भविष्य घडवणारा माणूस!
श्याम तिवारी, संगमनेर
जगाच्या इतिहासात काही तारखा अशा असतात, ज्या केवळ कालगणनेतील नोंदी राहत नाहीत; त्या मानवाच्या प्रगतीचे मैलाचे दगड बनतात. 20 जुलै 1969 हा त्यापैकीच एक दिवस. अमेरिकेच्या ‘अपोलो-11’ या मोहिमेचे चंद्रावर यशस्वी अवतरण झाले आणि नील आर्मस्ट्राँग यांनी मानवजातीच्या इतिहासातील पहिले पाऊल चंद्रभूमीवर उमटवले. एका माणसासाठी हे छोटे पाऊल असले, तरी मानवजातीसाठी ही महान झेप आहे, असे त्यांनी उच्चारलेले शब्द आजही विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहेत. नियतीचा विलक्षण योग असा, की याच ऐतिहासिक दिवसाशी डॉ.संजय मालपाणी यांच्या जन्मदिनाचेही नाते जोडले गेले. विज्ञानाने त्या दिवशी चंद्र जिंकला, तर पुढील काळात डॉ.मालपाणी यांनी ज्ञान, संस्कार, अध्यात्म, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांची मने जिंकली. एका अंतराळवीराने मानवाला विश्वाच्या नव्या क्षितिजांची ओळख करुन दिली, तर एका शिक्षणतज्ज्ञाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक क्षितिजावर झेप घेण्याची प्रेरणा दिली.
हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचा सखोल अभ्यास करुन, त्यातील आधुनिकता आणि भारतीय संस्कारांची मूल्यव्यवस्था यांचा अनोखा संगम घडविण्याचे धाडस डॉ.संजय मालपाणी यांनी दोन दशकांपूर्वी केले. त्यातून संगमनेरच्या मातीत ‘ध्रुव ग्लोबल स्कूल’चा जन्म झाला. ही संस्था केवळ शाळा उभी करण्याचा प्रयत्न नव्हता, तर शिक्षणाची नवी व्याख्या घडविण्याचा संकल्प होता. पुस्तकापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, सर्जनशीलता, नेतृत्वगुण, क्रीडानैपुण्य, कलात्मकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चारित्र्यनिर्मिती यांचा समतोल विकास ध्रुव ग्लोबलचा पाया ठरला.
आज दोन दशकांनंतर या विचाराचे विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळविणारे शेकडो विद्यार्थी ही त्या प्रयोगाची साक्ष आहेत. पुण्यातील उंद्री आणि सूस येथील शाखांपासून ते दुबईपर्यंत पोहोचलेला ध्रुव ग्लोबलचा प्रवास केवळ संस्थेचा विस्तार नाही, तर भारतीय मूल्याधिष्ठित शिक्षणाचा जागतिक स्वीकार आहे. शिक्षणव्यवस्थेचा सूक्ष्म अभ्यास, कायद्यावरील प्रभुत्व आणि दूरदृष्टी यामुळे महाराष्ट्र विधानसभेतील सर्व लोकनियुक्त आमदार आणि वरिष्ठ सनदी अधिकार्यांना राज्याच्या शिक्षण कायद्याचे मार्गदर्शन करण्याचा दुर्मीळ सन्मान डॉ.मालपाणी यांना लाभला. हा बहुमान त्यांच्या विद्वत्तेचा आणि शिक्षणक्षेत्रातील विश्वासार्हतेचाच पुरावा मानावा लागेल.
बालमानसशास्त्राचा गाढा अभ्यास करुन डॉक्टरेट मिळविणार्या डॉ.मालपाणी यांच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्याची क्षमता गुणपत्रिकेतील आकड्यांनी मोजता येत नाही, तर त्याच्या विचारशक्ती, संवेदनशीलता आणि स्वप्नांनी मोजली जाते, हा त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमामागे केवळ गुणवंत विद्यार्थी नव्हे, तर सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडविण्याची तळमळ दिसून येते.
शिक्षणाइतकाच अध्यात्म हा त्यांच्या जीवनाचा श्वास आहे. स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी स्थापन केलेल्या गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रचार-प्रसारासाठी अविरत कार्य केले. गीतेचे अठरा अध्याय, सातशे श्लोक आणि वीस हजारांहून अधिक शब्द मुखोद्गत करून त्यांनी ‘गीता विशारद’ हा बहुमान प्राप्त केला. परंतु हा सन्मान वैयक्तिक अभिमानापुरता मर्यादित राहिला नाही, तर समाजापर्यंत गीतेचा जीवनदृष्टिकोन पोहोचविण्याचे माध्यम बनला.
कोविडच्या अभूतपूर्व संकटात संपूर्ण जग घरात बंदिस्त झाले असताना, अनेकजण निराशेच्या गर्तेत सापडले होते. अशा काळात डॉ.मालपाणी यांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करुन तब्बल 182 देशांतील सुमारे 17 लाखांहून अधिक नागरिकांना ‘ऑनलाइन’ माध्यमातून गीतेचे पठण शिकवले. ही केवळ धार्मिक चळवळ नव्हती; तर संकटाच्या काळात मानसिक स्थैर्य, सकारात्मकता आणि आत्मविश्वास जागविण्याचा वैश्विक उपक्रम होता.
