दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातून विरोधकांना उभारी! संगमनेरात पहिल्यांदाच सामान्य रस्त्यावर; ‘नीट’वरुन सरकारवर ‘नेटका’ राजकीय वार..

श्याम तिवारी, संगमनेर
वैद्यकीय प्रवेश पात्रता (नीट) परीक्षेत झालेल्या गोंधळावरुन यंदा देशभरात अभूतपूर्व संताप उसळला आहे. महाराष्ट्रातील सहाजणांनी मिळून यंदाच्या ‘नीट’चा पेपर फोडल्याचे उघड झाल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेला पुनःपरीक्षा घेण्याची पाळी आली. मात्र या घटनेने देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला. याच दरम्यान सरन्याधिशांकडून एका सुनावणीत ‘कॉक्रोच’ असा उल्लेख झाल्याने तोच धागा पकडून अमेरिकेत स्थिरावलेल्या अभिजीत दीपके या भारतीय तरुणाने ‘कॉक्रोच जनता पार्टी’ जन्माला घातली आणि बघताबघता विद्यार्थी व पालकांचा संताप राजधानीतील जंतरमंतरपर्यंत पोहोचला. त्यासाठी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना प्राणांतिक उपोषणही करावे लागले. सरकारकडून त्यांचे उपोषण मोडण्याचा प्रयत्न होण्यासह आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराने विद्यार्थ्यांविषयी जनमानसात सहानुभूती निर्माण झाली. त्यातूनच देशातील विरोधकांना तब्बल एका तपानंतर लोकभावनेचा मुद्दा गवसल्याने राजधानीतील आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांपेक्षा राजकारण्यांचीच अधिक गर्दी होवू लागली. काँग्रेससह काही पक्षांनी तर स्थानिक पातळीवर त्याचा राजकीय लाभ मिळवण्यासाठी दिल्लीतले आंदोलन गावोगावी नेले, त्यातून जनसहभागही मिळाल्याने सततच्या पराभवाने खचलेल्या विरोधकांना एकप्रकारे राजकीय उभारीही मिळाली आहे. त्याचा नेमका वापर करुन ‘नीट’च्या आडून सरकारवर ‘नेटका’ वार करण्याच्या संधीचा सर्वत्र वापर होत असल्याचे चित्र आता विद्यार्थी आंदोलनाच्या उत्तरार्धात दिसू लागले आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनातून पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना उचलण्याच्या सरकारी कारवाईने विरोधी राजकीय पक्षांना आंदोलनास्थळावर जाण्याचा रस्ता तयार करुन दिला. त्यातच सोमवारच्या मोर्चात काही आंदोलकांनी थेट सुरक्षाकडे भेदून संसदेत शिरण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटी होवून संसदेकडे जाणार्या सर्वच मार्गांवर लाठीचार्ज, दगडफेक, वाहनांची तोडफोड झाल्याच्या घटना घडल्या. त्याचे सोयीस्कर ‘व्हिडिओ’ सोशल माध्यमातून देशभर पसरल्याने विद्यार्थ्यांवरील पोलिसांचा लाठीहल्ला सहानुभूतीचा विषय ठरला. विरोधकांकडूनही वारंवार त्याच मुद्द्याला धरुन दिल्ली पोलिसांचे नियंत्रण असलेल्या गृहमंत्रालय व पर्यायाने अमित शहा यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली आणि तब्बल एका तपानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळले.

विरोधकांना विद्यार्थ्यांचा मुद्दा गवसल्याने सुरुवातीला नवा राजकीय ‘प्रतिस्पर्धी’ नको म्हणून या आंदोलनाकडे दुरुनच पाहणार्या राजकीय पक्षांची आता जंतरमंतरवर रिघ लागली आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, उबाठा शिवसेना यासारख्या पक्षांनी या आंदोलनाला जंतरमंतरवरुन देशातील गावागावात नेण्याची योजना आखली. यंदा नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी, त्यांचे पालकही आपला रोष व्यक्त करण्याच्या भावनेने या आंदोलनात सहभागी होवू लागल्याने विरोधकांचे मनसुबे उंचावले आहेत. आयत्या हाती लागलेल्या जनभावनेच्या या मुद्द्याला आपल्या भोवती केंद्रीत करण्यासाठी 55 वर्ष देशाची सत्ता हाकणार्या आणि प्रदीर्घकाळ एसपीजी प्रोटेक्शनचा लाभ घेणार्या आणि त्याचे नियमही ज्ञात असलेल्या राहुल गांधी यांनी सर्व सुरक्षा व राजकीय मर्यादा ओलांडून थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानजवळ आंदोलन केले, शिवाय त्यांनी तेथूनच ‘लाईव्ह’ व्हिडिओ शेअर करीत नागरीकांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर आवाहनही केले.

अनेक पक्षांच्या नेत्यांनी जंतरमंतरवर जावून हातात माईक घेतले आणि जगभरातील माध्यमांच्या कॅमेर्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून विद्यार्थी आंदोलनाला राजकीय धार चढत असतानाच पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनातून नकारात्मक का होईना, मात्र चर्चेत आलेल्या काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलन आणि सरकारची भूमिका पूरचुडीला ठेवून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचे नियोजन केले. जागोजागी आंदोलनांच्या माध्यमातून आणि त्यात होणार्या केंद्रसरकारच्या शरसंधानातून त्याची जोरदार सुरुवातही झाली. त्याला स्थानिक पातळीवरील विद्यार्थी आणि पालकांचीही साथ मिळू लागल्याने गेल्या 12 वर्षात सातत्याने पराभव पाहणार्या विरोधी नेत्यांचे मनोबल वाढून त्यांना पुन्हा राजकीय संघर्षासाठी उभारीही मिळू लागल्याने वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेच्या मुद्द्यावरुन दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु झालेले विद्यार्थी आंदोलन आजच्या स्थितीत राजकीय होवून गावोगावी पोहोचले आहे.

संगमनेरातही काँग्रेसच्या झेंड्याखाली माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्यासह डझनभर स्थानिक पुढार्यांनी ‘मशाल मोर्चा’ काढला. या मोर्चात सहभागी असलेल्यांच्या फलकांवर दिल्लीतील आंदोलनाची छबी दिसत होती., मोर्चादरम्यान दिल्या जाणार्या घोषणाही विद्यार्थी, परीक्षा, गोंधळ आणि पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याभोवतीच होत्या. मात्र या मोर्चाच्या समारोपाने त्याला राजकीय रंग चढवला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जाणार्या या परीक्षांमधील गोंधळाचा धागा धरुन विद्यार्थी, पालक व मोर्चात सहभागी लोकांसमोर बोलताना सर्वच विरोधी नेत्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापासून विषयाला हात घालीत शेवटी थेट पंतप्रधानांचा राजीनामा मागत सरकार उलथवण्याची भाषाही केली.

यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वसामान्य विद्यार्थी आणि नागरीकांचा आवाज सरकारला ऐकू येत नसल्याचे सांगत केंद्रावर आसुड ओढण्याचा मार्ग शोधला आणि त्यानंतर सत्तेचा गर्व, हुकूमशाही व्यवस्थेला वळसा घालीत पुन्हा मूळ हेतूला हात घातला. यावेळी त्यांनी विद्यार्थी आंदोलनाला चिरडणार्या सरकारच्या निषेधाची हुंकार भरीत विद्यार्थीच काय, पण संसदेत विरोधीपक्ष नेत्यालाही बोलू दिले जात नसल्याचे प्रकरण बाहेर काढून जमलेल्या मतदारांमध्ये राहुल गांधींची प्रतिमा स्थापन्याचा प्रयत्न केला. देशातील लोकशाही संपवण्याचा घाट सुरु आहे, जनतेचा आवाज दाबला जात आहे, आम्ही कशाही करुन निवडणूका जिंकतोच असा सरकारला गर्व झालाय. तरुणांचे भविष्य उध्वस्त होत आहे, मात्र देशात केवळ हिंदू-मुस्लिम सुरु आहे. आगामी काळात लोकशाही राहील की नाही? अशी नेहमीची शंकाही त्यांनी बोलून दाखवली.

माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनीही माजीमंत्र्यांच्या बोलण्याचा प्रवाह पकडून नीट घोटाळा महागैरव्यवहार असल्याचा घाघाती आरोप केला. केंद्र सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांमध्ये कोणतीही नैतिकता शिल्लक राहीली नाही. विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला होतो, अनेक विद्यार्थी जखमी होतात, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर काहीच बोलत नाहीत हे दुर्देवी आहे. हुकूमशाही पद्धतीने विद्यार्थी आंदोलन चिरडून लोकशाहीची दररोज हत्या केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या आंदोलनासमोर बोलणार्या बहुतेक सर्वच पुढार्यांनी लाठीहल्ल्याचा निषेध करीत सरकारवर आसूड ओढताना चौफेर टिका करीत काँग्रेसनेते राहुल गांधी यांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केल्याने दिल्लीच्या जंतरमंतरवर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्राणांतिक उपोषणाने सुरु झालेले त्यांचे आंदोलन सरकारच्या लेखी आश्वासनाने थांबले असले तरीही, या आंदोलनाने पराभूत मानसिकतेत असलेल्या राजकीय विरोधकांना मात्र उभारी दिली असून वांगचूक यांच्या ज्यूसग्रहणानंतरही जंतरमंतरसह देशभर अशा आंदोलनांचे आता अक्षरशः पिकं आले आहे.

बुधवारी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘मशाल मोर्चा’ला स्थानिक विद्यार्थी आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. या मोर्चाच्या समारोपाला झालेल्या विविध पुढार्यांच्या भाषणांनी त्याला मात्र राजकीय रंग चढवला. या आंदोलनाच्या माध्यमातून देशात प्रचंड रोष असल्याचे चित्रही रंगवण्यात आले. लोकशाहीची हत्या, हुकूमशाही व्यवस्था, आंदोलनातील लाठीहल्ला आणि शेवटी विरोधी पक्षनेत्यांनाही बोलू दिले जात नसल्याची झालर लावून दीपकेंनी सुरु केलेल्या आंदोलनातील आपापला वाटा उचण्याचाही प्रयत्न दिसून आला. एकंदरीत केंद्रात नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यापासून लोकभावनेच्या विषय शोधात असलेल्या विरोधकांना गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच गरम मुद्दा हाती लागला असून त्याचा वापर करुन देशभर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यास सुरुवात झाली आहे. या आंदोलनाने पराभूत मानसिकतेने खचलेल्या नेत्यांनाही नव्याने उभारी दिली असून आगामी कालावधीत त्याचे नियमित प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे.

