साप्ताहिक सुटीचा जिल्ह्याला मिळाला मोठा दिलासा! जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आली पुन्हा पाचशेच्या घरात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून उंचावत जाणारा जिल्ह्याचा कोविड संक्रमणाचा आलेख साप्ताहिक सुटीच्या निमित्ताने सोमवारी काहीसा खाली आल्याने जिल्हावासीयांना क्षणीक दिलासा मिळाला आहे. आजच्या अहवालातून जामखेड वगळता उर्वरीत सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या खाली आल्याने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्याही पुन्हा एकदा पाचशेच्या आत आली आहे. मात्र जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या तीन हजारांहून अधिक असल्याने वाढलेल्या चिंता मात्र आजही कायम आहेत. रविवारी जिल्ह्यात रुग्णसंख्येचा उच्चांक गाठणार्‍या संगमनेर तालुक्यालाही आज काहीसा दिलासा मिळाला असून शहरातील सात जणांसह तालुक्यातील 28 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत भर पडून तालुका आता 23 हजार 953 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

गेल्या सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची सरासरी वाढल्याने पाचशेहून अधिक रुग्ण समोर यायला सुरुवात झाली होती. रविवारी तर आत्तापर्यंतच्या महिन्यातील सर्वाधिक 758 रुग्ण समोर आल्याने कोविड संक्रमणात पुन्हा वाढ झाल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले होते. मात्र तीन दिवसांच्या एकामागून एक धक्क्यानंतर रविवारच्या साप्ताहिक सुटीने मात्र जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात मात्र आज कालच्या तुलनेत दुपटीहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. उर्वरीत तालुक्यातील संगमनेर, पाथर्डी, कर्जत, राहाता, नगर ग्रामीण, महापालिका क्षेत्र, श्रीरामपूर, अकोले, कोपरगाव व शेवगाव तालुक्यातील रुग्णगतीलाही आज ब्रेक लागला आहे. त्यामुळे आठवठ्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याला क्षणिक दिलासाही मिळाला आहे.

चिंताजनक बाब म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यातील उच्चांकानंतर दुसर्‍या आठवड्यापासून संगमनेर तालुक्यातील रुग्णगती घसरत सरासरी 32 रुग्ण प्रतिदिवसांपर्यंत खाली आली होती. मात्र तिसर्‍या आठवठ्यात कोविड नियमांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याने तालुक्याच्या सरासरीने पुन्हा एकदा वेग घेतला असून दररोजची सरासरी 32 वरुन आता थेट 52 रुग्ण प्रतिदिवसापर्यंत उंचावली आहे. आजच्या अहवालातून तालुक्यातील 14 गावांमधून रुग्ण समोर आले असून त्यात पठारभागातील सहा गावांमधील दहाजणांचा समावेश आहे. आजच्या अहवालातून कोविडचा उद्रेक झालेल्या साकूरमधून एकही रुग्ण समोर आलेला नाही. आज शहरातील रुग्णगतीही काहीशी उंचावल्याने 28 जणांमध्ये सातजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नवीन नगर रस्त्यावरील 57 वर्षीय इसम, गोविंदनगर मधील 60 वर्षीय महिला, जोर्वे रस्त्यावरील 65 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 व 24 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.


आज तालुक्यातील 14 गावांमधून समोर आलेल्या 21 रुग्णांमध्ये पठारावरील बिरेवाडीतील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 व 17 वर्षीय तरुण, नांदूर खंदरमाळ येथील 29 वर्षीय तरुण, कोठे बु. येथील 47 वर्षीय इसमासह 34 वर्षीय तरुण, अकलापूर येथील 18 वर्षीय तरुणासह 12 वर्षीय मुलगी, येठेवाडीतील 39 वर्षीय तरुण, कालेवाडीतील 30 वर्षीय तरुण, तर उर्वरीत तालुक्यात रायते येथील 50 व 24 वर्षीय महिला, शेडगाव येथील 69 वर्षीय महिला, दाढ खुर्द येथील 45 वर्षीय इसम, निमज येथील 35 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 21 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 58 व 50 वर्षीय इसम, पिंपरी लौकी येथील 55 वर्षीय इसम व डिग्रस येथील 85 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 23 हजार 953 झाली आहे.

आजच्या अहवालाने जिल्ह्यातील तेरा तालुक्यांना मोठा दिलासा दिला असून रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेकडून अवघे दोन, तर खासगी प्रयोगशाळेच्या 214 आणि रॅपिड अँटीजेनच्या 244 निष्कर्षातून जिल्ह्यातील 460 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पारनेरने पुन्हा प्रथमस्थानी उडी घेतली असून तेथून 81 रुग्ण समोर आले आहेत. उर्वरीत तालुक्यात जामखेड 56, कर्जत 49, शेवगाव 43, नेवासा व पाथर्डी प्रत्येकी 39, श्रीगोंदा 31, संगमनेर 28, कोपरगाव 25, श्रीरामपूर 20, राहुरी 16, अहमदनगर महापालिका क्षेत्र 11, राहाता आठ, अकोले व नगर ग्रामीण प्रत्येकी सहा, भिंगार लष्करी परिसर आणि इतर जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 89 हजार 253 झाली आहे.

Visits: 85 Today: 1 Total: 1100140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *