खांडगावच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाणारे रस्ते उखडले! वाळूतस्करांविरोधात खांडगाव व गंगामाई परिसरात नागरिकांचे आंदोलन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरालगतच्या गंगामाई घाट परिसरासह खांडगाव शिवारातून सुरू असलेल्या वाळू उपशाला तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. या परिसरातून होणारा वाळू उपसा त्वरीत बंद करावा यासाठी खांडगावच्या ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन दिले तर वृक्ष परिवाराने नदीपात्रात झोपण्याचे आंदोलन करुन नदीपात्रातील वाळू उपशाला विरोध दर्शविला आहे. यावेळी या दोन्ही घटकांनी प्रचंड वाळू उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून शेतातील विहिरांना पाणी उतरत नसल्याची तक्रार केली आहे. खांडगाव शिवारातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या होत्या आता त्यात वाढ झाल्याने प्रशासन काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांसह वृक्ष परिवाराचे लक्ष लागले आहे.
शहरालगतच्या गंगामाई परिसरात शहरातील अबालवृद्ध आंघोळीसाठी व पोहण्यासाठी येत असतात. मात्र रिक्षा, बैलगाड्या व अन्य वाहनातून वाळू वाहतूक करणार्या वाळूतस्करांनी हा घाटच पोखरायला सुरुवात केल्याने नदीपात्रातील हा भाग अत्यंत धोकादायक बनला असून लहान मुलांना मोठा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात एखादी अघटीत घटना घडू नये यासाठी वृक्ष परिवाराने आज सकाळी गंगामाई परिसरातील नदीपात्रात झोपण्याचे आंदोलन केले. तर त्याचवेळी खांडगाव शिवारातील काही ग्रामस्थांनीही नदीपात्रात उतरुन परिसरात सुरू असलेला वाळू उपसा बंद केला व वाळूतस्करांनी वाहतुकीसाठी तयार केलेले रस्ते उखडून टाकले.
यावेळी या नागरिकांनी उपविभागीय अधिकार्यांच्या कार्यालयात येवून निवेदनही दिले आहे. त्यानुसार खांडगाव शिवारातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून रात्रभर मोठ्या संख्येने ट्रॅक्टरची घरघर सुरू राहत असल्याने आमचे जीवनच धोक्यात आल्याची तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे. सदरचा वाळू उपसा त्वरीत बंद करावा अशी विनंतीही या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर खांडगावातील भरत गुंजाळ, छाया गुंजाळ, रमेश गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, आप्पासाहेब गुंजाळ, संजय गुंजाळ, भास्कर गुंजाळ, अर्जुन अरगडे व सुनील रुपवते यांच्या सह्या आहेत.