निवृत्त शिक्षकाचे साडेतीन तोळ्यांचे दागिने लुटले! पोलीस असल्याची बतावणी करुन भरगर्दीत दोघांनी उरकला कार्यभाग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही वर्षांपूर्वी वयस्कर व्यक्तिंना हेरुन त्यांना काहीतरी भीती दाखवित त्यांच्याकडील दागिने त्यांनाच उतरविण्यास सांगून ते घेवून पोबारा करण्याच्या घटना घडत होता. मात्र मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी आपली कार्यशैली बदलल्याने असले प्रकार बंद होवून त्याजागी ‘धूमस्टाईल’ चोरीचे प्रकार घडू लागले. मात्र सध्या शहर पोलिसांची चौकाचौकात नियुक्तीआणि सरकारी वाहनातून होणारी गस्त यामुळे चोरट्यांनी पुन्हा पूर्वीचा मार्ग अवलंबिला असून बुधवारी (ता.6) प्रचंड गजबजलेल्या बाजार समितीजवळ एका निवृत्त शिक्षकाचे तब्बल साडेतीन तोळ्यांचे अलंकार घेवून दोघा चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली. या वृत्ताने मोठ्या कालावधीपासून बंद असलेले दागिने ओरबाडण्याचे प्रकार पद्धत बदलून पुन्हा सुरू झाल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

बुधवारी (ता.6) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गोविंदनगर परिसरात राहणारे निवृत्त शिक्षक कारभारी पुंजीराम पानसरे संगमनेर बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरुन जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना थांबविले. ‘आम्ही पोलीस आहोत, मंगळवारी संगमनेर पोलिसांनी गांजा तस्करांवर कारवाई केली असून, शहरात तपासणी सुरू आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा’ अशी सूचना त्या दोघा भामट्यांनी त्या सत्तरवर्षीय वयस्कर निवृत्त शिक्षकाला केली.

निम्मे आयुष्य विद्यार्थ्यांना सत्याच्या मार्गावरुन चालण्याची शिकवण देण्यात खर्च केलेल्या त्या शिक्षकाने कोणतीही खातरजमा न करता लागलीच त्या दोघांवर विश्वास दाखवला. आपला हातातील पिशवी चक्क त्या भामट्यांच्या हाती देत त्यांनी दिडतोळे वजनाची सोनसाखळी, प्रत्येकी एक तोळा वजनाच्या दोन अंगठ्या असा सरकारी मूल्यांकनानुसार 56 हजारांचा ऐवज काढून त्यांनी चोरट्यांकडे दिलेल्या पिशवीत टाकला आणि ती पिशवी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. मात्र त्या पिशवीत डोकावून पाहिले असता त्यात आपण आत्ताच टाकलेले दागिने नसल्याचे त्या शिक्षकाच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी चोरट्यांकडे विचारणा केली असता ते दोघेही तेथील पसार झाले.

या घटनेनंतर संबंधित शिक्षकाने आरडाओरड केल्याने आसपासचे अनेकजण तेथे गोळा झाले. मात्र चोरट्यांनी चोरी करताना वापरलेल्या या फंड्यातून कोणालाही लुटीचा प्रकार घडत असल्याबाबत शंकाच न आल्याने ‘ते’ शिक्षक वगळता त्या भामट्यांना कोणीही पाहिले नाही. बराचवेळी तेथेच डोक्याला हात लावून बसल्यानंतर सत्तरवर्षीय शिक्षक शहर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी आपली कैफियत मांडली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात भा.दं.वि. कलम 170, 420 अन्वये गुन्हा नोंद करीत शहराच्या चारही रस्त्यांवर नाकाबंदी केली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून शहरातील चौकाचौकात दिवसभर पोलिसांची उपस्थिती दिसून येते. त्यासोबतच शहर पोलीस ठाण्याच्या सरकारी वाहनातूनही दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर गस्त घातली जात असल्याने ‘धूमस्टाईल’ चोर्‍यांना जवळपास आळा बसला आहे. मात्र चोरट्यांनी त्यावर मात करीत पुन्हा एकदा जूना फंडा वापरुन आपलेच दागिने आपल्यालाच काढायला लावून ते घेवून पसार होण्यास सुरुवात केल्याने चोरीचा हा जुना मात्र नव्याने घडलेला प्रकार पोलिसांसमोर आव्हान म्हणून उभा राहिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक खाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.


तुमच्या अंगावर घाण पडली आहे, तुमचे पैसे खाली पडले आहेत, मागच्या गल्लीत दोन गटात दंगल झाली आहे, आम्ही पोलीस आहोत, पुढे तपासणी सुरू आहे अशी विविध कारणे सांगून वयस्कर महिला, वृद्ध नागरिक यांना भीती दाखवून साधारणतः दशकापूर्वी त्यांना लुबडण्याचे अनेक प्रकार संगमनेरात घडले आहेत. त्यानंतर सुसाट वेगाच्या दुचाकींचा वापर करुन धूमस्टाईल महिलांच्या अंगावरील दागिने, हातातील पैशाची पिशवी पळविण्याचे प्रकार सुरू झाले. आता चोरट्यांनी पुन्हा जून्या पद्धतीला नवा साज देवून वयोवृद्धांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेष करुन महिला व ज्येष्ठांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

Visits: 44 Today: 1 Total: 434299

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *