अकोले तालुक्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर ः पिचड विविध आरोग्य समस्यांवरुन सत्ताधार्यांवर केली टीका
नायक वृत्तसेवा, अकोले
मराठी नववर्ष सुरू झालंय आणि या नववर्षात करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला दिसतोय याचा खर्या अर्थाने मनस्वी आनंद आहे. याचे सर्व श्रेय करोना योद्ध्यांना जाते. मात्र असे असले तरीही अकोले तालुक्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याची टीका भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी आमदार पिचड यांनी म्हटले की, अकोले तालुक्यात मागील दोन वर्षांत करोनाने अतिशय मोठं नुकसान केले आहे जे कदापि भरून निघणार नाही आणि आता कुठेतरी त्या वेदनांमधून बाहेर पडून अनेक परिवार सावरतायत. जी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तालुक्यात मागील 35 वर्षांत उभी केली, त्यांनी शासकीय पाठबळ नसतानाही उत्तम कार्य केलं, म्हणूनच काही प्रमाणात याठिकाणी हानी टळली. खर्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेवर उत्तम कार्य होणे गरजेचे आहे, फक्त पोकळ इमारती असून काही साध्य होणार नाही. त्याठिकाणी औषधे, कर्मचारी, उपकरणे असली पाहिजेत. तेव्हाच जनतेला आधार मिळेल.
याठिकाणी पूर्वी कर्मचारी आणि दैनंदिन साहित्याची उपलब्धता होती. परंतु आज तालुक्यातील सरकारी दवाखान्यांची परिस्थिती बिकट आहे, जे आहेत ते कर्मचारी उत्तम कार्य करताहेत. पण याठिकाणी साहित्य आणि मनुष्यबळाअभावी त्यांना काम करणं अवघड जातंय. याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. रुग्णवाहिकांना मागील 7 महिन्यांपासून डिझेल नाही, तसेच वर्षभरापासून त्या चालकांना पगार नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. ज्यावेळी नागरिक मृत्यूमुखी पडत होते तेव्हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याठिकाणी मुबलक ऑक्सिजन उपलब्ध करून देऊ शकले नाही व आता लाखो रुपये गुंतवणूक करून एन. जी. ओ.च्या माध्यमातून शासनाने अकोले तालुक्यात ऑक्सिजन प्रकल्प उभे केले की ज्याचा आता उपयोग नाही. या प्रकल्पाच्या वीजबिलाची आणि खर्चाची कुठलीही तरतूद केलेली नाही. याला नियोजन म्हणायचे का? आणि लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा मारीत आहे. अशा बाबींकडे कोण लक्ष देणार आहे? असा सवालही माजी आमदार पिचड यांनी केला.
माजी मंत्री मधुकर पिचड व मला कामांची प्रसिद्धी करण्याची गरज नक्कीच भासली नाही. कारण ती आमची जबाबदारी होती व आहे. आज जमाना सोशल मीडियाचा आहे म्हणून प्रसिद्धीसाठी अतिशय किरकोळ बाबी मांडण्याचा आपापल्या परीने वापर प्रत्येकजण करत असतो. मग कुणी आर्थिक बूस्टर देऊन तर कुणी प्रामाणिकपणे प्रोफेशनची जाण आणि गरीमा ठेवून करतो. विकास हा यू-ट्युबवर टाकणार्यालाच नाही तर हे यू-ट्युब बघणार्या 5 हजार लोकांना आणि न बघणार्या अडीच लाख जनतेला जमिनीवर दिसला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. स्वतःला कर्दनकाळ म्हणणारे लोकप्रतिनिधी महोदय तुम्ही तडजोडकार झाले हे तालुका बघतोय, याठिकाणी फक्त बोलल्याने कृतीत गोष्टी होत नसतात. त्यासाठी सत्यता आणि इमानदारी असावी लागते. तालुक्यातील आहे ती आरोग्य व्यवस्था सुरळीत करा. आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेच्या जिवाशी खेळू नका. अन्यथा जनता तुम्हांला माफ करणार नाही, असा इशारा शेवटी त्यांनी दिला.