मोठ्या मुलाने जीव घेतला, धाकट्याकडून अपघाताचा बनाव! पिचडगाव येथील घटना; आईने दिली नेवासा पोलिसांत तक्रार

नायक वृत्तसेवा, नेवासा
शेतीच्या वादातून एका मुलाने आपल्या वडिलांना मारहाण करून त्यांची हत्या केली. तर दुसर्या मुलाने हा अपघात असल्याची खोटी माहिती पोलिसांना देत त्यांची दिशाभूल केली. मात्र, उपचार सुरू असताना पित्याचा मृत्यू झाला. अखेर त्या मुलांच्या आईनेच आपल्या पोरांचं कृत्य सर्वांसमोर आणलं आणि यासंबंधी पोलिसांत तक्रार दिली आणि तब्बल महिनाभरानंतर या हत्येच्या घटनेचा उलगडा झाला.

नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथे 29 जून रोजी ही घटना घडली होती. आसराबाई नाना गिर्हे (वय 65) यांनी फिर्याद दिल्याने त्यांचे पती नाना यादव गिर्हे (वय 70) यांच्या हत्येची वाचा फुटली. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा शिवाजी नाना गिर्हे (वय 27) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दडपणारा दुसरा मुलगा बाबासाहेब याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

पिचडगाव येथे गिर्हे यांची शेती आहे. ती शेती मुलगा शिवाजी याला देण्यावरून वाद होता. 27 जूनच्या सायंकाळी यावरूच त्यांच्यात भांडण झाले. पाण्याच्या हौदाकडे निघालेल्या वडिलांना मुलगा शिवाजी याने लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर जवळच्या चुलीजवळील लाकूड घेऊन त्याने मारहाण केली. यामध्ये नाना गिर्हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या छातीला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रथम नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर नगरच्या एका खासगी रुग्णालयात हलिवण्यात आले. मात्र, प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना 1 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना कशी घडली, याची माहिती देताना गिर्हे यांचा दुसरा मुलगा बाबासाहेब याने घाबरून जाऊन अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यावेळी पोलिसांशी तशी नोंद घेतली होती. आरोपी मुलाची दहशत असल्याने आईही गप्प राहिली होती. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर अखेर धाडस करून आई आसराबाई यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यादिवशी नेमकी घटना काय घडली, याची माहिती देत आपल्या मुलाविरूद्ध पतीची हत्या केल्याची तक्रार त्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
