देशभक्ती आणि बलिदानाचे प्रतीक म्हणजे स्वराज महोत्सव ः डॉ. सोनवणे संगमनेर महाविद्यालयात स्वराज्य महोत्सव – हर घर तिरंगा नियोजन बैठक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येक भारतीयाने उत्साहाने साजरा करावा. तसेच सामूहिक शक्तीचा आविष्कार यातून झाला पाहिजे. शासनाने निर्धारित केलेल्या ध्वजसंहितेचे पालनही करणे गरजेचे आहे. आपला तिरंगा ध्वज म्हणजे बलिदानाचे प्रतीक आहे म्हणून स्वातंत्र्याची माहिती युवकांना झाली पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना व संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य महोत्सव – हर घर तिरंगा नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. तसेच व्यासपीठावर राजेश पांडे, प्रा. डॉ. संजय चाकणे, प्रा. प्रसेनजीत फडणवीस (व्यवस्थापन समिती सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), प्रा. डॉ. संतोष परसुरे (विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे), प्रा.डॉ. प्रभाकर देसाई (राष्ट्रीय सेवा योजना संचालक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे), प्रा. डॉ. प्रताप फलफले, प्रा. डॉ. वसंत खरात (कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना संगमनेर महाविद्यालय), प्रा. डॉ. बालाजी घारुळे (अहमदनगर जिल्हा समन्वयक)आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. सोनवणे म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे झाल्यामुळे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण तरुण पिढीला झाले पाहिजे म्हणून महाविद्यालयीन पातळीपासून हर घर तिरंगा घरघर तिरंगा हा उपक्रम विद्यापीठाने घेतला. त्यामुळे 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक भारतीयाने अभिमानाने तिरंगा आपल्या घरावर फडकवावा. संपूर्ण देशात एक नवीन उत्साह संचारावा असे वातावरण निर्माण झाले पाहिजे. येणार्या भविष्यकाळात शिक्षण पद्धतीमध्ये योग्य बदल घडविला नाही तर खर्या अर्थाने देशासमोर अनेक समस्या निर्माण होतील. दररोज वेगवेगळ्या क्षेत्रात ज्ञानात्मक संसाधने निर्माण होत आहेत असेहीते यावेळी म्हणाले.

शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियामध्ये स्वातंत्र्याविषयी प्रेमभावना जागृत व्हावी म्हणून प्रत्येक घरातील मुलाच्या हाती तिरंगा देण्याचा मनोज व्यक्त केला आहे. मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली पाहिजे. झेंड्याला मानवंदना देत असताना देशाला आपण काहीतरी देणे लागतो ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून केंद्र शासन, राज्य शासन आणि विद्यापीठाने नेमून दिलेली कामगिरी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रताप फलफले यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रम नियोजन बैठकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांचे कार्यक्रम अधिकारी व समन्वयकांनी तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभाग नोंदवून प्रश्नोत्तरे विचारून नियोजन बैठकीत कार्यक्रम सक्षमपणे राबवण्याविषयी माहिती विचारून घेतली. सदर नियोजन बैठकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य, रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी विकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
