गुटखा माफियाची अटक टाळण्यासाठी पोलिसांचीच धडपड? दहा दिवसानंतरही हात रिकामेच; तालुक्याची वाटचाल श्रीरामपूरच्या दिशेने..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अतिशय गंभीर गुन्ह्यांच्या बाबतही ‘गंभीर’ नसलेल्या आणि ‘निष्क्रिय’ कारकीर्दीची अखंड श्रृंखला जोपासणार्या संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातून आता आणखी एका धक्कादायक चर्चेला उकळी फूटली आहे. आठवड्याभरापूर्वी कर्र्हेघाटातील अपघातातून ‘आंतरराज्य’ गुटखा तस्करीचा पर्दाफार्श झाल्यानंतर त्याच्या सूत्रधाराला ‘मकोका’पासून वाचवणार्या पोलिसांनी आता त्याच्या अटकपूर्वचा फैसला होईस्तोवर त्याची अटक टाळण्याची धडपड सुरु केली आहे. त्यासाठी त्याचा शोधच घेतला गेला नसल्याची चर्चा असून ती थोपवण्यासाठी शुक्रवारी उपचाराच्या नावाखाली ‘तुर्या’ ठेवून पळालेल्या अरमान निजाम शेखला रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ घेवून अटक करण्यात आली आहे. खरेतर अलिशान वाहनाच्या अपघातातून इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी ‘आंतरराज्य गुटखा तस्करी’ समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे खूप गांभीर्याने पाहण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र या घटनेचा सुरुवातीपासूनचा प्रवासच संशयापासून सुरु होवून संशयावरच अडकल्याने संगमनेरात गुन्हेगारांसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे धक्कादायक चित्र निर्माण होवू लागले आहे. गेल्याच आठवड्यात श्रीरामपूरमधील व्यापार्याच्या हत्याकांडानंतर तेथील गुन्हेगारी टोळ्यांच्या साम्राज्यावरुन राज्यात धुमाकूळ घातला असतानाच आता संगमनेरात अशाच पार्श्वभूमीच्या गुन्हेगारांना गजाआड घालून समाज सुरक्षित करणं अपेक्षित असताना त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याने संगमनेरचीही वाटचाल आता श्रीरामपूरच्या दिशेने होते की काय अशी भीती व्यक्त होवू लागली आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता.9) पुणे-नाशिक महामार्गावरील कर्र्हेघाटात सुरक्षा कठड्यांना धडकून एक अलिशान कार (क्र.एम.एच.01/बी.बी.9149) दरीत कोसळली होती. हा अपघात घडला त्यावेळी पहाटेची वर्दळ असल्याने काहींनी धाव घेत जखमींना वाहनाबाहेर काढून उपचारार्थ खासगी रुग्णालयात पाठवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी सातच्या सुमारास तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र तो पर्यंत बघ्यांची प्रचंड गर्दी होवून अनेकांनी अपघातग्रस्त वाहन आणि त्यात भरलेल्या खचाखच गुटख्याचे चित्रण करुन आपापल्या समूहात व्हायरल केल्याने अपघातातून उघड झालेल्या या शाही गुटखा तस्करीची चर्चा गावभर पसरली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन दरीतून बाहेर काढून त्यातील गुटख्याची मोजदाद केली असता सुमारे 75 छोट्या-मोठ्या गोण्यांमध्ये भरलेला आठ लाख 40 हजार 136 रुपयांचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा उघड होवून या तस्करीचा सूत्रधार म्हणून लव्ह जिहाद सारख्या समाजात द्वेष निर्माण करण्याच्या प्रकरणासह हत्यार, गांजा आणि गुटखा तस्करीत नामचीन असलेल्या घारगावच्या युसुफ दादा चौगुलेच्या नावाचाही बोलबाला झाला.

घटनेतील संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार पोलिसांनी या कारवाईची माहिती जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासनाला देवून त्या विभागाच्या अन्नसुरक्षा अधिकार्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याची अपेक्षा होती. अपघातानंतरच्या काहीतास पोलिसांकडून तशी माहितीही दिली गेली. अन्नसुरक्षा अधिकारी अहिल्यानगरहून येत असल्याने गुन्हा दाखल करण्यास उशिर होईल असे माध्यमांनाही वाटले. प्रत्यक्षात सायंकाळ होवूनही प्रशासनाकडून कोणीही हजर झाले नाही. त्यामुळे पोलिसांनीच फिर्यादी होत गुन्हा दाखल करण्याचे ‘सोपस्कार’ उरकले.

खरेतर, सकाळी हा प्रकार समोर येताच तालुका पोलिसांनी रुग्णालयात जावून दाखल आरोपींचा शोध घेण्याची गरज होती. त्यांच्या प्रकृती अहवालानुसार पुढील निर्णय घेवून ताब्यात घेण्यासारख्या स्थितीत तशी कारवाई होणं अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र दिवसभर ‘अन्न व औषध’ प्रशासनाकडे बोटं दाखवून पोलिसांनी एकप्रकारे या प्रकरणात जखमी होवून रुग्णालयात दाखल झालेल्या सिकंदर रफिक शेख व अरमान निजाम शेख (दोघेही रा.जांबूत) यांना ‘तुर्या’ ठेवण्याची पूरती संधी उपलब्ध करुन दिली, त्यांनीही ती साधली आणि दोघेही पसार झाले. या घटनेला आता आठवडा उलटून गेला आहे. मात्र पोलिसांनी ना तालुक्यात गुटखा तस्करीचे रॅकेट चालवणार्या आणि यापूर्वी अर्धाडझनावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या युसुफ दादा चौगुलेचा शोध घेतला, ना पोलिसांच्या नाकावर टिच्चून रुग्णालयातून पसार झालेल्या एकासह मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या.

या दरम्यान प्रकरणाच्या सूत्रधाराने मात्र अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव जरुर घेतली. तालुका पोलिसांनी जाणीवपूर्वक त्याचा शोध थांबवून त्याला मोकळीक दिली असून न्यायालयीन प्रक्रियेतून दिलासा नाकारला जाण्यापर्यंत एकप्रकारे अटकेपासून संरक्षणच दिले आहे. या प्रकरणाच्या चर्चेला वाचा फूटल्यानंतर यातून संगमनेरातही ‘युसुफ चौगुले’नामक नामचीन गुन्हेगाराची टोळी आता ‘बारसं’ धरु लागल्याचे भयानक चित्र उभे राहू लागले आहे. त्यासाठी राजकीय संघर्षाचा फायदा घेवून मनमानी राज्यकारभार हाकणार्या अधिकार्यांना हाताशी धरुन तालुक्यातील अवैध व्यवसायांना खतपाणी घातले जात असून संगमनेरच्या शांत आणि सुसंस्कृतपणाला डाग लावण्याचा गंभीर उद्योग सध्या सुरु आहे. या मनमानीकडे वेळीच लक्ष देवून गुंडांसाठी पोषक वातावरण तयार करु पाहणार्या काही अधिकार्यांची उचलबांगडी टाळल्यास भविष्यात श्रीरामपूरप्रमाणेच संगमनेरातही गुन्हेगारांच्या सशस्त्र टोळ्या निर्माण होवून सामाजिक शांततेचे वाभाडे निघू शकतात. संगमनेरच्या राजकीय धुरिणांनी याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

अन्यथा काळ सोकावणार..
संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील दुय्यम अधिकार्यांना हाताशी धरुन मनाला वाटेल त्या प्रकारचा कारभार सुरु असल्याचे धक्कादायक चित्र सध्या बघायला मिळत आहे. ऐनकेनप्रकारे कोणत्याही माध्यमातून केवळ ओरबाडण्याचा भयानक प्रकार सुरु असून त्यासाठी कायद्याला दररोज फाट्यावर मारण्याचे प्रकारही वाढीस लागले आहे. एमडी, गांजा, गुटख्यासारख्या व्यसनातून पिढ्या बर्बाद होत आहेत, अशा पदार्थांचा चोरटा व्यापार समोर आल्यानंतर त्याची पाळेमूळे उखडून फेकणं आणि गुन्हेगारांवर कायद्याची जरब बसवणं सर्वसामान्यपणे अपेक्षित असताना पालकमंत्री, दोन-दोन आमदार आणि चक्क आयपीएस अधीक्षकांच्या नाकावर टिच्चून तालुका पोलिसांनी या प्रकरणाची सुरुवातच संशयापासून केली असून त्याचा या क्षणापर्यंतचा प्रवासही संशयीतच आहे. या प्रकारांची स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळीच दखल घेवून हस्तक्षेप करण्याची गरज आहे, अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.

