मुजीब शेख ठाकरे सेनेच्या उत्तर नगरचे जिल्हाप्रमुख! अप्पा केसेकरांना बढती; अमर कतारींकडे संपूर्ण संगमनेर शहर

नायक वृत्तसेवा, संगमनेर

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत उभे दोन गट निर्माण झाल्याने फुटीरांना बाजुला करुन ठाकरे गटाने जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. मात्र त्यानंतर संगमनेर-अकोल्यासह जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी जाहीर झालेल्या नावांना मोठा विरोध झाल्याने त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) मध्यवर्ती कार्यालयातून पुन्हा एकदा पदाधिकार्‍यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून अपेक्षेप्रमाणे संगमनेरच्या मुजीब शेख यांच्यावर उत्तर नगर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ शिवसैनिक अप्पासाहेब केसेकर यांना बढती देण्यात आली असून त्यांच्यावर जिल्हा संघटकाचा भार सोपविण्यात आला आहे. त्यासोबतच शहरासाठी दोन प्रमुखांचा निर्णय मागे घेत पक्षाने अमर कतारी यांच्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी सोपविली आहे.

चार महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर केल्या होत्या. मात्र त्यावेळी पदाधिकार्‍यांच्या नावावरुन मोठा गदारोळ निर्माण होवून संगमनेर, अकोले, कोपरगाव व राहता तालुक्यात त्याला मोठा विरोध झाला. काही ठिकाणी शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी संपर्कप्रमुख बबन घोलप व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रतिमांवर आगपाखड करण्याचेही प्रकार घडले. तत्कालीन संगमनेर तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी थेट मातोश्रीवर जावून नाराजी नोंदविल्याने त्यावेळी जाहीर झालेल्या निवडींना स्थगिती देण्यात आली होती, तेव्हापासून नवपदाधिकार्‍यांच्या निवडी रखडल्या होत्या.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्रघातानुसार नूतन पदाधिकार्‍यांच्या नावाची घोषणा सामना या पक्षाच्या मुखपत्र असलेल्या दैनिकातूनच जाहीर केली जाते. त्यानुसार आज जिल्ह्यातील नूतन पदाधिकार्‍यांची नावे जाहीर झाली असून कामगार सेनेच्या माध्यमातून गेली दोन-अडीच दशके मोठे काम करणार्‍या मुजीब शेख यांच्यावर उत्तरेतील संगमनेर, अकोले व राहाता (शिर्डी) तालुक्यांची तर प्रमोद लबडे यांच्यावर कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वीचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना दक्षिण स्वारीवर पाठविण्यात आले आहे.

याशिवाय यापूर्वी संगमनेर-अकोले विधानसभा मतदार संघाचे समन्वयक म्हणून काम पाहणार्‍या अप्पासाहेब केसेकर यांना पक्षाने बढती दिली असून त्यांना जिल्हा संघटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपजिल्हाप्रमुख पदावर संगमनेर व अकोले तालुक्यासाठी महेश नवले, श्रीरामपूर शहरासाठी शेखर दुभैय्या, श्रीरामपूर ग्रामीणसाठी देवीदास सोनवणे यांची निवड झाली आहे. तालुका प्रमुखपदासाठी भाऊसाहेब हासे (संगमनेर), संजय फड (संगमनेरचा पठारभाग), मनोज मोरे (अकोले पूर्व), संतोष मुर्तडक (अकोले पश्चिम), शिवाजी ठाकरे (कोपरगाव), सचिन कोते (राहाता), राधाकृष्ण बोरकर (श्रीरामपूर पश्चिम) व दादा कोकणे (श्रीरामपूर पूर्व), विधानसभा संघटक अस्लम शेख (कोपरगाव).

यापूर्वी संगमनेर शहरासाठी गावठाण व उपनगर असे दोन स्वतंत्र शहरप्रमुख नेमण्यात आले होते. मात्र पक्षाने आता या पद्धतीत बदल करुन तुलनेने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्याचा पठारभाग (46 गावे) आणि उर्वरीत तालुका असे दोन भाग करीत त्यासाठी दोन स्वतंत्र तालुकाप्रमुखांची नेमणूक केली आहे, तर शहर विभागासाठी आता अमर कतारी यांच्यावर संपूर्ण संगमनेरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबरोबरच अकोले शहरप्रमुखपदी नितीन नाईकवाडी, सनी वाघ (कोपरगाव), संजय शिंदे (शिर्डी), भागवत लांडगे (राहाता) व अतुल शेटे (श्रीरामपूर). तसेच, शहर समन्वयक कलविंदर दडियाल (कोपरगाव) व शहर संघटक म्हणून गणेश होले (राहाता) यांची निवड जाहीर झाली आहे.

Visits: 150 Today: 1 Total: 1423480

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *