अरे देवा! आता अज्ञात चोरट्याने पंचायत समितीचा संसारच पळवला!! एकाच दिवशी तिसरी घटना; संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा उच्छाद सुरुच..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुन्हेगार, अवैध व्यावसायिक आणि चोरट्यांवरील पोलिसांचा धाक संपलेल्या संगमनेरात चोरट्यांचा उच्छाद सुरुच असून गुरुवारी तीनबत्ती चौकातील एटीएम व समनापूर शिवारात रस्तालुटीचा प्रकार घडल्यानंतर आता त्याच दिवशी घडलेली आणखी एक धक्कादायक आणि तितकीच गमतीशीर घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या पूर्वी अज्ञात चोरट्यांनी जुन्या पंचायत समितीच्या आवारातील गोदाम फोडून त्यात ठेवलेले विविध प्रकारचे सामान पळविले आहे. विशेष म्हणजे या घटनेत चोरट्यांनी अगदी इलेक्ट्रिक मोटरसह स्टिलची विविध भांडी, खुर्च्या, टेबल व मांडण्याही लांबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना गुरुवारी (ता.28) सकाळी साडेदहा वाजण्याच्या पूर्वी नगर रस्त्यावरील जुन्या पंचायत समितीच्या आवारातील गोदामात घडली. कोणातरी अज्ञात चोरट्याने या गोदामात प्रवेश करुन मोठ्या प्रमाणात दैनंदिन वापराच्या वस्तुंसह इलेक्ट्रिक मोटारी, संगणकाचे छपाई यंत्र (प्रिंटर्स), टाईपरायटर्स, स्टिलची विविध प्रकारची भांडी, लाकडी खुर्च्या व टेबल, मांडण्या अशा कितीतरी वस्तू चोरुन नेल्या. याबाबत पूर्वाश्रमीचे पंचायत समितीचे स्टोअर कीपर व सध्या अकोले येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या मारुती देवराम गवारी यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार वरील वेळेपूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने पंचायत समितीच्या गोदामात प्रवेश करुन 18 हजार रुपये किंमतीच्या एकूण सहा इलेक्ट्रिक मोटारी, संगणकाचे दोन छपाई यंत्र, दोन टाईपरायटर्स, छताचे चार पंखे, प्रत्येकी एक स्टीलचा पाण्याचा जग, लोटा, ट्रे व फुलपात्र, स्टीलचे एकूण आठ ग्लास, डंम्पिंग लेव्हल (डी. एल.) व लेव्हलिंग स्टाप प्रत्येकी एक, पाणी शुद्धीकरण यंत्र, प्रोजेक्टर, चामड्याची पिशवी, प्लॅस्टिकच्या दोन बादल्या, लाकडी स्टूल व खुर्ची, फिरती खुर्ची, प्लॅस्टिकच्या एकूण 10 खुर्च्या, फोल्ड होणार्या सहा खुर्च्या, आठ टेबल, स्टीलच्या चार व प्लॅस्टिकची एक मांडणी आणि लाकडाचे पाच ट्रे असा एकूण 43 हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला.
गुरुवारी (ता.28) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गवारी गोदामातील साहित्याची मोजणी करण्यासाठी गेले असता गोदामातील सर्व साहित्य कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेल्याचे त्यांना दिसले. याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी सायंकाळी साडेसात वाजता संगमनेर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करीत पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांच्याकडे सोपविला आहे.
मारुती गवारी हे पूर्वी संगमनेर पंचायत समितीमध्ये कार्यरत होते, त्यावेळी सदरचे सामान त्यांच्या ताब्यात होते. त्यांची अकोले येथे बदली झाल्यानंतर सदरील सामानाचा ताबा त्यांच्याचकडे होता. गुरुवारी सदर गोदामाच्या चाव्या आणि त्यातील सामानाचा ताबा अन्य कर्मचार्याकडे देण्यासाठी त्यांना संगमनेरात पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी सामानाची तपासणी करण्यासाठी ते गोदामात गेले असता सदरील प्रकार समोर आला. त्यामुळे चोरट्यांनी पंचायत समितीच्या संसारावर कधी डल्ला मारला याबाबतची शाश्वत माहिती नसून केवळ गोदामात सामान दिसले नाही म्हणून संबंधिताने तक्रार दाखल केली आहे. चोरीला गेलेल्या सामानाची यादी पाहता हे काम एकतर एकाचे नाही किंवा एकानेच वेळोवेळी येवून एक-एक वस्तू लांबविली असण्याचीही शक्यता आहे. मात्र या घटनेत अगदी इलेक्ट्रिक मोटरीपासून ते स्टीलच्या फुलपात्रापर्यंतच्या विविध वस्तू चोरीला गेल्याने संगमनेरात या घटनेची गंमतीने चर्चा सुरू आहे.
पंचायत समितीचे कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत झाल्यानंतर जुन्या पंचायत समितीमधील विविध कार्यालयीन खोल्यांचा वापर गोदाम म्हणून केला जात आहे. या गोदामांमध्ये अनावश्यक असलेले सामान ठेवले जाते, जेव्हा त्याची गरज पडेल तेव्हाच त्याचा शोध घेतला जात असल्याने सदरचा प्रकार घडून काही महिन्यांचा काळ लोटलेला असण्याचीही शक्यता आहे. गेल्या काही कालावधीत अशाप्रकारची चोरी होवून त्यात वेगवेगळे सामान चोरीला गेल्याची पंचायत समितीची ही चौथी वेळ आहे. त्यावरुन खरोखरीच चोरी झाली की पंचायत समितीमधील कर्मचार्यांनीच संगनमत केले अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.