हिवरगाव टोलनाक्यावरील रास्तारोको भोवला; साडेतीन हजारांवर गुन्हा! जयश्री थोरात, अजय फटांगरे, किशोर टोकसे यांचा समावेश; माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव वगळले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रस्तावित पुणे-नाशिक व्हाया संगमनेर रेल्वेमार्ग रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रविवारी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर करण्यात आलेले रास्तारोको आंदोलन आता पोलिसी कारवाईच्या भोवर्यात सापडले आहे. आंदोलनामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाल्याचा ठपका ठेवत संगमनेर तालुका पोलिसांनी 11 ज्ञात आंदोलकांसह तब्बल तीन ते साडेतीन हजार अज्ञात आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे आधीच राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या प्रश्नाला आता आंदोलेक विरुद्ध कायदा-सुव्यवस्था असे नवे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनाचे नेतृत्व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असतानाही दाखल गुन्ह्यात त्यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.9) संगमनेर रेल्वे मागणी कृती समितीच्या वतीने हिवरगाव पावसा येथे रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यात दंडाधिकार्यांचा जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, परवानगी नसतानाही कृती समितीच्या पदाधिकार्यांसह मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनस्थळी जमले आणि रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

या आंदोलनामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास खोळंबल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात, शरद नाना थोरात, नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सभापती किशोर टोकसे, अमोल शेलकर, विजय रहाणे, नामदेव गुंजाळ, भाऊसाहेब रहाणे, सागर पावसे, नगरसेवक डॉ.दानिश खान आणि नूरमोहंमद शेख या 11 ज्ञात व्यक्तींसह सुमारे तीन ते साडेतीन हजार अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 126 (2) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37 (1) (3) अन्वये कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हिवरगाव टोलनाक्यावरील आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्याचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट झाले असतानाही पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांचे नाव नसणे हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.

रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर रविवारी जिल्ह्यात एकाचवेळी आंदोलनाची तीव्रता दिसून आली. सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला होता. त्या प्रकरणी वावी पोलिसांनी तांबे यांच्यासह सुमारे 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता. आता त्याच रेल्वे प्रश्नावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव टोलनाक्यावरील आंदोलनाविरोधातही मोठ्या संख्येने आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याने पुणे-नाशिक व्हाया संगमनेर रेल्वेचा मुद्दा केवळ विकासाचा प्रश्न न राहता कायदा-सुव्यवस्था आणि राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी येताना दिसत आहे.

पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा मूळ प्रस्तावित मार्ग बदलण्याच्या निर्णयामुळे संगमनेर, सिन्नर, अकोले तसेच पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, नारायणगाव, मंचर, चाकण या भागात नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयाविरोधात विविध ठिकाणी आंदोलने, बैठका आणि जनआंदोलनाची भूमिका घेतली जात आहे. रेल्वेमार्ग व्हाया संगमनेर’च असावा, या मागणीसाठी स्थानिक पातळीवर राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना आणि रेल्वे मागणी कृती समित्या आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नावर आगामी काळात आणखी आंदोलने होण्याची शक्यता आहे.

