मुख्यमंत्रीसाहेब, थोडं गृहखातंही गांभीर्याने घ्या! मुकूंदनगरच्या घटनेने जिल्ह्यातून संताप; पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशविरोधी आणि कडव्या धार्मिक कारवायांच्या कारणाने गेल्याकाही वर्षात अहिल्यानगरमधील मुकूंदनगर परिसराची ओळख अधिक ठळक होत असताना गेल्या शुक्रवारी त्यात आणखी एका जिहादी घटनेची भर पडली. या परिसरातील पथदिव्याचे काम करणार्या महापालिकेच्या कंत्राटी कर्मचार्याने कपाळावर भगवा टीळा लावला इतक्या क्षुल्लक कारणातून पाच ते सात धर्मांध जिहाद्यांनी त्याला कब्रस्थानात नेवून जीवघेणी मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ अवघ्या 22 वर्षीय तरुणाने 48 तास मृत्यूशी झूंज दिल्यानंतर रविवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयानक घटनेत केवळ कपाळावर टीळा लावून मुस्लिम बहुल भागात काम करणार्या तरुणाचा जीव घेतला गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप निर्माण झाला आहे. या धक्कादायक प्रकारातून जिल्ह्यातील पोलिसांची अकार्यक्षमता, वाढती गुन्हेगारी, गंभीर प्रकरणांचे प्रलंबित तपास, अवैध व्यवसायांमध्ये भरमसाठ वाढ आणि गुन्हेगारांशी सलोखा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून मुख्यमंत्रीसाहेब, थोडं गृहखातंही गांभीर्याने घ्या असं म्हणायची वेळ नगरी माणसावर आली आहे.

गेल्या शुक्रवारी (ता.7) अहिल्यानगर महापालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत असलेला धीरज परदेशी (वय 22, रा.माधवबाग, भिंगार) हा आपल्या एका जोडीदारासह मुकूंदनगर परिसरातील पथदिव्याचे काम करीत होता. नेहमीप्रमाणे त्यावेळी त्याने आपल्या कपाळावर भगवा टीळाही लावला होता असे सांगितले जाते. त्याच कारणावरुनच त्याला पाच ते सात जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याने 48 तास मृत्यूशी शर्थ केली, मात्र रविवारी (ता.9) सायंकाळी ती थोटकी ठरली. त्याचा मृत्यू झाल्याची वार्ता अहिल्यानगर शहरात पसरताच शहरात तणाव निर्माण झाला. आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले यांनी हजारो संतप्त कार्यकर्त्यांसह पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर ठिय्या दिला. तो पर्यंत पोलिसांना घटनेचे गांभीर्य उमजल्याने त्यांनी थेट तेलंगाणापर्यंत धाव घेत या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एकूण पाचजणांना अटक केली, त्यात पळून जाणार्यांना मदत करणार्या दोघांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी या प्रकरणात सखोल तपास सुरु असल्याचे सांगत सूत्रधाराला गजाआड केल्याची माहिती देवूनही नागरीकांचा रोष शांत होवू शकला नाही. अशाप्रकारच्या जिहादी मानसिकतेच्या प्रवृत्ती जर जिल्ह्यात राजरोसपणे पोसत असतील तर या गोष्टी येथील सामाजिक एकोप्याला आणि कायदा-सुव्यवस्थेलाही आव्हानात्मक ठरणार्या आहेत. याला जिल्हा पोलिसांची अकार्यक्षमताही तितकीच कारणीभूत असून गंभीर प्रकरणातील आरोपींनाही कायदेशीर पळवाटा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याने जिल्ह्यातील एकंदरीत स्थिती भयावह बनली आहे.

गेल्याच महिन्यात श्रीरामपूरमध्ये भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाचा खून झाला होता. एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या पटकथेला शोभावे अशाप्रकारच्या या हत्याकांडात केवळ जेवणाची वेळ संपली इतके सांगितल्याच्या कारणावरुन थेट हॉटेल मालकालाच जीवे मारण्यात आले. त्याहूनही धक्कादायक म्हणजे खून केल्यानंतरही तिघा आरोपींचा घटनास्थळावरील वावर, देहबोली आणि तासाभराने पोलीस आल्यानंतरही त्याची सहजता आणि त्यानंतर ‘त्या’ प्रकरणाची वाटचाल. खरेतर या घटनेतून जिल्ह्याच्या कायदा व व्यवस्थेचे अक्षरशः धिंदवडे निघाले होते. श्रीरामपूरच्या व्यापार्यांनी पाच दिवस कडकडीत बंद पाळून शहरातील दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम या क्षणापर्यंत दिसून आला नाही.

