‘आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो!’ ः पटोले देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचे खणखणीत उत्तर

मुंबई, वृत्तसंस्था
राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजप नेते आक्रमक झाले असून राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसवर टीका करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे अशी टीका केली. तसंच काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं असंही म्हटलं. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो असा टोला भाजपला लगावला. वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचं सांगत असतील तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस आणावे. परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपवाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती, असं नाना पटोले यांनी सांगितलं. शेतकरी आंदोलन, लसीकरणापासून वंचित भारतीय, महागाई मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी ही व्यूहरचना रचल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रात करोना रुग्ण वाढत असताना अजूनही केंद्राकडून अपुर्या पद्धतीने लस पुरवली जात आहे. एकीकडे केंद्रातील सरकार पाकिस्तानधार्जिणे होऊन पाकिस्तानला लस पुरवतं, पण महाराष्ट्राला आणि देशातील गरीबाला लस दिली जात नाही. या मूळ प्रश्नांवरुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असून राज्य सरकारने हे गांभीर्याने घ्यावं अशी काँग्रेसची भूमिका राहणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं. राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून राजभवन भाजप कार्यालय झालं आहे. त्यांनी काय रिपोर्ट द्यावा हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो ठेका घेतला आहे त्यासाठी जनता माफ करणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

फडणवीस स्वत: न्यायाधीश झाले होते. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ते क्लीन चीट द्यायचे. त्यावेळी का राजीनामा घेतले नाही? राजकारणात आरोप होत असतात पण सत्यता समोर येईपर्यंत राजीनामा घेणं चुकीचं आहे. दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच काँग्रेसची भूमिका आहे. आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांच्यासाठी चांगले झाले, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
