दूधगंगा व दूध उत्पादक सोसायटीची सभा उत्साहात ठेवीदारांना आठवड्याला एक हजार रुपये देण्याचा निर्णय

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था व संगमनेर विभाग दूध उत्पादक सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दूधगंगा पतसंस्थेच्या सभागृहात पार पडल्या.
माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरवातीला संस्थेच्या आर्थिक ताळेबंदाची माहिती व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांनी दिली. या सभेत कर्जदार व ठेवीदार सभासद यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. संस्था आर्थिक अडचणीत असल्यामुळे ठेवीदारांना प्रत्येक आठवड्याला पाच हजार रूपये देत होते. परंतु या निर्णयात बदल करून आठवड्याला एक हजार रुपये देण्याचा निर्णय संस्थेने घेतल्याने ठेवीदारांनी याबाबत प्रश्न विचारले असता या प्रश्नावर उत्तर देताना अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी सांगितले कि, संस्था सध्या आर्थिक अडचणीत आहे. संस्थेच्या कारभाराचा लेखा परीक्षणाचा अहवाल येणे बाकी आहे. लेखा परीक्षणातील दोषींकडून रक्कम वसूल करण्यात येईल. सद्यस्थितीत संस्थेकङे 88 कोटींच्या ठेवी आहेत. तसेच दिलेल्या कर्जाची रक्कम 94 कोटी आहे. मात्र ठेवीदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संशय निर्माण झाल्याने ठेवी काढण्याचे प्रमाण वाढले आहे.

परंतु संस्था एकाचवेळी इतकी मोठी रक्कम देऊ शकत नाही. संस्था चालू राहिली तरच ठेवीदारांना ठेवीची रक्कम देणे शक्य आहे. त्यातच कर्जदार संस्था बंद पडण्याची वाट पाहत आहे. काही थकीत कर्जदारांच्या मते संस्था बंद पडली तर कर्ज भरावे लागणार नाही अशा भ्रमात थकीत कर्जदार आहेत. परंतु थकीत कर्जदारांच्या 7/12 उतार्यावर संस्थेचा बोजा व नाव दाखल आहे. तसेच 45 थकबाकीदारांच्या थकबाकी संदर्भात संबंधित खात्याकडून प्रमाणपत्र मिळाल्याने या खातेदारांच्या जमिनी संस्थेच्या नावे झाल्या आहेत. त्यामुळे त्या जमीनींच्या लिलावाचा मार्ग खुला झाला आहे. तसेच कलम 91खाली 40 थकबाकी दारांवर सहकार कोर्टात तर 25 थकबाकीदारांवर महाराष्ट्र राज्य फेडरेशनकडे 101 खाली कारवाई चालू असून या व्यतिरिक्त 145 थकबाकीदारांवर 91 किंवा 101 खाली कारवाई करण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला आहे. 45 थकबाकीदारांच्या जमिनी संस्थेच्या मालकीच्या होणार असल्याने या सर्व जमिनी कायदेशीर मार्गाने विकून थकीत रक्कम वसूल होणार आहे. कुणालाही कर्ज बुडविता येणार नाही, कर्जाची वसुली केली जाईल.

सध्या संस्था आर्थिक अडचणीत असताना सभासदांना व ठेवीदारांना पावतीची मुदत संपल्यावर आठवड्याला पाच हजार रूपये संस्था देत होती या निर्णयात बदल करून एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा हेतू हा आहे कि संस्था चालू ठेऊन कर्ज वसुलीवर भर देण्याचा उद्देश आहे. ठेवीदारांचा एक रूपयाही बुडणार नाही. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे तसेच कर्जदारांनी वरील कारवाई करण्यास भाग न पाडता संस्थेने केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवून कर्ज भरण्यास पुढाकार घेणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. तसेच ही संस्था काँग्रेस पक्षाचे गटनेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. व्यासपीठावर तालुक्याचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण कुटे तसेच जयवंत गुंजाळ, दूधगंगा नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष संचालक व संगमनेर दूध उत्पादकचे अध्यक्ष, संचालक व दूध उत्पादक, तसेच विविध गावचे सरपंच, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
