एकविरा फाऊंडेशनचे गणपती विसर्जनात सामाजिक काम प्रवरा नदीकाठी निर्माल्य गोळा करुन केली साफसफाई
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 300 युवक – युवतींनीफाउंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवरा नदीकाठी निर्माल्य गोळा करुन साफसफाई व गणेश विसर्जनात काम केले.
गणेश उत्सवानिमित्त संगमनेर शहरातील अनेक मानाचे व इतर गणपती, घरगुती गणपती प्रवरा नदीकाठी विसर्जित करण्यासाठी येतात. काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा युवक – युवती फाउंडेशनच्यावतीने नदीकाठी साफसफाई अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत प्रवरा नदीकाठी असलेल्या गंगामाई घाटाच्या ठिकाणी, म्हाळुंगी नदीच्या काठी गणेश विसर्जन करण्यात येणार्या विविध ठिकाणी या युवक – युवतींनी निर्माल्य गोळा केले. यामध्ये 300 युवक – युवतींनी सहभाग घेतला. 50 – 50 च्या गटाच्या युवतींनी वेगळ्या ठिकाणी उभे राहून हे निर्माल्य गोळा केले. येणार्या भाविकांना प्रवरेच्या पुराची माहिती सांगून आपण सर्व निर्माल्य एका ठिकाणी गोळा करावे. तसेच गणेश विसर्जन सुद्धा नगरपरिषदेने केलेल्या तळ्यामध्ये करावे यासाठीही विनंती केली. यामुळे अनेक शहरातील नागरिकांची सोय झाली.
याबाबत डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, कोरोनाच्या दोन वर्ष संकटानंतर यावर्षी सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला. गेली दहा दिवस गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. आज गणपती बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाला दुःख होत आहे. परंतु ही परंपरा आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन आपण करत असतो. त्यानुसार प्रवराकाठी असलेल्या तळ्यांमध्ये अनेकांनी गणेश विसर्जन केले. शहरातील विविध नागरिकांनी आलेल्या गणेशाच्या निर्माल्याचे आम्ही कोरडे निर्माल्य व ओले निर्माल्य असे वेगळे करून एकत्रित केले व त्याची विल्हेवाट लावली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी युवतींनी पुढाकार घेत निर्मले गोळा केल्याने मलाही खूप आनंद झाला. समाजामध्ये अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा फैलाव होत असून स्वच्छता हाच चांगल्या आरोग्यासाठी मोठा मूलमंत्र असल्याचेही डॉ. थोरात यांनी सांगितले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.