देशी बियाणे बँकेची मुहूर्तमेढ अकोले तालुक्यात रोवली ः पद्मश्री पोपेरे जहागिरदारवाडी येथे गावरान बियाणे बँकेचे लोकार्पण


नायक वृत्तसेवा, अकोले
आपले स्वप्न आहे की प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधावर गावरान आणि देशी बियाणे पोहोचले पाहिजे. त्याची मुहूर्तमेढ अकोले तालुक्यात यशस्वीपणे रोवली जात आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी काढले.

अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या जहागिरदारवाडीमध्ये ए. एस. के. फाउंडेशन मुंबई व बायफ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत गावरान व देशी बियाणे बँकेचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे बोलत होत्या. यावेळी अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे माजी अध्यक्ष व तत्कालीन प्रमुख सल्लागार गिरीश सोहणी, बायफचे राज्य समन्वयक सुधीर वागळे, ए. एस. के. फाऊंडेशनचे सी. एस. आर. मॅनेजर सिद्धार्थ अय्यर, प्रकल्प समन्वयक शिवाजी आदमाने, वनपुरुष तुकाराम भोर, गभाले गुरुजी, गिधाड संवर्धक शंकर शिंदे, एस. आर. टी. भात शेतीतज्ज्ञ काशिनाथ खोले, विषय तज्ज्ञ संजय पाटील, बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे, जलतज्ज्ञ मुख्य अभियंता रामनाथ नवले आदी मान्यवर उपस्थित होते.

जहागिरदारवाडी येथील अभ्यासू व प्रगतिशील शेतकरी बाळू घोडे व विमल घोडे यांच्या विशेष सहकार्याने व परिसरातील बियाणे संवर्धन करणार्‍या शेतकर्‍यांच्या मार्गदर्शनाने या बीज बँकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. या बीज बँकेत स्थानिक पिकांच्या विविध प्रजाती संवर्धित करण्यात आलेल्या आहेत. भात, वरई, नागली, भुईमूग, राळा, खुरसनी व विविध भाजीपाला पिके वाल, मिरची, टोमॅटो, गवार, भेंडी, चवळी, कारली, दोडका, घोसाळी, लाल भोपळा आदी पिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. स्थानिक शेतकर्‍यांच्या मदतीने या बियाण्यांची निर्मिती करून परिसरातील शेतकर्‍यांना बियाणे योग्य दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बायफ संस्थेचे माजी अध्यक्ष गिरीश सोहणी यांनी लोकसहभागातून निर्माण होत असलेल्या बीज बँकेला शुभेच्छा देताना कळसूबाईच्या शिखराइतकेच उंचीचे काम बीज बँकेच्या माध्यमातून व लोकसहभागातून उभे राहील, असे गौरवोद्गार काढले. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे विचारांची देवाण-घेवाण आवश्यक आहे. स्थानिक बियाणे संवर्धनाच्या कार्यक्रमाला शाळांना सामावून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर घेत स्थानिक जैवविविधता टिकवण्यासाठी भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्य समन्वयक सुधीर वागळे यांनी संस्थे मार्फत सुरू असलेले विविध विकास उपक्रम व त्यातील बीज बँकेचे महत्त्व स्थानिक शेतकर्‍यांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी खात्री व्यक्त केली. विषयतज्ज्ञ संजय पाटील यांनी देशभर सुरू असलेल्या स्थानिक बीज संवर्धनाबद्दल उपस्थित शेतकर्‍यांना सखोल माहिती दिली. विभाग प्रमुख जितीन साठे यांनी प्रास्ताविकपर भाषणात अकोले तालुक्यात सुरू असलेल्या गावरान बियाणे व स्थानिक जैवविविधता संवर्धनाबद्दल माहिती दिली. देशातील ग्रामीण व आदिवासी भागातील पहिली बीज बँक 2014 साली याच तालुक्यात सुरू झाल्याची आठवण त्यांनी यावेळेस सर्वांना करून दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विषय मार्गदर्शक योगेश नवले, प्रकल्प समन्वयक विष्णू चोखंडे, किरण आव्हाड, गोरख देशमुख, मच्छिंद्र मुंढे, सुनील बिन्नर, शुभम नवले, राम कोतवाल, हिरामण खाडे, पंढरीनाथ खाडे, विवेक दातीर आदिंनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन योगेश नवले यांनी केले तर प्रकल्प समन्वयक विष्णू चोखंडे यांनी आभार मानले.

Visits: 11 Today: 1 Total: 118272

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *