मतदार जागृती व मतदान कार्ड आधारशी संलग्न करण्यासाठी मोहीम! प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे; ऑनलाईन अथवा प्रशासनाच्या माध्यमातून होणार जोडणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मतदारांमध्ये मतदान व निवडणुकांविषयी जनजागृती व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘स्वीप’ या पथदर्शी उपक्रमाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून मतदारांना निवडणुकांबाबत माहिती देणे आणि त्यांचा अधिकाधिक सहभाग नोंदविला जाणार आहे. याशिवाय एकापेक्षा अधिक मतदार संघात अथवा एकापेक्षा अधिकवेळा मतदार यादीतील नावांची ओळख पटविण्यासाठी आता प्रत्येक मतदाराचा आधार क्रमांक मतदान कार्डाशी संलग्न करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2023 पूर्वी हा उपक्रम पूर्ण केला जाणार असून देशातील प्रत्येक मतदाराचे मतदार यादीतील नाव आधारला जोडले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा मतदाऱ नोंदणी अधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी दिली.

विविध निवडणुकांमधील मतदानाचा टक्का विचारात घेता मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरीत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी व निवडणुकांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आयोगाने ‘स्वीप’ ही पथदर्शी प्रणाली अवलंबली आहे. या उप्रकमाची देशभरातील सर्व विधानसभा मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम सुरु केला आहे.

या उपक्रमाच्या नियोजनासाठी संगमनेरचे तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल निकम यांनी आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. देशभर राबविला जाणारा हा पथदर्शी उपक्रम संगमनेर विधानसभा मतदारसंघातही अत्यंत प्रभावीपणे राबविला जाणार आहे. आगामी कालावधीत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जिल्ह्याच्या दौर्यावर येणार असून त्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर आढावा घेवून स्वीप कमिटीची स्थापनाही करण्यात आली आहे.

या बैठकीत मतदार जागृती मंचची स्थापना, नोडल अधिकार्यांच्या नियुक्त्या, शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळांची स्थापना, राष्ट्रीय मतदार दिवस, महिला दिवस, अपंग व तृतीयपंथी दिवसासारख्या उपक्रमांच्या आयोजनाची पूर्वतयारी अशा विविध विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर तालुक्यातील स्वीपचे नोडल अधिकारी, मतदान केंद्रसतरीय अधिकारी (बी.एल.ओ.), शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांचीही बैठक घेण्यात आली. या संपूर्ण मोहीमेसाठी तहसिल कार्यालयात मतदार मदत केंद्राचीही स्थापना करण्यात आली असून नायब तहसीलदार (निवडणूक) विनोद गिरी व सतीश बगाड यांच्यावर त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

याशिवाय एकापेक्षा अधिक मतदारसंघात नावे असलेल्या अथवा एकाच मतदार यादीत एकापेक्षा अधिकवेळा नावे आलेल्या मतदारांचा शोध घेण्यासाठी आता देशातील सर्व मतदारांचे मतदान कार्ड आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 एप्रिल 2023 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून या कालावधीत निवडणूक यंत्रणेकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. मतदारांना मतदार यादीतील आपले नाव आधारशी जोडण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याशिवाय निवडणूक यंत्रणेतील कर्मचारी घरोघरी जावून मतदारांच्या आधारकार्डचे क्रमांक संकलित करणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या या मोहिमेत प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. या संदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल निकम, नायब तहसीलदार (निवडणूक) विनोद

एकापेक्षा जास्तवेळा एकाच अथवा अधिक मतदार संघात एकाच व्यक्तिची असलेली नावे शोधणे हा या मोहिमेचा मूळ हेतू आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेही मतदार कार्डची आधारशी जोडणी करता येणार आहे. याशिवाय निवडणूक कर्मचारी घरोघरी जावून आधार क्रमांकाचे संकलन करणार असून मतदार यादीतील नोंदणीचे प्रमाणीकरण करणे हा एकमेव उद्देश आहे.
– अमोल निकम
सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार, संगमनेर

