आठवडाभरातच संगमनेरच्या रस्त्यावरचा बाजार उठणार! चार ठिकाणच्या जागांचा लिलाव; अकोले बायपाससह मालदाडरोडचा समावेश..


श्याम तिवारी, संगमनेर
‘कोविड’च्या आडून गर्दीच्या रस्त्यांवर निर्माण झालेल्या भाजीबाजारांनी संगमनेरच्या गचाळपणात मोठी वाढ केली असून वारंवारच्या वाहतूक कोंडीमुळे सामान्य संगमनेरकर अक्षरशः त्रासला आहे. त्यातून उपाय काढण्याचे आश्‍वासन देत पालिकेच्या सत्तास्थानी आलेल्या सेवा सोसायटीने त्या दृष्टीने पहिले दमदार पाऊल टाकले असून शहरासह उपनगरातील प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर भरणारा बाजार उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईतून विस्थापित होणार्‍या फळे व भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून पुढील आठवड्यात पालिकेने नव्याने उभारलेल्या भाजीबाजारातील जागांचा लिलाव होणार आहे. या दोन्ही ठिकाणी प्रशस्त जागेसह, विक्रेत्यांसाठी पत्र्याच्या शेड्स, लाईटची व्यवस्था, स्वच्छता व सुरक्षा या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. या लिलावानंतर वर्दळीच्या या दोन्ही रस्त्यांवर कोणत्याही स्वरुपात पुन्हा भाजीविक्रेता बसणार नाही याबाबतही पालिकेच्या सत्ताधार्‍यांनी कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे शहरातून स्वागत होत असून सर्वच भागात अशाप्रकारची कारवाई व्हावी अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.


संगमनेर शहराला अतिक्रमणांची मोठी कीड लागली असून त्यातून शहरातील गचाळपणात प्रचंड वाढ झाली आहे. अलिकडच्या काळात तर कोणीही उठावं आणि पोटा-पाण्याचा विषय सांगत थेट रस्त्यावरच पथारी टाकून अथवा हातगाडी घेवून बसावं अशी प्रत्येक वर्दळीच्या रस्त्यावरील स्थिती आहे. त्यातून पुणे-नाशिक आणि कोल्हार-घोटी हे दोन्ही राज्यमार्ग वारंवार कोंडीत सापडत असल्याने सामान्य संगमनेरकर रोजच्या या त्रासाला अक्षरशः वैतागला आहे. त्यातच कोविड संक्रमणाच्या कालावधीत लागू असलेल्या निर्बंधांना अनुसरुन प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या भागांसाठी तात्पूरती व्यवस्था म्हणून रहदारीचे रस्ते, चौक अशा ठिकाणी काही भाजी व फळं विक्रेत्यांना बसण्याची परवानगी दिली होती.


कोविडनंतर प्रशासनाने अशा अस्थायी बाजारांना हटवण्याचा प्रयत्न केला असता संख्या वाढून संघटीत झालेल्या भाजीविक्रेत्यांनी पोटाचा प्रश्‍न समोर करुन तत्कालीन लोकप्रतिनिधींसमोर प्रपंचाचे गार्‍हाणे मांडले. त्यातून त्यांना त्यांच्याच विनंतीनुसार त्यावेळच्या दिवाळीपर्यंत मुदतवाढ दिली गेली. मात्र त्या निर्णयाने अकोले बायपास रस्त्यावरील बी.एड्.कॉलेज सर्कलचा परिसर, ईदगाह शेजारील रस्ता आणि मालदाडरोडवर भाजी व फळं विक्रेत्यांचे अधिराज्य निर्माण झाले. दरम्यानच्या काळात राज्यातील सत्तास्थानी उलथापालथ, पालिकेवर प्रशासकांचे राज्य, लांबलेल्या निवडणूका अशा वेगवेगळ्या कारणांनी कोविडच्या आडून फूलण्याची संधी मिळालेल्या अतिक्रमणांनी शहराच्या अंतर्गत असलेले सर्वच रस्ते व्यापले आणि शहराला बकाल आणि बेशिस्तीच्या ढिगार्‍यावर नेवून बसवले.


या स्थितीचा फायदा घेत एकाच कुटुंबातील चार-चारजणांनी एकाच रस्त्यावरील मोक्याच्या जागा हेरुन त्यावर आपल्या नावाचे गाठोडे ठेवण्यास सुरुवात केल्याने शहरातील गचाळपणात भर पडू लागल्याने नागरीकांमधून अतिक्रमण हटवण्याबाबत दबाव निर्माण होत होता. त्यानुसार अधुनमधून तुरळक कारवाई करीत पालिकेकडून मलमपट्टी होत असली तरी महिन्या-पंधरवड्यात पुन्हा स्थिती पूर्ववत होत असल्याने शहरातील भाजी व फळ विक्रेत्यांसह खाद्यपदार्थ व अन्य वस्तूंच्या हातगाड्यांनी शहरातील प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही बस्तान बसवल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले. त्यात अनधिकृत रिक्षाथांबे आणि बेशिस्त वाहनधारकांची भर पडून शहराच्या अंतर्गत व्यवस्थेचा बट्ट्याबोळ रोजच उघड्या डोळ्यांना बघावा लागतो.


