घारगावातील एटीएम फोडून चोरट्यांनी लांबविले एकोणावीस लाख! अवघ्या दोन महिन्यात तिसरी घटना; एटीएमची सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर

नायक वृत्तसेवा, घारगाव
तालुक्याच्या पठारभागात चोर्या, घरफोड्या आणि दरोड्यांची श्रृंखला सुरु असतांनाच आता त्यात एटीएम फोडीचीही भर पडली आहे. आज पहाटे पठारावरील घारगावात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल 19 लाख 17 हजार पाचशे रुपयांची रोकड लांबविली. या घटनेत एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅसकटरचा वापर करीत सीसीटीव्ही कॅमेर्यावर काळ्या रंगाचा फवारा मारीत डिव्हीआरही लंपास केल्याने चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान घारगाव पोलिसांसमोर आहे. गेल्या तीन महिन्यात तालुक्यात घडलेली एटीएम फोडीची ही तिसरी घटना असून एटीएमची सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (ता.4) पहाटेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील घारगावात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन चोरट्यांनी लक्ष्य केले. सदर मशिन फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला व एटीएमचा दरवाजा तोडून त्यातील 19 लाख 17 हजार 500 रुपयांची रोकड लांबविली. तत्पूर्वी एटीएममध्ये प्रवेश करतांना चोरट्यांनी सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यावर काळ्या रंगाचा फवारा मारला व त्याची वायर तोडून चक्क डिव्हीआरही लंपास केला. त्यामुळे सीसीटीव्ही असूनही त्यातून पोलिसांना कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नाही. सदरचे एटीएम महामार्गाच्या कडेलाच असून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला.

चार वर्षांपूर्वी संगमनेरात एटीएम फोडीचे लोण आले होते. त्यावेळी नाशिक रस्त्यावरील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल 59 लाखांची रोकड लांबविली होती. त्यानंतर मालदाड रोड व बी.एड.कॉलेजच्या समोरील बाजूस असलेल्या एटीएम मशिनवरही हल्ला करीत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात रोकड लांबविण्याच्या घटना घडल्या होत्या. यासर्व घटनांमध्ये चोरट्यांनी एटीएम मशिन फोडण्यासाठी पहिल्यांदाच गॅसकटरचा वापर करण्यासह सीसीटीव्हीच्या वायर तोडणे अथवा त्यावर कपडा टाकण्याचाही प्रकार समोर आला होता. त्यानंतर गेल्या चार वर्षात तालुक्यातील अशा घटना थांबलेल्या असतांनाही पोलिसांना पूर्वी घडलेल्या एटीएम फोडीच्या घटनांचा तपास लावता आलेला नाही.

त्यातच गेल्या दोन महिन्यात एटीएम फोडीचे लोण पुन्हा एकदा तालुक्यात पसरु लागले असून तळेगाव येथील इंडियन ओव्हरसीस बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून त्यातील 17 लाखांची रोकड लांबविल्यानंतर काही दिवसांतच समनापूर शिवारातील इंडिया वन कंपनीचे एटीएम तर चोरट्यांनी चक्क डिटोनेटरचा वापर करुन फोडले होते. त्यातीलही जवळपास 3 लाखांची रक्कम लांबविण्यात आली होती. या चोरीच्या घटनाही केवळ दाखल झालेल्या असतांना आता त्यात घारगावमधील स्टेट बँकेच्या एटीएमचाही समावेश झाला असून मागील अवध्या दोनच महिन्यातील या तीन घटनांमधून तब्बल 40 लाखांची रक्कम लांबविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तीनही ठिकाणांहून पोलिसांना फारसे पुरावे मिळालेले नसल्याने चार वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांप्रमाणेच या घटनेचा तपासही लागण्याची शक्यता दुर्मिळ आहे.

आज सकाळी घारगावमधील स्टेट बँकेचे एटीएम फोडल्याची घटना समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे व संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेर्यावर काळा रंग मारल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्हीमधून काही हाती लागते का याची पडताळणी सुरु केली आहे. घारगाव पोलिसांनी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले असून दोन्ही पथके दुपारपर्यंत घारगावमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या दोनच महिन्यांत तालुक्यात एकामागून एक घडलेल्या या घटनांनी एटीएमची सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. या घटनेने तालुक्यातील बँकींग विश्वात खळबळ उडाली आहे.

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत संगमनेर तालुक्याच्या हद्दीत एटीएम मशिन फोडून त्यातील रकमा लांबविण्याच्या एक-दोन नव्हेतर तब्बल अर्धा डझनहून अधिक घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमधून आत्तापर्यंत जवळपास दिड कोटी रुपयांहून अधिक रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. मात्र यातील एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले आहे. आता या श्रृंखलेत तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याचाही समावेश झाला असून चोरट्यांनी कोणताही पुरावा राहणार नाही याची दक्षता घेतल्याने या घटनेचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
