साकूर परिसरातील केटीवेअरच्या ढाप्यांची चोरी घारगाव पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील जांबुत ते साकूर शीवेवर असलेल्या केटीवेअरचे 44 लोखंडी ढापे चोरुन अज्ञात चोरट्याने पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमारे 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे हे लोखंडी ढापे होते. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जांबुत ते साकूर शीवेवर दिघे केटीवेअर आहे. या केटीवेअरचे 44 लोखंडी ढापे अज्ञात चोरट्याने चोरुन पोबारा केला आहे. ही ढापे 1 लाख 10 हजार रुपये किंमतीची होती. याप्रकरणी भाऊसाहेब बापू सागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक 258/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रामभाऊ भुतांबरे हे करत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून साकूर परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बंद घरांचे कुलूप तोडून ऐवज चोरणे, डाळिंब चोरणे, दुचाकी व चारचाकी वाहने चोरणे, किराणा दुकान फोडणे आता तर चोरट्यांनी नवीन फंडा शोधला असून, फारसे लक्ष नसलेल्या आणि सार्वजनिक मालमत्ता असलेल्या केटीवेअरची लोखंडी ढापे चोरून नेण्याचा सपाटा लावला आहे. आधीच चोर्यांनी येथील नागरिक भयभीत असताना पुन्हा सार्वजनिक मालमत्ता चोरट्यांचे लक्ष्य बनल्या असल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान ठाकले आहे.
