अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लग्न करण्याचा कट उधळला! उतावळ्या नवर्यासह सहाजणांना अटक; संगमनेर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची कामगिरी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पठारभागातील एका अल्पवयीन मुलीचे तिच्या घरात घुसून अपहरण करणे, तिच्या आजी-आजोबांसह आईला मारहाण करीत दमदाटी करणे व ‘तुमच्या मुलीशी मला लग्न करायचे आहे, आमचा शोध घेवू नका’ असे सांगत तिला बळजोरीने वाहनात बसवून पळवून नेण्याचा प्रकार गेल्या शुक्रवारी साकूरमध्ये घडला होता. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची सूत्रे आपल्या हाती घेणार्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने या प्रकरणाचा शर्थीने तपास करीत श्रीगोंद्यात जावून अपहृत मुलीची सुखरुप सुटका केली असून तिला पळवून नेणार्या उतावळ्या नवर्यासह त्याचे आई-वडील व अन्य तिघे अशा एकूण सहाजणांना अटक केली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल संपूर्ण तालुक्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या शुक्रवारी (23 सप्टेंबर) पठारावरील साकूरमध्ये घडला होता. येथे राहणार्या एका साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला तेथीलच अमोल बापू खेमनर या तरुणाने पळवून नेल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यासाठी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याचा सुमारास त्याने आपले आई-वडील सिंधुबाई व बापू रंभा खेमनर यांच्यासह संदेश चिलाप्पा खेमनर, मंगेश धोंडीभाऊ शेंडगे (सर्व रा.साकूर) व पोपट शेरमाळे (रा.समनापूर) यांना सोबत घेवून कट रचला होता. त्यानुसार ठरल्या दिनी हे सर्वजण चारचाकी वाहनातून फिर्यादीच्या घरी आले.
यावेळी या सर्वांनी अल्पवयीन मुलीचे वृद्ध आजी व आजोबा यांना मारहाण करीत दमबाजी केली. ‘आमच्या नादाला लागायचे नाही, नाहीतर एकेकाला संपवून टाकू’ अशी धमकी देत त्यांनी घरात असलेल्या अल्पवयीन मुलीला बळजोरीने सोबत आणलेल्या मारुती ब्रीझ्झा या वाहनात बसवून तेथून पलायन केले. या घटनेने घाबरलेल्या या कुटुंबाने याबाबत घारगाव पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन केला. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना समजल्यानंतर त्यांनीही तत्काळ घारगावात धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणी वरील सहा जणांविरोधात कट रचण्याचे कलम 120 (ब) सह 363, 366, 141, 143, 147, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
एखाद्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून व तिच्या पालकांना मारहाण व दमबाजी करीत अपहरणाचा हा प्रकार संगमनेर तालुक्यासाठी नवाच असल्याने याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनाही माहिती देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेसह श्रीरामपूरच्या सायबर सेल पोलिसांनाही या प्रकरणात संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाशी समन्वय साधण्याचे आदेश दिले. त्यानुसार या सर्वांकडून अपहृत मुलीचा शोध सुरु करण्यात आला. या दरम्यान आरोपी अपहृत मुलीसह श्रीगोंदा, दौंड, पाटस, बारामती व भिगवण या भागात वारंवार ठिकाणं बदलत असल्याचे तपास पथकांच्या लक्षात आले.
मात्र संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने आरोपींचा नेमका माग काढीत दिशा पकडली आणि थेट श्रीगोंदा गाठले. या दरम्यान आरोपींनी अनेकदा पोलिसांना हुलकावणीही दिली, मात्र पोलिसांनी त्यांचा पीच्छा काही सोडला नाही. अखेर चोर-पोलिसांच्या या खेळात पोलिसांची सरशी झाली आणि संगमनेरच्या पथकाने जवळपास साडेतीन किलोमीटर अगदी सिनेस्टाईल पाठलाग करीत संशयीत असलेली मारुती ब्रीझ्झा (क्र.एम.एच.14/एफ.एस.6589) रोखली. यावेळी वाहनाची झडती घेतली असता त्यात अपहृत मुलगी आढळून येताच वाहनातील सर्व सहाही जणांना ताब्यात घेण्यात आले. त्या सर्वांना संगमनेरात आणून त्यांना घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या तावडीतून सुटका केलेल्या अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अवघ्या 36 तासांतच या प्रकरणाचा उलगडा करुन अपहृत मुलीची सुखरुप सुटका करण्यासह सहा आरोपींना अपहरणासाठी वापरलेल्या वाहनासह पकडणार्या उपविभागीस पोलीस अधिकार्यांच्या पथकात पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, श्रीरामपूर सायबर सेलचे पोलीस नाईक फुरकान शेख, पोलीस शिपाई प्रमोद जाधव, आकाश बहिरट व घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष खैरे, गणेश लोंढे, पोलीस शिपाई हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, नामदेव बिरे यांचा समावेश होता. या कारवाईत पोलीस पथकांना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव व बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.