जायंट किलर आमदाराचा राज्यमंत्रीपदाने होणार सन्मान! मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच फडकवला भगवा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यानंतरही संगमनेर मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवणारे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचे नशिब भलत्याच उंचीवर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून प्रत्येक निवडणुकीत सलग सामना करुनही शिवसेनेला संगमनेर विधानसभा मतदार संघ मिळवता आला नव्हता. मात्र यावेळी एका सामान्य कार्यकर्त्याने ही किमया साधताना भारतीय संविधान लागू झाल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला ठरलेल्या या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारीत विजय साकारल्याने त्यांचा सन्मान म्हणून त्यांना राज्यमंत्रीपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी खूद्द हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र राज्यात सध्या सरकार स्थापण्याबाबत निर्माण झालेला अंतर्गत पेच लक्षात घेता या बातमीमागील सत्य समोर येण्यास प्रतिक्षा करावी लागणार आहे.

स्वतंत्र भारतात 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाल्यानंतर 1951 साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून नंतरच्या काळातील किरकोळ अपवाद वगळता संगमनेर मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा मोठा प्रभाव राहीला आहे. आणीबाणीनंतर विभागलेल्या काँग्रेसमध्ये दोन गट पडून इंदिरा काँग्रेसची स्थापना झाली. दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांना 1978 साली विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या बी.जे.खताळ-पाटलांचा 1 हजार 101 मतांनी पराभव झाला. तर, 1985 साली बाळासाहेब थोरात यांनी बंडखोरी करुन स्वपक्षाच्याच शकुंतला थोरात यांचा पराभव केला. निवडून आल्यानंतरही त्यांनी काँग्रेसच्या विचारांची कास सोडली नाही. त्यामुळे 1951 पासून ते 2024 पर्यंत जवळपास सत्तर वर्ष संगमनेर मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव राहीला आहे.

यावेळी मात्र मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिण योजनेला ‘बटेंगे तो कटेंगे’ या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेची साथ मिळून राज्यात सत्तांतराची आस लावून बसलेल्या महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. त्यात काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला समजल्या जाणार्या संगमनेर मतदारसंघाचा बुरुजही ढासळला. अर्थात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामागे या दोन कारणांसह स्थानिक पातळीवरील असंख्य गोष्टी कारणीभूत असल्याचे वेगवेगळ्या विश्लेषणातून यापूर्वीच समोर आले आहे. त्या कारणांचा नेमका वेध घेवून माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी अमोल खताळांच्या विजयाची पेरणी केली. तालुक्याच्या जिल्हा परिषद गटनिहाय सभा घेवून त्यांनी स्थानिक मुद्द्यांना हवा देत मतदारसंघातील वातावरण पलटवले.

सामान्य शेतकरी कुटुंबातील, सायबर कॅफे चालवून प्रपंच करणार्या अमोल खताळ यांना त्याचा खूप फायदा झाला. खताळ यांची प्रतिमाही निष्कलंकित असल्याने त्यांनी हाती आलेल्या अवघ्या 15 दिवसांत मतदारसंघातील बहुतेक मतदारांच्या उंबर्यांपर्यंत पोहोचून आपल्या प्रतिमेसह ‘धनुष्यबाण’ पोहोचवला. सततच्या सत्तेमुळे थोरातांच्या बाबतीत निर्माण झालेल्या नकारात्मक मतांचाही त्यात समावेश होत गेला. धांदरफळातील ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याला हिंसेतून उत्तर दिले गेल्याने थोरातांच्या बाजूने निर्माण होवू पाहणारी सहानुभूती अमोल खताळांच्या बाजूला झुकली. त्यात योगी आदित्यनाथांची ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणा, सज्जाद नोमानी यांचा ऑडिओ भरसभेत ऐकवून ‘हा व्होट जिहाद असेल तर, मग ही निवडणूक आपल्यासाठी धर्मयुद्ध आहे’ असे सांगत आक्रमक झालेल्या माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची भर पडल्याने संगमनेरातील वातावरण फिरले.

आणि यापूर्वी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार्या भाजपच्या वसंतराव गुंजाळ, शिवसेनेच्या डॉ.अरुण इथापे, बापूसाहेब गुळवे, संभाजीराव थोरात, बाबासाहेब कुटे, जनार्दन आहेर, साहेबराव नवले यांना जे जमले नाही, ते 41 वर्षांच्या अमोल खताळ नावाच्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणाने करुन दाखवले आणि गेल्या चार दशकांपासून संगमनेर मतदारसंघावर अधिराज्य गाजवणार्या दिग्गजनेते बाळासाहेब थोरात यांचा 10 हजार 560 मतांनी पराभव करीत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संगमनेर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकावला.

या विजयानंतर डॉ.सुजय विखे-पाटील यांनी त्यांच्यासह विजयी मिरवणूक काढल्यानंतर विशेष विमानाने त्यांना मुंबईला नेले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी त्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. जायंट किलर ठरलेल्या आमदार अमोल खताळ यांचे त्यांनी भरभरुन कौतुकही केले. असाच अनुभव माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या भेटीतूनही आल्याने खताळ यांचे मनोधैर्य उंचावले. एका साधारण तरुणाने मिळवलेल्या या विजयाने प्रभावित झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या संभाव्य राज्यमंत्र्यांच्या यादीतही अमोल खताळ यांच्या नावाचा समावेश केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेरला महसूल तर, राहुरीला ऊर्जाखात्याचे राजमंत्रीपद मिळाले होते. यावेळच्या मंत्रीमंडळात राधाकृष्ण विखे-पाटील यांना ‘महत्त्वाचे’ आणि सोबतच शिवसेनेकडून अमोल खताळ यांना ऊर्जामंत्रीपद मिळाल्यास आश्चर्य होणार नाही.

स्वतंत्र भारतात संविधान लागू झाल्यानंतर राज्यात 1951 साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली होती. त्यानंतर 2024 पर्यंतच्या 73 वर्षात अपवाद वगळता या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा पगडा राहीला आहे. 1978 साली भाऊसाहेब थोरात यांनीही या मतदारसंघाचे नेतृत्त्व केले. तर, 1985 पासून बाळासाहेब थोरात या मतदारसंघातून सलग आठवेळा निवडून गेले. यावेळी जिल्ह्यातील बारामधील तब्बल दहा जागा मिळवण्यातही महायुतीला यश आले आहे. त्यामुळे पक्षात राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दबदबा वाढला आहे. अशास्थितीत त्यांच्यासह त्यांच्याच प्रयत्नातून निवडून आलेल्या अमोल खताळ यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यास आश्चर्य निर्माण व्हायला नको.

