शिवसेनेच्या संगमनेर शहरप्रमुखांवर दाखल होणार बदनामीचा गुन्हा? पुरावा नसताना लाचखोरीचा आरोप; भाजपकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर येथील अमरधाम सुशोभिकरणाच्या दुसर्या व तिसर्या टप्प्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांवरुन सध्या संगमनेरातील स्थानिक राजकारण गढूळ झाले आहे. या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालावरुन शहर पोलीस ठाण्यात पालिकेच्या दोघा अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप व शिवसेनेमध्ये (ठाकरे गट) आरोप-प्रत्यारोप सुरु असतांना आता सेनेच्या दाव्याचा आधारच निखळल्याने तीन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी केलेला लाचखोरीचा आरोप आता फोल ठरला आहे. याप्रकरणात कोणताही सबळ पुरावा नसतानाही त्यांनी बदनामी केल्याने व त्यासाठी सोशल माध्यमांचा वापर केल्याने भाजपकडून बदनामीचा खटला दाखल करण्याच्या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु झाल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. त्यामुळे तीनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेवून भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी या प्रकरणात 30 लाखांची तडजोड केल्याचा जाहीर आरोप करणारे शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अमरधाम सुशोभिकरण प्रकरणाबाबत भाजयुमोने पहिल्यांदा आवाज उठविला होता. पालिकेने पूर्वी झालेल्या कामांचा हवाला देत अपहार करण्याच्या हेतूने त्याच कामांचा समावेश दुसर्या व तिसर्या टप्प्यात करुन निविदा काढल्याचा गंभीर आरोप करुन भाजयुमोसह भाजपने 28 डिसेंबर 2021 रोजी पालिकेच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण केले होते. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी जनता पंचनामा करीत भाजपने या प्रकरणाला वाचा फोडण्यासोबतच वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याच्या तक्रारीही केल्या. त्या अनुषंगाने 6 जानेवारी 2022 रोजी संगमनेरात आलेल्या जिल्हाधिकारी राजेंद्र भासेले यांची भेट घेवून त्यांना याबाबत कारवाईसाठी निवेदनही देण्यात आले होते. तेव्हापासून सुरु झालेला हा विषय गेल्या शुक्रवारी (ता.16) मध्यरात्री दाखल झालेल्या गुन्हापर्यंत पोहोचले.

हा प्रकार चव्हाट्यावर आणणार्या भाजयुमो व भाजप या संघटनांनी या प्रकरणात पाच राजकीय व्यक्तिंसह तिघा अधिकार्यांचा समावेश असल्याचे आधीपासून सांगितलेले असतांना प्रत्यक्षात गुन्हा दाखल होतांना तो केवळ पालिकेच्या बांधकाम विभागाचे प्रमुख, नगर अभियंता राजेंद्र सुतावणे व कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी या दोघांवरच झाल्याने या दोन संघटनांमध्येच अंतर्गत धुसफूस सुरु झाली. त्याचा राजकीय लाभ उठविण्याच्या हेतूने शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी या सर्व घडामोडीत नारात झालेले भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपेश ताटकर यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधीत भाजपमधील अंतर्गत धुसफूस आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याच्या प्रयत्न केला व त्याच आधारावर भाजपाच्या शहराध्यक्षांनी फिर्यादीतून मोठी नावे वगळण्यासाठी 30 लाखांची रक्कम घेतल्याचा घणाघाती आरोपही केला.

मुळी शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी हा आरोप करताना जो पुरावा वापरला तो कायद्याच्या दृष्टीने सबळ नव्हता असे जाणकार सांगतात. त्यामुळे हा आरोप करुन ते आपल्याच अडचणी वाढवणार असल्याचा पूर्वअंदाजही त्यांच्याकडून वर्तवला गेला होता. मात्र त्यापासून परावृत्त होण्याऐवजी कतारी यांनी गेल्या सोमवारी (ता.19) पत्रकार परिषद घेवून पूर्वी (ता.4) सोशल माध्यमातून वेळोवेळी केलेले आरोप पत्रकारांसमोर पुन्हा मांडून भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपेश ताटकर यांच्याशी झालेल्या संभाषणाची ऑडियो क्लिपही त्यांनी उपस्थित पत्रकारांना ऐकवली. त्यामुळे कतारी करीत असलेल्या आरोपांच्या माहितीचा एकमेव स्रोत ताटकर असल्याचे स्पष्ट झाले. त्यातून तोपर्यंत गोपनीय असलेले त्याचे नावही उघड झाल्याने माध्यमात त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.

त्याचा परिणाम बुधवारी (ता.21) भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपेश ताटकर यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करुन या प्रकरणात त्यांच्या नावाचा वापर करुन शिवसेनेच्या शहरप्रमुखांकडून होत असलेल्या आरोपांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपाचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले म्हणजे बोले तैसा चाले याप्रमाणे कृती करणारे आहेत. त्यांनी जे सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. अज्ञानातून काही गोष्टींबाबत आपल्या मनात गैरसमज झाले होते, मात्र त्याचा अर्थ या प्रकरणात पैशांची देवाणघेवाण झाली असा काढणे गैर असल्याचे सांगत त्यांनी भाजपकडून सुरु असलेल्या पाठपुराव्यावर पूर्ण विश्वास व्यक्त करीत अमर कतारींनी आपल्या नावाचा गैरवापर केल्याचा थेट आरोप केल्याने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकानेच कतारींची डोकेदुखी वाढली होती.

आता ताटकर यांच्या खुलाशानंतर शहर भाजपाने कतारींनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांना गांभीर्याने घेत त्यांच्यावर सोशल माध्यमांचा वापर करुन जाहीर बदनामी केल्याप्रकरणी खटला दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी अमर कतारी यांनी यापूर्वी काही सोशल समूहात केलेल्या पोस्ट, पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांचे व्हिडिओ चित्रीकरण, वृत्तपत्रांमधून आलेल्या बातम्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून पुरावे आणि कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर भजपकडून त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला जाणार असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे फौजदारी कारवाई करता येईल किंवा कसे याचेही मंथन सुरु असल्याचे खात्रीशीर वृत्त दैनिक नायकच्या हाती लागले आहे. त्यामुळे येणार्या काळात संगमनेरात राजकीय कलगीतुरा पाहण्यास मिळेल हे नक्की.

