अठरा तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीला कार्यकर्त्यांच्या नाराजीची किनार! निम्म्याहून अधिक गणेश मंडळांच्या गणेशाचे मूक विसर्जन; प्रशासनाचा सत्कारही नाकारला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांच्या कोविड खंडानंतर साजर्या झालेल्या गणेशोत्सवाचा समारोप कार्यकर्त्यांच्या नाराजीने झाला. यंदाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या एकोणावीस गणेश मंडळांपैकी केवळ मानाच्या आठ गणपतींची मिरवणूक वाजत-गाजत पूर्ण झाली. मध्यरात्री बारा वाजता पोलिसांनी स्पिकरसह पारंपरिक वाद्येही बंद करण्यास भाग पाडल्याने निम्म्याहून अधिक मंडळे मिरवणूक मार्गावरच खोळंबली होती. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या नाराजीत झाला आणि राहिलेल्या बहुतेक मंडळांनी प्रशासनाकडून पालिकेच्या प्रवेशद्वारा जवळील सत्कारही नाकारला. त्यामुळे दहा दिवस प्रचंड जल्लोशात साजर्या झालेल्या उत्सवाच्या समारोपाला मात्र कार्यकर्त्यांच्या नाराजीची किनार लागली. पहाटे पावणे तीन वाजता भारतचौक मंडळाच्या श्रींचे पूजन होवून त्याचे विसर्जन झाल्यानंतर तब्बल अठरा तास चाललेली संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. या संपूर्ण कालावधीत कोणतीही अनुचित घटना समोर आली नाही.

127 वर्षांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या सोमेश्वर रंगारगल्ली तरुण मंडळाच्या मानाच्या पहिल्या गणपतीचे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी पूजन झाल्यानंतर संगमनेरच्या मुख्य मिरवणुकीला सकाळी नऊच्या सुमारास सुरुवात झाली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, एकविरा फाऊंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय फटांगरे यांच्यासह शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान झालेल्या मानाच्या गणरायासमोर यावेळी विविध पारंपरिक साहसी खेळांचे प्रदर्शन करण्यात आली. सई-चौघड्याचा सुमधूर स्वर त्यामागे ढेाल-ताशांचा गजर करीत निघालेली मानाच्या गणरायाची मिरवूक रात्री साडेआठच्या सुमारास संपली.

सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाच्या मागोमाग मानाच्या चौंडेश्वरी मंडळ, साळीवाडा मंडळ, राजस्थान मंडळ, चंद्रशेखर चौक मंडळ, नेहरु चौक मंडळ, माळीवाडा मंडळ व स्वामी विवेकानंद मंडळ या मानाच्या सात मंडळांसह बाजारपेठ व्यापारी मित्रमंडळ, भारत चौक मंडळ, वाल्मिक मित्रमंडळ, मालदाड रोड मित्रमंडळ, महाराणा प्रताप मंडळ-आनंदनगर, जनता नगर, पावबाकी व अखेरीस उपासनी गल्लीतील तानाजी मित्रमंडळाच्या गणरायांची विसर्जन मिरवणुकही मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने निघाली. तेलीखुंटावरील मित्रप्रेम तरुण मंडळ, गवंडीपुरा मशिदीजवळ श्री सत्कार समिती, मेनरोडवर शिवसेना शाखा क्रमांक 11, ओंकार ग्रुप, साईनाथ युवक मंडळ, फे्रंडस् सर्कल मंडळ, माळीवाडा व संगमनेर नगर परिषद येथे मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व गणेश मंडळांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे यंदा विसर्जनासाठी नदीपात्रात मुबलक पाणी असताना भंडारदरा व निळवंडे या दोन्ही धरणांच्या पाणलोटासह भोजापूर व आढळला जलाशयांच्या पाणलोटातही गुरुवारी तुफान पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदीपात्रातून साडेतीन हजार तर प्रवरानदी पात्रात 4 हजार 385 क्यूसेक असा एकूण साडेसात हजारांहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे प्रशासनाची काळजीही वाढली होती. मात्र गेल्या चार वर्षांपूर्वी विसर्जनाचा संगमनेर पॅटर्न विकसित झाल्याने पूर्वी दरवर्षीच्या विसर्जनादरम्यान घडणार्या बुडीताचा घटनांना पूर्णतः आळा बसला, त्यामुळे प्रशासनाने यंदाही बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि एकविरा फाऊंडेशनच्या मदतीने सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले. कोणालाही नदीपात्राकडे जाण्यास मनाई केल्याने यावर्षीही दहा दिवसांच्या या उत्सवाला दुःखाची किनार लागली नाही.

याशिवाय संगमनेर नगरपरिषदेने एकूण दहा ठिकाणी कृत्रिम तलाव व मूर्ती संकलन केंद्र सुरु केले होते. त्यात पोफळे मळा येथील केंद्रावर तीनशे, जाणता राजा मैदान येथे 250, चंद्रशेखर चौक येथे दिडशे, शिवाजीनगर येथे शंभर, इंदिरानगर येथे 50, रणजीत स्पोर्टस क्लबच्या मैदानावर 35, गणेशनगर येथे 27, अध्यापक विद्यालयाजवळ 12, भूमि अभिलेख कार्यालयाजवळ 11व अकोले रोड येथे सात अशा एकूण 942 गणेशमूर्तीचे संकलन झाले. या सर्व मूर्ती सायंकाळी प्रवरानदीपात्रात सन्मानपूर्वक विसर्जित करण्यात आल्या. लायन्स क्लब, लायन्स क्लब संगमनेर सफायर, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब या संस्थांनीही मूर्ती व निर्माल्या संकलन करण्याची केंद्र सुरु केली होती. तेथेही मोठ्या प्रमाणात मूर्तींचे संकलन झाले.

मध्यरात्री बाराच्या सुमारास महात्मा फुले तरुण मंडळाचा गणपती माळीवाड्यात आल्यानंतर पोलिसांनी वेळ संपल्याचे सांगत मिरवणुकीतील सर्वप्रकारची वाद्ये बंद करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शांतता समितीच्या बैठकांमध्ये पारंपरिक वाद्ये वाजवू देण्यासंदर्भात झालेली चर्चा उपस्थित करीत मंडळांनी ती वाजवू देण्याचा हट्ट सुरु केल्याने प्रशासनाविरोधात काहीसा संघर्ष उभा राहु लागला, मात्र प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने हिरमोड झालेल्या मिरवणुकीतील निम्म्याहून अधिक गणेश मंडळांनी नगरपरिषदेचा सत्कार न घेताच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निर्बंधमुक्त गेली दहा दिवस साजर्या झालेल्या या उत्सवाच्या समारोपाच्या शेवटच्या क्षणी त्याला कार्यकर्त्यांच्या नाराजीची किनार लाभली.

दरवर्षीच्या विसर्जनादरम्यान संगमनेरात बुडीताच्या घटना घडून गणेशोत्सवाला दुःखाची किनार लागत असे. मात्र चार वर्षांपूर्वी तहसीलदार अमोल निकम यांनी सार्वजनिक अथवा घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेची मदत घेत त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला. सुरुवातीला त्याला काहीसा विरोधही झाला, मात्र या प्रयोगातून संगमनेरात दरवर्षी विसर्जनात घडणार्या दुःखद घटना मात्र पूर्णतः थांबल्याने नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तहसीलदार निकम यांचा हा प्रयोग विसर्जनाचा ‘संगमनेर पॅटर्न’ म्हणून ओळखला जावू लागला.

