पठारभागात ठेकेदाराकडून गौणखनिज चोरीच्या वावड्याच! आंबी खालसा येथील भूयारी मार्ग; तहसीलदारांच्या चौकशीतून वास्तवाचे दर्शन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भ्रष्टाचाराच्या किड्यांनी जागोजागी पोखरल्याने अवघ्या सहा वर्षातच शेकडों निष्पाप प्रवाशांसह असंख्य वन्यजीवांचाही बळी घेणारा ‘पुणे-नाशिक’ राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी निर्मात्या कंपनीने प्रस्तावित असूनही त्याकडे दुर्लक्ष केलेल्या आंबी खालसा फाट्यावरील ‘भूयारी मार्गा’चे (अंडरपास) काम करणार्‍या ठेकेदारानेच ‘गौणखनिज’ चोरल्याची चर्चा पठारभागात सुरु होती. त्याची कुणकुण कानावर येताच समाजाशी असलेली बांधीलकी जोपासताना दैनिक नायकने ‘पंतप्रधान लक्ष ठेवून असलेल्या कामातही गौणखनिज चोरी!’ या मथळ्याखाली सोमवारी (ता.20) ठळक वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची तत्काळ दखल घेत संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी तहसीलदारांकरवी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यातून ठेकेदाराकडून गौणखनिज चोरीच्या केवळ वावड्याच असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे रविवारी पठारभागात सुरु झालेली गौणखनिज चोरीची चर्चा केवळ ‘अफवा’ असल्याचे आता स्पष्ट झाले असून आंबीखालसा येथील भूयारी मार्गाच्या कामाबाबत स्थानिक प्रशासनही गंभीर असल्याचे व तेथील हालचालींवर बारकाईने लक्ष्य ठेवून असल्याचे दिसून आले आहे.


सतत घडणार्‍या अपघाती घटनांमूळे प्रशासनाच्या यादीवर ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणून नोंद झालेल्या पठारभागातील आंबीखालसा फाट्यावर सध्या भूयारी मार्ग बांधण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. वास्तविक तालुक्यातून जाणार्‍या जवळपास 50 किलोमीटर अंतराच्या या महामार्गावर अशा प्रकारच्या पंधरा धोकादायक जागा आहेत. या ठिकाणी अचानक पादचारी अथवा वन्यजीव रस्ता ओलांडताना दृष्टीस पडतो आणि वाहन चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात घडतात. गेल्या सहा वर्षात या महामार्गावर अशा असंख्य घटना घडल्या आहेत. आकडेमोडीतच विचार करायचा ठरल्यास गेल्या एकाच वर्षात या महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाती घटनांमध्ये तब्बल दोनशेहून अधिक मानवी तर मागील वर्षभरात 17 बिबट्यांसह 22 वन्यजीवांचा बळी गेला आहे.


पठारभागातील आंबी खालसा फाटा तर मृत्यूचा सापळा म्हणूनच परिचित झाला असून आजवर या एकाच ठिकाणी अपघात घडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र नूतनीकरण सुरु असतांना महामार्ग प्राधिकरणासह प्रशासकीय अधिकार्‍यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याने ठेकेदार कंपनीने राहीलेली बहुतेक कामे तशीच सोडण्यातून त्याची भरपाई करुन घेतली, मात्र त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य माणसांसह वन्यजीवांनाही भोगावे लागत आहेत. वारंवारच्या या घटनांमूळे संतप्त झालेल्या आंबी खालसाच्या ग्रामस्थांनी महामार्ग रोखून प्रत्येक अपघातावेळी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र आजवर त्यांना आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नव्हते.


मात्र गेल्यावेळी झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थ अधिकच संतप्त झाल्याने महामार्ग प्राधिकरणासह स्थानिक प्रशासनालाही त्याकडे गांभीर्याने बघावे लागले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तयार केलेल्या अभ्यासपूर्ण अहवालानेही या नागरी समस्येकडे अधिक गांभीर्याने पाहण्यास भाग पाडले. त्यातच आंबी खालसातील काही उत्साही तरुणांनी सदरची समस्या पत्राद्वारे पंतप्रधान कार्यालयालाही कळवली. त्याची तत्काळ दखल घेण्यात आली आणि ऑक्टोबरमध्ये सर्व प्रक्रियांचे अडथळे क्षणात बाजूला होवून आंबी खालसा येथे प्रस्तावित असलेल्या भूयारी मार्गाची निविदा प्रसिद्ध होवून त्याचे काम दिल्लीच्या न्यू इंडिया स्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले. कंपनीच्यावतीने प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.


