घारगाव ते कोठे बुद्रुक रस्ता बनला मृत्यूचा सापाळा! रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांचे होताहेत हाल


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील घारगाव ते कोठे बुद्रुक हा डांबरी रस्ता खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापाळा बनला आहे. तर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम व्हावे म्हणून वारंवार मागणी करूनही याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

घारगाव, बोरबन, कोठे बुद्रुक व वनकुटे हा संपूर्ण डांबरी रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जात आहे. या रस्त्यावरून रात्रंदिवस छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ असते त्यात स्कूल बसचाही समावेश आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या डांबरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे सर्वजण वैतागले आहे. तर दुचाकीस्वारांचे पाठीचे मणके दुखू लागले आहेत. यामुळे प्रवाशांसह परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात धुव्वादार पाऊस सुरू होता. त्यामुळे डोंगरांसह ओढ्या-नाल्यांचे पाणी थेट या रस्त्यावर येते. त्यातून हा रस्ता खराब झाला आहे. सध्या या रस्त्यावरून ठिकठिकाणी पाणी वाहत आहे. रस्ता दुरुस्ती करण्याबाबत वारंवार मागणी करूनही याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. खासदार व आमदारही याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिक सांगत आहे. त्यामुळे आता घारगाव ते कोठे बुद्रुक रस्त्यावरील जीवघेणे खड्डे कधी बुजवणार आहे, असा सवालही संतप्त झालेल्या नागरिकांनी केला आहे.

घारगाव, बोरबन, कोठे बुद्रुक व वनकुटे हा डांबरी रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापाळा बनला आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना पाठदुखीचा त्रास होवू लागला आहे. त्याचबरोबर एसटी बस, स्कूल बस, मालवाहतूक, छोट्या-मोठ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. परंतु, अशी परिस्थिती होवूनही संबंधित विभाग का दुर्लक्ष करतोय असा सवाल करत आहे.

Visits: 168 Today: 1 Total: 1804466

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *