भोकर शिवारात ट्रकला धडकून दोन तरुणांचा मृत्यू बिघाड झालेल्या ट्रकला दुचाकीने दिली पाठीमागून धडक

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
नेवासा राज्य मार्गावर भोकर (ता. श्रीरामपूर) शिवारातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या उसाच्या ट्रकवर पाठीमागील बाजूने मोटारसायकल धडकल्याने झालेल्या अपघातात दोेन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

गणेश राजेंद्र ससाणे (रा. वॉर्ड क्र.3, श्रीरामपूर) व योगेश अशोक यादव (रा. मुकिंदपूर, ता. नेवासा) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. बुधवारी (ता. 30) दुपारपासून भोकर शिवारातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध (एमएच.18, एम.8962) उसाने भरलेला ट्रक उभा होता. या ट्रकच्या मागील बाजूचे पाटे तुटल्याने तो कलंडण्याची शक्यता असल्याने तातडीने जेसीबी बोलावून ट्रकला आधार दिलेला होता. दुसर्या ट्रकमध्ये या बिघाड झालेल्या ट्रकमधील ऊस भरण्याचे काम सुरू होते.

दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नेवाशाकडून येत असलेली मोटारसायकल (क्र. एमएच.17, सीयू.3284) या उभ्या ट्रकवर पाठीमागून धडकली. यात श्रीरामपूर शहरातील तरुण गणेश राजेंद्र ससाणे व नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील योगेश अशोक यादव दोघेही गंभीर जखमी झाले, त्यातील एकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर दुसर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात मोटारसाकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघातादरम्यान राज्यमार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. अपघात घडल्याचे समजताच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थारोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोना. चाँद पठाण, प्रशांत रणनवरे, अनिल शेंगाळे व पोलीस मित्र बाबा सय्यद यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत रुग्णवाहिका पाचारण करत जखमींना उपचारांसाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. दोघेही मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. तसेच राज्यमार्गाचे दुतर्फा खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. तर बिघाड झालेला ट्रक रात्री उशीरापर्यंत रस्त्याच्या मधोमध तसाच उभा होता.