डॉ. मालपाणी यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक तेजस्वी पैलू म्हणजे योगक्षेत्रातील त्यांचे ऐतिहासिक योगदान. योगासनांना खेळाचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी योगमहर्षी बाबा रामदेव यांच्यासह सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यातून योगासनांचा ‘खेलो इंडिया’ स्पर्धांमध्ये आणि पुढे एशियन गेम्समध्ये समावेश झाला. भविष्यात ऑलिम्पिकमध्येही या खेळाचा समावेश होण्याची आशा बळकट झाली आहे. योगासनांचा स्पर्धात्मक आराखडा तयार करण्यापासून ते गुणांकनाचे निकष निश्चित करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे सुमारे अडीचशे योगासन प्रकारांना त्यांनी संस्कृत साहित्यातील आशयपूर्ण संज्ञा दिल्या आहेत. प्रत्येक नावामध्ये त्या आसनाचा भावार्थ, तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीचा सुगंध जाणवतो. हा योगक्षेत्रातील त्यांचा अत्यंत मौलिक ठेवा आहे.
स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांनी ज्याची पायाभरणी केली, त्या संगमनेर महाविद्यालयाच्या प्रगतीला डॉ.संजय मालपाणी यांनी अभूतपूर्व गती दिली. आज बीबीए, बीसीए, बीसीएस, स्वतंत्र एमबीए आणि विधी महाविद्यालय अशा विविध अभ्यासक्रमांनी समृद्ध झालेली ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संधींचे विद्यापीठ ठरली आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि भौतिक विस्तारासोबतच स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करुन परीक्षा घेण्याची स्वायत्तता मिळविणार्या जिल्ह्यातील अग्रगण्य संस्थांमध्ये संगमनेर महाविद्यालयाची गणना होते. रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज ओळखून ‘5-बी वोक’ अंतर्गत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, हॉटेल व पर्यटन, लेखांकन व कर प्रणाली, दुग्धव्यवसाय आणि कृषी-मृदाशास्त्र असे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. या उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यामागे डॉ.मालपाणी यांची दूरदृष्टी आणि काळाची अचूक जाण स्पष्टपणे दिसून येते.
त्यांचे कार्य संस्थांपुरते मर्यादित राहिले नाही. बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालक आणि पाल्य यांच्यात वाढणारा विसंवाद ओळखून त्यांनी ‘दोन शब्द आईसाठी – दोन शब्द बाबांसाठी’ हा उपक्रम सुरु केला. गेल्या अडीच दशकांत देशातील अकरा राज्यांतील चारशेहून अधिक शहरांमध्ये झालेल्या या कार्यक्रमांनी लाखो पालकांना नव्या युगातील पालकत्वाचा अर्थ समजावून सांगितला. उपदेशापेक्षा संवाद आणि नियंत्रणापेक्षा विश्वास महत्त्वाचा असतो, हा संदेश त्यांनी अत्यंत प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला.
यशस्वी उद्योजक, दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासू विचारवंत, गीता प्रचारक, योगचळवळीचे शिल्पकार, समाजाभिमुख नेतृत्व आणि संवेदनशील पालकत्वाचे मार्गदर्शक अशा अनेक भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. विशेष म्हणजे या सर्व भूमिकांमध्ये प्रसिद्धीचा मोह नव्हे, तर समाजोपयोगी कार्याचा ध्यास अधिक ठळकपणे जाणवतो. डॉ.संजय मालपाणी यांच्या कार्याकडे पाहिले, की त्यांच्या प्रत्येक उपक्रमामागे एक समान धागा दिसतो; माणूस घडविण्याचा. संस्था उभारणे, इमारती बांधणे किंवा पुरस्कार मिळविणे ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीची ओळख असू शकते, पण विचार घडविणे, मूल्ये रुजविणे आणि पुढील पिढीला सक्षम करणे हीच खर्या अर्थाने समाजऋषीची ओळख असते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करताना केवळ त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणे पुरेसे ठरणार नाही. त्यांनी चेतविलेला ज्ञानाचा दीप, संस्कारांची ज्योत, योगाचा जागतिक संदेश आणि समाजमनात जागविलेली सकारात्मकतेची प्रेरणा अशीच अखंड प्रज्वलित राहावी, हीच प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि सुजाण समाजाची सामूहिक भावना आहे. नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा मानवाने विश्व जिंकण्याचा आत्मविश्वास मिळविला आणि डॉ.संजय मालपाणी यांनी शिक्षण, संस्कार आणि मानवतेच्या वाटेवर टाकलेल्या पावलांनी असंख्य विद्यार्थ्यांना स्वतःचे विश्व जिंकण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना एकच भावना दाटून येते; काही व्यक्ती इतिहास घडवत नाहीत, तर त्या भविष्य घडवितात. डॉ.संजय मालपाणी हे त्यापैकीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.