आंबी खालसा फाटा अगदीच महामार्गाच्या वळणावर असल्याने येथे घडणार्‍या अपघातांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथे भूयारी मार्गाची आवश्यकता गृहीत धरुन महामार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीखाली सध्या बोगद्याचे काम सुरु करण्यात आहे आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात गौणखनिजही लागणार आहे. त्यामुळे पठाराच्या एका भागातून दुसर्‍या भागात मुरुम, खडी, दगडं आणि वाळू यासारख गौणखनिज वाहणार्‍या वाहनांची वर्दळही वाढली आहे. मात्र यातील मुरुमाची वाहतूक करणारी वाहने कार्यस्थळाकडे जाण्याचे सोडून तेथून पुढे सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खासगी शेतजमीनीत तो खाली करीत आहे. त्यातून काहींच्या मनात संशय निर्माण झाल्याने त्यातील एकाने रविवारी एम.एच.10/झेड.3509 या क्रमांकाचा ढंपर रस्त्यातच रोखून त्याच्याकडे परवान्याची मागणी केली. मात्र रविवार असल्याने तहसील कार्यालय बंद असल्याचे अजब उत्तर देत तो निघून गेल्याने काही ग्रामस्थांच्या मनात संशय बळावला. त्यातूनच वेगवेगळ्या वावड्यांनी जन्म घेतला.


खरेतर हा महामार्ग दोन महानगरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणारा ठरेल अशीच अपेक्षा होती. मात्र तो सुरु झाल्यापासूनच जून्या महामार्गाची अपघाती श्रृंखला या महामार्गावरही सुरु झाली. गेल्या अवघ्या वर्षभरात आत्तापर्यंत या महामार्गाने दोनशे बळी घेतले आहेत. सहा वर्षात शेकडोंनी आपला जीव गमावला आहे. या सगळ्यांना कारणीभूत हा महामार्ग निर्माण होतांना वाटलेली खैरातच असल्याचे सर्वश्रृत असल्याने यावेळी नागरीक अधिक सजग आहेत. त्यातूनच ‘अफवा’ असली तरीही सामान्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेचे निरसन होण्याची आवश्यकता होती. त्यासाठी लोकांना पडलेला प्रश्न प्रशासनाला बातमीतून विचारल्यानंतर झालेल्या कारवाईचा वृत्तांत देण्याची जबाबदारीही संबंधित वृत्तसंस्थेची असते. आमची बांधिलकी समाजाशी आहे, त्याची पूर्णता जाणीव ठेवून दैनिक नायकने आपली भूमिका वठवली.


उपविभागागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी त्याची तत्काळ दखल घेत तहसीलदार धिरज मांजरे यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता कार्यस्थळापासून अर्धाकिलोमीटर दूर गौणखनिज साठवण्यामागचे वास्तव समोर आले. भूयारी मार्गाचे काम सुरु असलेले ठिकाण अगदीच वळणावर असल्याने ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणून कुपरिचित आहे. त्यातच मूळ महामार्गाच्या खालून भूयार पाडण्याचे काम सुरु असल्याने काम सुरु असलेल्या ठिकाणावरुन होणारी वाहतूक वळवावी लागणार आहे. दिवसरात्र वर्दळीने गजबजलेल्या या महामार्गावरील वाहतुकीने भूयारीकामात अडथळा येवू नये यासाठी प्रत्यक्ष कामापासून रस्ता दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. मात्र नेमके येथेच रस्त्यालगत महामार्ग प्राधिकरणाची जागाच नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.


त्यामुळे बांधकाम व अन्य कारणांसाठी लागणारे गौणखनिज कार्यस्थळाजवळच साठवल्यास अनेक अडचणी निर्माण होवून वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसे घडू नये यासाठी ठेकेदाराने कार्यस्थळापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर एक खासगी शेत करारावर घेवून त्या ठिकाणी गौणखनिजाचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. हा संपूर्ण साठा आंबी खालसा भूयारी मार्गाच्या कामासाठीच वापरला जाणार आहे. त्यात कोणताही गैरप्रकार दिसून आलेला नसून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत तहसीलदारांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांनाही त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पठारभागातील नागरीकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेचे निरसन झाले असून सदरचे गौणखनिज आंबी खालसा येथील भूयारी मार्गासाठीच वापरले जाणार आहे. गैरप्रकार झाल्यास कारवाई अटळ असल्याची ग्वाही तहसीलदार धिरज मांजरे यांनी दिली आहे.

सदरील वृत्ताबाबतची शहनिशा केली असता सध्या आंबी खालसा येथील भूयारी मार्गाच्या कामामूळे पुढील काही दिवस या भागातून होणारी वाहतूक गावाकडून वळवली जाणार आहे. ब्लॅकस्पॉट म्हणून ओळखल्या जाणार्‍या या फाट्यालगत महामार्ग प्राधिकरणाची फारशी जागा नाही. त्यामुळे या कामासाठी लागणारे साहित्य आसपास साठवल्यास वाहतूकीस अडथळा निर्माण होवू शकतो. त्यासाठी ठेकेदाराने काही अंतर पुढे बांधकाम साहित्याचा साठा केला आहे. तलाठ्यांनी सखोल चौकशी करुन तसा अहवालही सादर केला आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत संबंधिताकडून गौणखनिजाचा दुरुपयोग होणार नाही याची ग्वाही घेण्यात आली आहे. चुकीचे काम करणार्‍यास पाठीशी घालणार नाही, गैरप्रकार निदर्शनास आल्यास प्रचलित पद्धतीने कारवाई केली जाईल.
धिरज मांजरे
तहसीलदार, संगमनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *