तनपुरे साखर कारखाना पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात यंदा गाळप होणार; जिल्हा बँकेकडून शेतकरी हिताचा निर्णय
नायक वृत्तसेवा, राहुरी
कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या राहुरीचा डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकरी हित पाहून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. यामुळे यंदा देखील डॉ. तनपुरे गाळप हंगाम करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून राहुरीच्या डॉ. तनपुरे साखर कारखान्यावर जिल्हा बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत आहे. सध्या कारखान्यांच्या डोक्यावर जिल्हा बँकेचे सुमारे 110 कोटींचे कर्ज थकीत आहे. मागील वर्षी कारखान्याने चांगले गाळप केले होते. यंदा देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस असून यामुळे डॉ. तनपुरे चांगले गाळप करेल, अशी आशा संचालक मंडळाला आहे. मध्यांतरी हा कारखाना बँकेने हस्तांतर करून तो भाडेतत्वावर चालवण्यास देणे अथवा त्याची विक्री करण्याची चर्चा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाली होती.
दरम्यान, कारखान्यांच्या विद्यमान संचालक मंडळाने जिल्हा बँकेकडे पुन्हा कारखाना चालविण्यास द्यावा, अशी मागणी केली होती. यामुळे 29 जुलैला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी हा कारखाना पुन्हा विद्यमान संचालक मंडळ यांच्या ताब्यात मागील वर्षीच्या अटी-शर्तीसह देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा बँकेकडून कारखान्यास देण्यात आले आहे. गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कमी कालावधी असल्याने बँकेने राहुरी कारखान्याबाबत निर्णय घेऊन संचालक मंडळाला गाळपासाठी बँकेच्यावतीने परवानगी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.