दरम्यानच्या काळात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दित घडलेल्या एका अलिशान वाहनाच्या अपघातातून आंतरराज्य गुटखा तस्करीसह लव्हजिहाद, शस्त्र तस्करी, कट्टरतावाद पोसण्याचे उद्योग असलेला आणि सध्या सशर्त जामीनावर बाहेर असलेला युसुफ दादा चौगुले सूत्रधार असल्याचे उघड झाले होते. या घटनेला आता दोन महिने उलटत आहेत, मात्र तालुका पोलिसांना अद्यापही त्याचा मागमूस काढता आलेला नाही. या दरम्यान त्याने पोलिसांशी सलोखा साधून आपल्या मुक्ततेची तजबीज केल्याचीही मोठी चर्चा संगमनेरात रंगली होती. माध्यमांनीही त्यावर आवाज उठवला होता, मात्र भारतीय पोलीस सेवेतून आलेल्या, आणि जिल्ह्याने मोठ्या अपेक्षा बाळगलेल्या पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्यापर्यंत तो पोहोचलाच नाही, किंवा पोहोचूनही त्यांनी ऐकलाच नाही.

अहिल्यानगरमधील मुकूंदनगर गेल्याकाही वर्षातील धक्कादायक घटनांच्या श्रृंखलेतून सतत चर्चेत असते. या भागातून निघणार्या धार्मिक जुलूसमधून क्रूरकर्मा औरंगजेब, टीपू सुलतान यांच्या प्रतिमा मिरवून जातीय तेढ निर्माण करण्याच्या डझनावर घटना आहेत. राष्ट्रीय तपास एजन्सी असो अथवा राज्याचा दहशतवाद विरोधी विभाग. या दोन्ही यंत्रणांनी अहिल्यानगरच्या मुकूंदनगरमध्ये आजवर असंख्य कारवाया केल्या आहेत. आजही या यंत्रणांचे लक्ष या भागातील हालचालींवर टिकून असते. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या मुख्यालयस्थानी असूनही मुकूंदनगरमधील अशाप्रकारच्या धर्मांध आणि जिहादी कारवायांना आळा बसू शकला नाही हे पोलिसांचे सर्वात मोठे अपयश आहे. अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि संगमनेरमधील अशा वृत्तींना यंत्रणांकडूनच मिळणारे पाठबळ, त्यातून वाढत असलेले अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारांची संख्या पाहता येणार्या काही काळात संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारांचे वर्चस्व निर्माण होते की काय अशी भीती वाटू लागली असून आता गृहमंत्रीपदाचाही कारभार हाकणार्या देवेंद्र फडणवीस यांना ‘मुख्यमंत्रीसाहेब, थोडं गृहखातंही गांभीर्याने घ्या!’ असं म्हणायची वेळ अहिल्यानगरकरांवर आली आहे, वेळीच ती ऐका, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याच्या आर्थिक विकासात अहिल्यानगरसह संगमनेर आणि श्रीरामपूर या उत्तरेतील दोन्ही तालुक्यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र गेल्याकाही वर्षात गुन्हेगारी प्रवृत्तींपाठोपाठ आता अशाप्रकारच्या धर्मांध आणि जिहादी मानसिकतेच्या घटकांचीही त्यात मोठी भर पडत असून त्यामागे त्यांच्याकडून चालवल्या जाणार्या अवैध व्यवसायातून वाहणारा प्रचंड पैसाही आहे. त्यातून जिल्ह्याची कायदा व व्यवस्था तळाला जावू लागली असून पोलिसांमधील अकार्यक्षमताही वाढीस लागल्याने प्रलंबित तपासाच्या फाईलींचा ढीगारा वाढला आहे. त्याचा परिणाम गुन्हेगारी घटना वाढण्यात होवू लागल्याने वरील तिनही तालुक्यांसह एकंदरीत जिल्ह्याची सामाजिक शांतताच धोक्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकामागून एक घडलेल्या अशा घटनांचा मागोवा घेत कठोर निर्देश देण्याची गरज असून जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवून गुन्हेगार आणि त्यांची शस्त्र ताब्यात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