आठ महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीतही शहरातील अतिक्रमणांचे निर्मूलन हा विषय प्रचाराच्या केंद्रस्थानी होता. यावेळी सत्ताधारीगटाने ‘संगमनेर 2.0’ अंतर्गत शहराच्या विकासाचा रुटमॅप समोर ठेवून लोकांना त्याकडे आकर्षित केले. शहरातील सर्वरस्ते अतिक्रमणमुक्त, फेरीवाले, भाजी व फळवाले, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र झोन निर्माण करण्याचे आश्‍वासनही दिले गेले. त्याची सुरुवात बी.एड्.कॉलेज सर्कल व ईदगाह रस्त्यापासून करताना पालिकेने तेथील विक्रेत्यांसाठी मेडिकव्हर रुग्णालयासमोर पर्यायी व्यवस्था करुन त्यांना तेथे स्थलांतरीत केले. मात्र महिन्याभरातच तक्रारींचा पाढा वाचत त्यांनी पुन्हा रस्ते व्यापायला सुरुवात केल्याने या रस्त्यांचा वाहतुकीसाठी वापर करणार्‍यांमध्ये संताप निर्माण झाला.


पालिकेनेही आता कठोर भूमिका घेत स्थलांतरीत भाजीविक्रेत्यांनी केलेल्या तक्रारींचे निरसन करुन तेथील जागेवरही हक्क सांगत शेडमध्ये मांडून ठेवलेले सगळे गाठोडे हटवले असून आत्तापर्यंत केवळ पावतीच्या आधारे दिली गेलेली तेथील भाजीबाजाराची जागा (ओटे) लिलावाद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात त्याबाबतची प्रक्रिया सुरु होवून लवकरच बी.एड्.कॉलेज सर्कल व ईदगाह रस्त्यावर पुन्हा परतलेल्या भाजीविक्रेत्यांना लिलावातून जागा घेण्याचा पर्याय दिला जाणार असून त्याशिवाय राहणार्‍या इतर विक्रेत्यांना मात्र पुन्हा रस्त्यावर बसता येणार नाही. अकोले बायपास रस्त्यावरील या धोरणात्मक निर्णयासोबतच पालिकेने वीज कंपनीच्या सबस्टेशनची जागा तात्पूरत्या वापरासाठी घेतली असून त्या ठिकाणीही प्रशस्त शेड्ससह अन्य सुविधा देत नव्याने भाजीबाजार उभारण्यात आला आहे.


या ठिकाणी मालदाड रोडवर रस्त्यातच ठाण मांडून बसणार्‍या मात्र पालिकेकडे नोंद असलेल्या सर्व फेरीविक्रेत्यांचे स्थलांतर केले जाणार आहे. एकदा का या रस्त्यावरुन स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणालाही पुन्हा रस्त्यावर बसू दिले जाणार नाही. शिवाय सत्ताधारीगटाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांनुसार शहरातील तीन ठिकाणी फूडकोर्ट (खाऊगल्ली) निश्‍चित केले असून सह्याद्री महाविद्यालय, इंदिरा गांधी उद्यान (नवघरगल्ली) व नेहरु उद्यान (क्रीडा संकुल) या ठिकाणच्या जागांचे लिलावही लवकरच होणार आहेत. या लिलावात पालिकेकडे यापूर्वीच नोंद असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाच सहभागी होता येईल. एकंदरीत आश्‍वासनांच्या दिशेने पालिकेतील सत्ताधारी गटाने टाकलेले हे पहिले दमदार पाऊल मानले तरी त्यातील सातत्यावर त्याचा परिणाम अवलंबून असणार आहे. मात्र पालिकेच्या या निर्णयाने शहरातून समाधान व्यक्त होत आहे हे निश्‍चित.


आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या पालिका निवडणुकीत त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांवर भरवसा ठेवून शहरी नागरीकांनी भरभरुन मतदान केले. त्यामुळे या आश्‍वासनांची पूर्तता करण्याचे दिव्य त्यांना पुढील पाच वर्षात ओलांडावे लागणार आहे. त्या आश्‍वासनांमध्ये शहरातील अतिक्रमणांबाबतचा मुद्दाही मोठा गाजला होता. त्यावर काम करताना पालिकेच्या सत्ताधार्‍यांनी आता ‘आधी पुनर्वसन, नंतर अतिक्रमण निर्मूलन’ या धोरणानुसार काम करताना अकोले बायपास व मालदाड रोडवरील अस्थायी भाजीबाजारांसाठी पर्यायी व्यवस्था करुन अतिशय वर्दळीचे हे दोन्ही रस्ते मोकळे करण्याच्या दृष्टीने दमदार पाऊल टाकले आहे. शिवाय शहरातील अन्यभागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे अतिक्रमण कमी करण्यासाठी शहरातील तीन वेगवेगळ्या भागात ‘फूडकोर्ट’साठी (खाऊगल्ली) जागा निश्‍चित करण्यात आल्या असून महिन्याभरातच त्याचेही लिलाव होणार आहेत. त्यानंतर शहरातील कोणत्याही भागात फेरीवाल्या खाद्यपदार्थ विक्रेत्याला रस्त्यावर पथारी मांडता येणार नाही.

Visits: 156 Today: 3 Total: 2165914

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *