राजापूर रस्त्यावरील बेकायदा अतिक्रमणांवर अखेर हातोडा! सार्वजनिक बांधकाम विभाग; राजापूरकडे जाण्यासाठी चोवीस मीटर रुंदीचा रस्ता..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाच्या कानाकोपर्‍यातून येवून म्हाळुंगी नदीभोवती वसाहतींचे कोंडाळे घालीत आता रस्त्यांचाही घोट घेवू पाहणार्‍या अतिक्रमणधारकांवर आज कारवाईचा बडगा उगारला गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजापूरकडे जाणार्‍या रस्त्याचे काम प्रस्तावित असल्याने आज सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरु करण्यात आली. यावेळी अतिक्रमणधारकांचा किरकोळ विरोध झुगारता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सदरची मोहीम सुरु असताना जमलेल्या नागरिकांनी म्हाळुंगी नदीपात्रातील संपूर्ण अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. राजापूरकडे जाणारा रस्ता २४ मीटर रुंदीचा (८० फूट) असल्याने अकोले रस्त्यापासून राजापूरपर्यंतची सर्व अतिक्रमणे हटवणार असल्याचे अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

संगमनेर शहराला जोडणार्‍या चारही बाजूच्या रस्त्यांचे विस्तारीकरणासह नूतनकरण सुरु असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने आज (ता.१९) अचानक धडक मोहीम हाती घेतली. संगमनेर-अकोले रस्त्यावरील म्हाळुंगी नदीच्या पुलावरुन राजापूरकडे जाणार्‍या रस्त्यावर आज सकाळी बुलडोझरचा धडकी भरवणारा आवाज घरघरु लागला आणि खोकलाई देवीच्या मंदिरापासून राजापूरकडील रस्त्यावर आलेली बहुसंख्य अतिक्रमणे भूूईसपाट होण्यास सुरुवात झाली. या कारवाईत गेली अनेक वर्ष याठिकाणी राहणार्‍या काहींची पूर्णतः घरे गेली, काहींनी घरांच्या पुढ्यात आणखी अतिक्रमणं करुन उभी केलेली दुकाने, कोणाची निम्मीअर्धी घरं पाडली गेली.

या कारवाईपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून स्वतःहून ते काढून घेण्यास सांगितले होते. त्यामुळे यावेळी कारवाई होणारच याची पूर्वकल्पना असल्याने येथील अतिक्रमण धारकांनी कारवाई पूर्वीच घरातील अथवा दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. त्यामुळे कोणाचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र ज्यांची संपूर्ण घरेच डोळ्यादेखत भूईसपाट झाली, कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या निवार्‍याची जाणीव झाली त्यानंतर शहारलेल्या काहींनी प्रशासनासमोर टाहो फोडीत विरोधही दर्शवला, मात्र तो तोकडा ठरला. राष्ट्राचा विकास दळणवळणावर अवलंबून असतो, त्यासाठी पाचवीला पूजलेल्या गरीबीचे ओझे घेवून नद्याच्या, ओढ्यांच्या पात्राभोवती जीव धोक्यात घालून राहणार्‍या अशांना पुन्हा पुन्हा उघड्यावर यावंच लागतं.

वास्तविक वसाहती उभ्या राहताना किमान अतिक्रमण करुन राहणारी व्यक्ती कोण आहे, कोठून आली, कशासाठी आली, येथे वास्तव्य करुन राहण्याचे कारण अशा प्रश्नांची उकल होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात अकोले रस्त्यावरुन राजापूरकडे वळण घेताच दुतर्फा वाढत चाललेली आणि आतातर चक्क म्हाळुंगीच्या पात्रातही पसरत असलेल्या वस्त्या शहराच्या सामाजिक आरोग्यासाठी घातक आहेत. या परिसरात अनेक सराईत गुन्हेगारांचा रहिवास पोलिसांकडूनही कधी लपून राहिलेला नाही. मात्र केवळ राजकीय दुर्लक्ष आणि प्रशासनिक अनास्थेमुळे अशा वस्त्या आता गुन्हेगारांसाठीही पोषक ठरु लागल्या आहेत.

कोणताही नागरिक ऊन, वारा, पावसात उघडा राहता कामा नये, प्रत्येकाला निवारा असलाच पाहिजे हा मानवीय विचार आहे. विकसित होणार्‍या शहरांभोवती अशाप्रकारच्या बेकायदा वसाहती नव्या नाहीत. मात्र जेव्हा एखादा अनोळखी माणूस शहरालगत येवून राहातो, त्याची राहणी, भाषा सगळं विपरित असूनही आजवर त्याला ओळख विचारणारी यंत्रणा समोर आली नाही. त्याचाच परिणाम शहराभोवतीच्या अशा मोक्याच्या ठिकाणांना हेरुन अनेक असामाजिक तत्त्वांनीही आपले इमले उभारले आहेत. त्याचा परिणाम शहराच्या शांततेवर पडत असल्याने अशांची ओळख पटवून त्यांचेही इमले जमीनदोस्त करण्याची गरज आहे.

Visits: 25 Today: 1 Total: 117984

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *