… अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतरही बिबट्याचा दुर्दैवी अंत! अपघातातील बिबट्यांचे मृत्यू कधी थांबणार; वन्यप्रेमींचा सवाल..

नायक वृत्तसेवा, घारगाव
एरव्ही वाहनाची धडक, विहिरीत पडून तर भुकेने व्याकुळ होवून बिबट्या मृत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, गुरुवारी (ता.28) सकाळी बिबट्याचा आधी अपघात, नंतर बचावासाठी धडपड आणि शेवटी विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाला. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील जावळेवस्ती (ता.संगमनेर) येथे हा थरारक प्रकार पहावयास मिळाला. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी उसळली होती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अत्यंत रहदारी असणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात जंगली प्राण्यांचा अधिवास असतो. डोंगरातून हा महामार्ग जात असल्याने कायमच बिबट्यांसह इतर श्वापदे महामार्ग ओलांडत असतात. यामध्ये अनेकदा भरधाव वेगात असणार्‍या वाहनांच्या धडकेत मुक्या जिवांना मुकावे लागलेले आहे. अद्यापही हे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. गुरुवारी सकाळी चंदनापुरी गावांतर्गत असलेल्या जावळेवस्ती येथे महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला. जोराची धडक बसल्याने बिबट्या थेट महामार्गाच्या कडेला फेकला गेला. यामध्ये गंभीर इजा झाल्याने जीव वाचविण्यासाठी बिबट्या धडपड करत होता.

महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतात बिबट्या जावून विसावला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांनासह महामार्गावरुन जाणार्‍या प्रवाशांत समजताच त्यांनी वाहने थांबवून बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर वनविभागाला ही माहिती समजताच तत्काळ वनपाल रामदास डोंगरे, वनरक्षक विक्रांत बुरांडे, वन कर्मचारी रवी पडवळे, रवी क्षीरसागर, अरुण यादव, दौलत पठाण, दत्तू पर्बत आदिंनी पिंजर्‍यासह वाहन घेवून घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी डोळासणे महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, योगीराज सोनवणे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला वाचविण्यासाठी वन विभाग शर्थीचे प्रयत्न करत असताना बिबट्याने थेट वाहनाच्या चाकावर पंजा मारुन टायर फोडला. यातून बिबट्या पळ काढण्याचा प्रयत्न केला असता शेजारील विहिरीत पडला. अखेर वन विभागाचे आणि बिबट्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि बिबट्याचा दुर्दैवी अंत झाला.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, आळेखिंड, घारगाव, नवीन एकल घाट, डोळासणे, चंदनापुरी घाट, बाह्यवळण मार्ग, कर्‍हे घाट आदी ठिकाणी रस्ता ओलांडण्याच्या नादात वाहनांच्या धडकेत बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. अद्यापही ही मालिका सुरूच आहे. मात्र, हे दुर्दैवी प्रकार रोखण्यासाठी वन विभाग कधी उपाययोजना करणार? असा सवाल वन्यप्रेमी करत आहे.

Visits: 162 Today: 1 Total: 1101621

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *