गळनिंब शाळेतील विद्यार्थी झाडाखाली बसून गिरवताहेत धडे त्वरीत वर्गखोल्या बांधून द्या; पालक व ग्रामस्थांची मागणी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
सहापैकी चार खोल्यांचे निर्लेखन झाल्याने त्या पाडण्यात आल्या. बदल्यात साई संस्थान दोन वर्गखोल्या बांधून देणार होते. त्यालाही दोन वर्षांचा कालावधी उलटला. जिल्हा परिषदेने एका खोलीला मंजुरी दिली, मात्र अद्यापही नवीन वर्गखोल्यांची एक वीटही रचण्यात न आल्याने, 100 विद्यार्थ्यांचा पट असलेल्या गळनिंब शाळेतील विद्यार्थ्यांना कधी ग्रामपंचायत कार्यालय, कधी झाडाखाली, तर कधी मंदिरात बसून धडे गिरविण्याची वेळ आली आहे.
शाळेची इमारत जुनी झाल्याने नोव्हेंबर 2019 मध्ये तिचे निर्लेखन करण्यात आले. शाळेला सहा खोल्या होत्या. पैकी चार पाडण्यात आल्या, तर उर्वरित दोन लोकसहभागातून बांधण्यात आल्याने, त्या तशाच ठेवण्यात आल्या. त्यातील एक खोली पोषणआहाराचे धान्य ठेवण्यासाठी वापरली जाते. मात्र, शंभर विद्यार्थ्यांचा पट व पाच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली, कधी ग्रामपंचायत कार्यालयात शिकविण्याची वेळ येथील शिक्षकांवर आली आहे.
दोन वर्षांपूर्वी साईबाबा संस्थानने दोन वर्गखोल्या बांधून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. तीन महिन्यांपूर्वी आमदार निधीतून एक खोलीस मंजुरी मिळाली. मात्र, अद्याप त्याची एकही वीट रचली गेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, पाऊस आल्यानंतर विद्यार्थ्यांना गावातील मंदिरामध्ये बसवावे लागते. मंदिर मुख्य रस्त्यावर असल्याने वाहनांच्या आवाजाने शिकविताना व्यत्यय येतो. एकीकडे इंग्रजी माध्यमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असताना, भौतिक सुविधा नसतानाही येथील शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांचा पट गुणवत्तेच्या आधारावर टिकविला आहे. विद्यार्थ्यांची गरज ओळखून जिल्हा परिषदेने त्वरीत याठिकाणी शाळा खोल्या बांधून द्याव्यात, अशी मागणी पालक व ग्रामस्थांमधून केली जात आहे
2019 मध्ये येथील शाळेचे निर्लेखन झाले असले, तरी कोविडमुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. यावर्षी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. आमदार निधीतून या शाळेसाठी वर्गखोली मंजूर आहे. प्राधान्यक्रमाच्या यादीतही ती अग्रक्रमावर आहे.
– साईलता सामलेटी, गटशिक्षणाधिकारी
ग्रामपंचायतीची व्यायामशाळाही शाळेला वापरण्यासाठी दिली आहे. साई संस्थानकडून दोन वर्षांपूर्वी वर्गखोल्या बांधल्या जाणार होत्या. यासाठी ग्रामपंचायतीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे यांच्याकडेही पाठपुरावा सुरू आहे.
– शिवाजी चिंधे (सरपंच, गळनिंब)