पुढील खरीपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरावे लागणार ः चोपडे
पुढील खरीपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरावे लागणार ः चोपडे
नायक वृत्तसेवा, राहाता
चालू वर्षाच्या खरीप हंगामात हवामान व बियाणे दर्जा याबाबत साशंकता निर्माण झाल्याने बीज पुरवठा करणार्या विविध कंपन्यांवर कृषी विभागाने न्यायालयात खटले दाखल केले आहेत. त्यामुळे यावर्षी सोयाबीन बिजोत्पादन करणार्या कंपन्यांनी बिजोत्पादन प्लॉट तयार केले नसल्याने पुढील वर्षाच्या खरीप हंगामात बियाणे उपलब्ध होणार नाहीत. यासाठी शेतकर्यांना घरचेच बियाणे पुढील खरीपात वापरावे लागणार असल्याची माहिती राहात्याचे गुण नियंत्रण निरीक्षक प्रवीण चोपडे यांनी दिली.
![]()
याविषयी अधिक माहिती देताना चोपडे म्हणाले, आपल्या शेतातीलच सोयाबीनचा वापर बी म्हणून करवयाचा असल्यास सोयाबीन सोंगणीच्या पंधरा दिवस आधी बुरशीनाशक औषधाचा फवारा घेतल्यास बियाणावर रोग पडणार नाही. सोयाबीनची सोंगणी व मळणी मजुरांकडून करुन घ्यावी. ट्रॅक्टरचलित मळणी करताना आरपीएम 350 ते 450 पर्यंत ठेवावा, बियाणांची फुटतूट होणार नाही याची दक्षता घ्यावी, मळणी झाल्यानंतर सोयाबीन तीन दिवस ताडपत्रीवर टाकून ऊन द्यावे, पोते भरताना 60 किलोपर्यंतच भरावे व गोणी असल्यास 40 किलो पर्यंत भरावी, पोत्याची थप्पी लावताना 5 थरापर्यंत थप्पी लावावी, अशा विविध उपयोगी सूचना दिल्या. तसेच शेताच्या चारही बाजूच्या कडेचे दोन पाभरीच्या ओळीतील व वेगळ्या गुणधर्माच्या सोयाबीनची उंची, पाने, आकार, काळ्या रंगाच्या शेंगा इत्यादींचा बियाणांसाठी वापर करु नये, अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी धनंजय सोनवणे यांनी दिली.

