज वितरण कंपनीची असतांनाही सर्रास सगळ्यांकडून अनामत रक्कमेच्या नावाखाली पैसे लाटले जातात. त्यातही थेट वीज कंपनीत जावून व अर्जावळी करुन काहीही साध्य होत नाही, त्यासाठी ‘कसाब’ नावाने ओळख असलेल्या उपकार्यकारी अभियंत्याच्या हाताखालील अष्टप्रधान मंडळातील त्या-त्या विभागातील कनिष्ठ अभियंत्याला व्हाया दलाल पाच ते सात हजार रुपयांची लाच द्यावी लागते.

गेल्या काही महिन्यांमध्ये संगमनेर उपविभागातील मीटरबाबत असंख्य तक्रारी आहेत. त्यात मीटर पूर्णतः खराब असणे, दिवसा मीटरवरील आकडे न दिसणे, अचानक रिडींग गायब होणे, मीटरवरील आवरण खराब झाल्याने प्रत्यक्ष आकडेवारी न दिसणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. दैनिक नायकला मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत भाग एकच्या अंतर्गत येणार्‍या परिसरातील जवळपास तीन हजारांहून अधिक वीज ग्राहकांनी नवीन मीटर मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. यामध्ये नूतन कनेक्शन हवे असलेल्या ग्राहकांचाही समावेश आहे. संगमनेरातील मीटरची वाढती मागणी लक्षात घेवून संगमनेरच्या कार्यकारी अभियंत्यांनी दोन महिन्यांपूर्वी याच ‘कसाब’च्या हाती दहा-वीस नव्हेतर तब्बल 500 नवीन मीटर सोपविले होते.

इतक्या मोठ्या प्रमाणात मीटर प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार संबंधित उपकार्यकारी अभियंत्याने आपल्या हाताखालील आठही कनिष्ठ अभियंत्यांच्या मागणीनुसार त्यांना ते समान वाटप करणे अपेक्षीत होते. मात्र प्रत्येक मीटरमागे कनिष्ठ अभियंता पैसे घेतात, मात्र आपल्याला त्याचा वाटा मिळत नसल्याच्या संशयावरुन त्याने प्राप्त झालेले सर्वच्या सर्व पाचशे मीटर आपल्या बुडाखाली दाबून ठेवले. त्यामुळे सामान्य ग्राहक मीटर बदलून मिळण्यासाठी वीज कंपनीत दररोज खेट्या घालीतच राहिले. त्यात वृद्ध, निराधार, दिव्यांग अशा कितीतरी नागरिकांचा समावेश असतांना भ्रष्टाचाराच्या मलिद्यात आकांत डूंबलेल्या या लालची कसाबला मात्र त्यांची दया आली नाही. त्यामुळे दोन महिन्यांनी विभागीय कार्यालयाने मीटरचे वितरणच होत नसल्याने टप्प्याटप्प्याने ते अन्य विभागात वळविण्यास सुरुवात केली.

याचाच अर्थ वीज वितरण कंपनीकडे ग्राहकांना देण्यासाठी आवश्यक असलेले मीटर उपलब्ध असतानाही केवळ एका उपकार्यकारी अभियंत्यामुळे असंख्य ग्राहकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करण्याची वेळ आली. ज्यांचे काम अडले होते, मात्र त्यांना व्हाया दलालीचा मार्ग अवगत नव्हता किंवा दलालाला देण्यासाठी इतके पैसे नव्हते त्यांनी खासगी दुकानांमध्ये जवळपास अडीच हजार रुपयांना मिळणारे नवीन मीटर आणून बसविल्याचीही माहिती यानिमित्ताने प्राप्त झाली. यावरुन या अधिकार्‍याने गेल्या चार वर्षांच्या आपल्या येथील कारकीर्दीत मांडलेला भ्रष्टाचाराचा उच्छाद अधिक ठळकपणे समोर आला आहे.

यादरम्यानच गेल्या शनिवारी (ता.26) या उपकार्यकारी अभियंत्याच्या लाचखोरीचा आणखी एक धक्कादायक किस्साही समोर आला असून विशेष म्हणजे या दिवशी कार्यालयाला साप्ताहिक सुट्टी होती. एरव्ही कामकाजाच्या दिवशीही केवळ ठेकेदारांचे अथवा भ्रष्टाचाराचे काम असल्यावरच नाशिकहून संगमनेरला येणार्‍या या महाशयांना औद्योगिक वसाहतीमधील एका कामाच्या संदर्भात ठेकेदाराने फोन केला होता. या कामातून मलिदा मिळणार आहे असे समजताच हे महाशय चक्क सुट्टीच्या दिवशी नाशिकहून संगमनेरात पोहोचले आणि थेट औद्योगिक वसाहतीतच ठाण मांडून बसले. मात्र गेल्या आठवड्यात औद्योगिक वसाहतीचा वीज पुरवठा सुरळीत असल्याने व तो खंडीत होणार नसल्याबाबत पूर्वमाहिती असल्याने बहुतेक कारखानदारांनी आपले उद्योग सुरु ठेवले होते.

नियमानुसार ज्या भागात वीजेच्या पुरवठ्या संदर्भात कर्मचार्‍यांना काम करायचे आहे, त्या विभागातील वीज पुरवठा त्या कालावधीत खंडीत करण्यात येतो. त्यासाठी त्या-त्या विभागातील कनिष्ठ अभियंत्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागते व त्यांच्याचकडून त्याचे परमिटही प्राप्त करावे लागते. मात्र कनिष्ठ अधिकार्‍याला याबाबत सांगितल्यास आपला ‘वाटा’ कमी होईल म्हणून या उपकार्यकारी अधिकार्‍याने परस्पर परमिट देवून औद्योगिक वसाहतीचा वीज पुरवठा नियोजित नसताना खंडीत केला व ‘त्या’ ठेकेदाराला त्याचे काम करण्यास मुभा दिली. अचानक वीज पुरवठा बंद झाल्याने कारखान्यांमधील कामकाज थांबले, त्यामुळे कामगार रिकामे फिरु लागल्याने उद्योजकांना मनस्ताप झाला. मात्र जेव्हा त्यांना खरी गोम समजली तेव्हा त्यांनी कोंडाळं करुन ‘त्या’ उपकार्यकारी अभियंत्याला जाब विचारताच त्याने तेथून पळ काढला. यावरुन वीज मंडळाच्या शहर विभागात या अधिकार्‍याची मनमानी आणि भ्रष्टाचारी प्रवृत्ती अधिक स्पष्ट झाली असून केवळ जिल्ह्यातील गौण खनिजांच्या मागे हात धुवून लागलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांशी निगडीत असलेल्या या विषयावर लक्ष्य देण्याची नितांत गरजही निर्माण झाली आहे.


वीज कंपनीतील ‘कसाब’!
भ्रष्टाचाराचे ‘टार्गेट’ असेल तरच नाशिकहून संगमनेरला येणे, आजवर कधीही दुपारचे जेवण स्वतःच्या पैशाने न घेणे, डोक्यावर नेहमी टोपी, भ्रष्टाचाराचा पैसा गोळा करुन नेण्यासाठी पाठीवर सॅक आणि दुपारच्या जेवणासाठी आधीच ठरवलेला ठेकेदार आणि त्याच्या पैशातून मिळणार्‍या बिर्याणीवरच ताव मारण्याची प्रवृत्ती यामुळे संगमनेरच्या या उपकार्यकारी अभियंत्याला त्यांच्याच कार्यालयात ‘कसाब’ म्हणून ओळखले जाते. ज्याप्रमाणे कसाबने हातात एके-47 रायफल घेवून कोणाचीही दयामाया न करता सर्वसामान्यांचे जीव घेतले, त्याप्रमाणे हा अधिकारी हातात रायफल नसतानाही सामान्यांचे रक्त पीत असल्याने त्याच्या कार्यालयीन सहकार्‍यांनीं केलेले त्याचे नामकरण अगदीच साजेशे ठरले आहे.

Visits: 24 Today: 2 Total: 116951

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *