टाळेबंदीमधील पवार बंधूंची गाडी ‘मेक इन इंडिया’साठी आदर्शवत ः मुरकुटे
टाळेबंदीमधील पवार बंधूंची गाडी ‘मेक इन इंडिया’साठी आदर्शवत ः मुरकुटे
निंभारी येथील पवार बंधूंनी घरीच बनविली चारचाकी गाडी
नायक वृत्तसेवा, नेवासा
टाळेबंदीच्या काळात नेवासा तालुक्यातील निंभारी येथील पवार बंधूंनी बनविलेली चारचाकी गाडी नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘मेक इन इंडिया’साठी आदर्शवत ठरेल असे गौरवोद्गार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी काढले.

निंभारी (ता.नेवासे) येथे जनार्दन पवार यांच्या निवासस्थानी बनविलेल्या गाडीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खुपटीचे सरपंच गोरक्षनाथ तनपुरे होते. गाडी बनविणारे जनार्दन पवार यांची मुले युवराज व प्रताप हे नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नेहमी खटाटोप करत असतात आणि त्यात ते यशस्वी देखील होतात. युवराज हा मॅकेनिकल डिप्लोमा करत आहे तर प्रताप दहावीत शिकत आहे. यापूर्वी देखील शेतीसाठी लागणारे औजारे व वेगवेगळे साहित्य त्यांनी स्वतःच्या संकल्पनेतूनच विकसित केले आहे. मात्र, टाळेबंदीमध्ये त्यांचा नवीनतम विकसित करण्याचा छंद काही शांत राहत नसल्याने त्यांनी गाडी बनविण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी त्यांचा लहान मित्र चैतन्य मकासरे याने मदत केली याचे माजी आमदार मुरकुटे यांनी कौतुक करत या गाडीचा उपयोग शेतात जाण्यासाठी नक्कीच होईल असा विश्वासही व्यक्त केला.

याप्रसंगी करजगावचे सरपंच अशोक टेमक, विनायक पुंड, दत्तात्रय वरुडे, माऊली काले, शिवप्रहार संघटनेचे किशोर जंगले, अंमळनेरचे पोलीस पाटील अनिल माकोणे, बाळासाहेब कोळपे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक माजी सरपंच अण्णासाहेब जाधव यांनी केले तर आभार संजय पवार यांनी मानले.

निंभारी-नेवासा रस्त्यालगत युवराज फर्निचर कारखाना असून नेहमी शेतीपयोगी साहित्य आणि नवनवीन तंत्रज्ञान विकसित करुन साहित्य बनवतात. टाळेबंदीच्या काळामध्ये मुलांनी गाडी बनविण्याची संकल्पना मांडली. आमच्याकडे असलेल्या 150 सीसी पल्सर दुचाकीचा युवराज, प्रताप व त्यांचा छोटा मित्र चैतन्य यांनी बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास करून सलग दोन महिने झटून अखेर गाडी तयार केली. याचा अभिमान नक्कीच वाटतो. यामध्ये बंधू संजय पवार, हरिभाऊ पवार, पांडुरंग पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
– जनार्दन पवार (निंभारी)

