सोन्यासारख्या चार एकर झेंडूवर रोटाव्हेटर मारण्याची दुर्देवी वेळ

सोन्यासारख्या चार एकर झेंडूवर रोटाव्हेटर मारण्याची दुर्देवी वेळ
बाजारभाव नसल्याने पठारभागातील झेंडू उत्पादक शेतकरी वैतागले
नायक वृत्तसेवा, घारगाव
झेंडूला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून चार एकर शेतात कलकत्ता झेंडूची लागवड केली. प्रारंभी चांगले बाजारभावही मिळाले, पण आता बाजारभाव कोसळल्याने झेंडूची फुले तोडणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी चांगलेच वैतागले असून संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथील अशोक धोंडीभाऊ पाडेकर या शेतकर्‍याने सोन्यासारख्या चार एकर झेंडूवर दुर्देवाने रोटाव्हेटर फिरवला आहे.


खंदरमाळवाडी शिवारातील करंजेकर मळा येथे अशोक पाडेकर यांची शेती आहे. त्यांनी अडीच-तीन महिन्यांपूर्वी कलकत्ता झेंडूची रोपे विकत घेवून चार एकर शेतामध्ये लागवड केली होती. त्यासाठी फवारणी, खते औषधे यांचा मोठा खर्च झाला होता. काही महिन्यानंतर झेंडू सुरू झाला. गणेशोत्सवाच्या दरम्यान फुलांना चांगले बाजारभावही मिळाले. परंतु कालांतराने झेंडूचे बाजारभाव पाच ते दहा रूपये किलो झाले. त्यामुळे शेतकरी पाडेकर यांनी पुन्हा बाजारभाव वाढतील म्हणून झेंडूची फुले न तोडण्याचा निर्णय घेतला. तरीही एकदा त्यांनी फुले तोडून शेतबांधावर टाकून दिली होती.


त्यानंतरही बाजारभाव न वाढल्याने व तोडण्यासाठी परवडत नसल्याने ते चांगलेच वैतागले होते. जवळपास चार एकर झेंडूसाठी त्यांचा सव्वा दोन लाख रूपयांचा खर्च झाला होता. शेवटी वैतागून पाडेकर यांनी सोन्यासारख्या चार एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवला. आधीच शेतमालाला बाजारभाव नाही, निसर्ग चक्रीवादाळाचे संकट, मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही पावसाने हिरावून नेला. आधीच कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यात बळीराजानेही अवकृपा केल्याने संपूर्ण शेती उध्वस्त झाल्याचे चित्र पठारभागात बघावयास मिळत आहे.

अडीच-तीन महिन्यांपूर्वी चार एकर शेतात कलकत्ता झेंडूची लागवड केली होती. गणेशोत्सवात फुलांना चांगले बाजारभाव मिळाले होते. थोडाफार खर्चही वसूल झाला होता. मात्र, त्यानंतर जे बाजारभाव कोसळले ते आजही तसेच आहेत. त्यामुळे फुले तोडणे देखील परवडेनासे झाले आहे. म्हणून अजून खर्च करण्यापेक्षा संपूर्ण झेंडूवर रोटाव्हेटर फिरवण्याचा निर्णय घेतला.
– अशोक पाडेकर (झेंडू उत्पादक, खंदरमाळवाडी)

Visits: 9 Today: 2 Total: 82207

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *