संगमनेरच्या रस्त्यारस्त्यावर भगवी त्सुनामी! पंचवीस हजारांची उपस्थिती; बंदलाही मिळाला मोठा प्रतिसाद..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विविध भागातून समोर आलेल्या हिंदू अत्याचारासह लव्ह जिहादच्या घटना, केरला स्टोरी या चित्रपटातून समोर आलेले त्याचे भयानक वास्तव, दिल्लीतील सोळावर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीचा भररस्त्यात झालेला निर्घृण खून, मंचरमधील अल्पवयीन मुलीचे धर्मांतरण आणि मागील रविवारी जोर्वेनाक्यावर आठ हिंदू तरुणांना मोठ्या सशस्त्र जमावाकडून झालेला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न या कारणांनी हिंदू समाजात खद्खद्त असलेला रोष आज संगमनेरच्या रस्त्यारस्त्यावरुन वाहिलेल्या भगव्या त्सुनामीतून दिसून आला. संगमनेर व अकोले तालुक्यातील 25 हजारांहून अधिक हिंदू नागरिकांचा सहभाग असलेल्या या मोर्चाने आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढले. पोलिसांकडून आयोजकांना घालून देण्यात आलेल्या नियमांचे परिपूर्ण पालन करुन दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा संपला.
या सर्व पार्श्वभूमीवर संगमनेरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आज (ता.6) शहरात भगवा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाला आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी प्रचंड प्रतिसाद मिळाला. नगरपालिकेच्या प्रांगणापासून सुरु झालेल्या या मोर्चाचे पहिले टोक बाजारपेठ, सय्यदबाबा चौक, गवंडीपुरा, मेनरोड या मार्गाने थेट चावडी चौकापर्यंत विस्तारलेले होते. मोर्चात सहभागी झालेल्या महिला, तरुणी व अबालवृद्धांची संख्याही लक्षणीय होती. मोर्चेकर्यांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे घोषवाक्य असलेल्या फलकांवर लव्ह जिहाद कायद्याची मागणी, अत्याचार थांबवण्यासाठी कठोर कायद्याची मागणी, समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा अशा वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या होत्या.
आजच्या मोर्चात केवळ संगमनेर शहरच नव्हे तर आसपासच्या 85 हून अधिक ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक, अकोले तालुक्यातील हजारो नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते, संगमनेर व अकोले तालुक्यात या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही दिसून आले. वरील मार्गावरुन हा मोर्चा नवीन नगर रोडवरील प्रशासकीय भवनाजवळ आल्यानंतर त्याचे रुपांतर सभेत झाले. यावेळी सुरेश चव्हाणके व विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय प्रमुख शंकर गायकर यांची भाषणे झाली. मोर्चाला गर्दी होणार असल्याचा अंदाज असल्याने आयोजकांनी बसस्थानक चौकात एलईडी स्क्रीनची सोय केली होती. या चौकात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मोर्चा मार्गावर जागोजागी पाणी व सररबताची सोयही करण्यात आली होती.
आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदी अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखील पोलीस दल, धडक कृती दलाचे जवान आणि दंगल नियंत्रण पथकातील कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.