पुणे-नाशिक महामार्गावर पाच ठिकाणी साचतेय पाणी! वाहनचालकांना होतोय त्रास; पावसाने महामार्गाची दयनीय अवस्था

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत असून सलग दोन-तीन दिवस तुफान पावसाने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस चौकीपासून काही अंतरावर, डोळासणे उड्डाणपूल, घारगाव येथील मुळा नदी पुलावर आणि हॉटेल प्राईड या पाच ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचते. यंदा तर रेकॉर्डब्रेक पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरुन साचलेल्या पाण्यातून आपली वाहने चालवावी लागली. तसेच जास्त पाण्यामुळे जुन्या चंदनापुरी घाटातूनही काही तास वाहतूक वळवावी लागली. पोलीस चौकीपासून काही अंतरावर महामार्गावर खोलगट भाग असून अशीच परिस्थिती डोळासणे उड्डाणपूल, घारगाव येथेही आहे.

पुणे व नाशिक या दोन महानगरांना हा महामार्ग जोडलेला असल्याने येथून अत्यंत वर्दळ असते. त्यामुळे भरधाव वेगात असलेली छोटी-मोठी वाहने जात असताना दुचाकीस्वारांच्या अंगावर पाणी उडून भांडणेही होत आहे. मात्र तरीही संबंधित विभाग याकडे का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न पडला आहे. महामार्गालगतच्या गटारीही तुंबल्याने पावसाचे पाणी थेट महामार्गावरून वाहत असते. त्यातच जागोजागी मोठमोठे खड्डेही पडलेले आहे. वारंवार या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होऊन अनेक जखमीही झाले आहे. यावरुन पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेला नेमकी कोण जबाबदार आहे असा सवाल संतप्त वाहनचालक विचारत आहे.


महामार्गाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेला नेमकी कोण जबाबदार आहे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण दररोज लाखो रुपयांचा टोल भरुनही महामार्गाची दयनीय अवस्था आहे. कधी चंदनापुरी घाटात दरड कोसळणे, पाणी साचणे, खड्ड्यांचे साम्राज्य असे चित्र पाहायला मिळते. परंतु, याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येते. त्यामुळे महामार्गाच्या दुरावस्थेला नेमके जबाबदार कोण आहे असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

Visits: 207 Today: 1 Total: 2055652

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *