शिर्डीतून लोसभेसाठी शिवसेनेकडून घोलपच उमेदवार असेल ः घोलप संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांची शिर्डीत पदाधिकार्यांशी बैठक
नायक वृत्तसेवा, शिर्डी
आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून शिवसेनेचा उमेदवार मी किंवा माझा मुलगा योगेश असेल. एवढे मात्र नक्की, की उमेदवार घोलपच असेल, अशा शब्दांत मंगळवारी (ता.2) माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उमेदवारीबाबत भूमिका मांडली. या विधानाने त्यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या न्यायालयीन निवाड्यामुळे त्यांच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारीबाबत निर्माण झालेली साशंकता दूर केली. संपर्कप्रमुख या नात्याने मंगळवारी त्यांनी येथे येऊन शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनेने येथील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची वाट धरताच, या मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी घोलप यांची नियुक्ती केली. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौर्यात घोलप यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले. मात्र, घोलप यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारींबाबतचा न्यायालयीन निकाल येणे बाकी आहे. न्यायनिवाडा झाल्यानंतरच त्यांना येथून उमेदवारी करण्याचा मार्ग मोकळा होईल. तोपर्यंत ते उमेदवारीबाबतचा दावा करू शकत नाहीत, असा आक्षेप त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन लढा देणारे मुंबईचे मिलिंद यवतकर यांनी घेतला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घोलप यांनी, येथून मी किंवा माझा मुलगा योगेश, म्हणजे घोलपच उमेदवार असेल हे नक्की, अशी सुधारित घोषणा केली.
2014 च्या लोकसभेची उमेदवारी देखील दिली होती. त्यांनी प्रचाराची पहिली फेरी देखील पूर्ण केली होती, मात्र न्यायालयीन निवाड्याच्या आधारे त्यांना ऐनवेळी उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली. अवघ्या सतरा दिवसांत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे खासदार झाले. तथापि, अद्यापही हा न्यायालयीन निकाल येणे बाकी आहे. उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, सुहास वहाडणे, कमलाकर कोते, सचिन कोते, कमलाकर कोते, संजय शिंदे, राजेंद्र पठारे, विजय काळे, मुकुंद सिनगर, प्रमोद लबडे, मच्छिंद्र धुमाळ, शिवाजी ठाकरे, दिनेश शिंदे, सुयोग सावकारे, अमोल गायके सुनील परदेशी, सागर लुटे, भागवत लांडगे उपस्थित होते.
शिवसेना स्वबळावर लढणार..
माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उत्तरेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, अशी घोषणा करून शिवसैनिकांत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. येत्या 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत ते शिवसैनिकांचे तालुकावार मेळावे घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू करणार आहेत.