छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसस्थानक परिसरातच व्हावा ः तांबे आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शहाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमनेरच्या ऐतिहासिक भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानुसार हा अश्वारूढ पुतळा व व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेव जाधव यांचे शहीद स्मारक संगमनेर बसस्थानकाच्या परिसरात व्हावे अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली असून त्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची माहिती संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली.
या संदर्भात जिल्हाधिकारी व शासनाकडे नगरपालिकेने सातत्याने पाठपुरावा केलाय. याचबरोबर संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी पालिकेने ३ जून २०१९ रोजी सर्वसाधारण ठभेमध्ये ठराव देखील केलेला आहे. त्यानंतर माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदार सत्यजीत तांबे यांनीही याकामी पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे २१ ऑगस्ट २०२३ रोजी सदर बसस्थानकावरील एसटी महामंडळाची जागा पालिकेकडे हस्तांतरित करावी अशी मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि एसटी महामंडळाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तो प्रस्ताव आता अंतिम टप्प्यामध्ये असून कुठल्याही क्षणी ती जागा अश्वारूढ पुतळ्यासाठी संगमनेर नपालिकेकडे वर्ग होईल अशी परिस्थिती आहे.
आता नव्याने अहमदनगर जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना शिवस्मारक करण्याबाबत घोषणा केली आहेत याचे मी स्वागतच करते आहे. तसेच अश्वारूढ पुतळासाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. मात्र बसस्थानकावरच हे स्मारक व्हावे यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी तातडीने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने जागेचे हस्तांतर अंतिम टप्प्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. परंतु, अश्वारूढ पुतळा व शहीद स्मारक यासाठी एक कोटीचा निधी पुरेसा नसून किमान दोन कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि बसस्थानक परिसरामध्ये व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेव जाधव शहीद स्मारक करता येईल, असे म्हटले आहे.